Sunday, 21 May 2017

भारताचे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन आणि कावेरी जेट इंजिन

कावेरी इंजिन, क्रायोजेनिक इंजिन या संबंधी काही मुक्त विचार.. 

जी.एस.एल.व्ही ची चाचणी ४ जानेवारी ला होते आहे. त्यात एतद्देशीय क्रायोजेनिक इंजिन आहे. बघू कसे चालते ते. खूप आवश्यक आहे ते इंजिन. ते तंत्रज्ञान खूप कामाचे आहे.

क्रायोजेनिक इंजिन चा फंडा हा कि ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तरल अवस्थेत साठवलेले असतात (उणे १९६ देग्री शून्य खाली, अजून खाली, पण वर नाही). आता ऑक्सिजन चा बोईलिंग पोइंत -१८३ डिग्री सेल्सियस आहे आणि हायड्रोजन चा -२५३ डिग्री सेल्सियस. हायड्रोजन जाळून पाणी बनवायला हायड्रोजन ऑक्सिजन च्या दुप्पट असावा लागतो (पाण्याचा फोर्मुला H2O आहे - दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन). 

क्रायोजेनिक इंजिन हे नॉर्मल इंजिन च्या वरती असते. खालचे इंजिन २००० डिग्री वर जळत असताना त्याला लागून असलेले ऑक्सिजन आणि हायड्रोजन साठवून ठेवणारे tank आणि त्यांना जाळणारे इंजिन हे -२५३ डिग्री वर ठेवावे लागते. यास उपाय म्हणजे मोठे इन्सुलेशन ठेवा - पण त्याने वजन वाढते - रॉकेट मध्ये एक एक ग्राम वजन महत्वाचे असते. अधिक खूप थंडी मध्ये स्टील देखील पापडासारखे तुटते. ज्यांना तरल नायट्रोजन सोबत काम करायचा अनुभव आहे, त्यांने हे अनुभवले असेल - उणे १९६ डिग्री मध्ये लोखंडाची किंवा नॉर्मल स्टेनलेस स्टील ची वस्तू बुडवून बाहेर काढली तर पापड तुटावा तशी तुटते. 

इथे तर हजारो टन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वर न्यायचे आहे खालचे रॉकेट धगधगत असताना. गेल्या खेपेस जो प्रॉब्लेम होता तो असा कि ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या टाक्यांना सील करणारा जो भाग आहे तो खूप काल थंडीत राहिल्या मुळे थोडा नाजूक झाला आणि तिथून हायड्रोजन ची गळती सुरु झाली. शेवटच्या क्षणी हे लक्षात आले नि लौंच स्थगित केली. बघू तो प्रॉब्लेम सेटल झालाय का ते. क्रायोजेनिक इंजिन आता व्यवस्थित काम करते. 

क्रायोजेनिक इंजिन देखील खूप क्लिष्ट आहे. अनुक्रमे -२५३ आणि -१८५ डिग्री वर वेगवेगळे असलेले दोन तरल वायू एकत्र आणून "जाळायचे" आणि १५०० डिग्री पर्यंत क्षणार्थात नेऊन अश्या रीतीने पेटवायचे कि त्यांची उर्जा जेट-exhaust च्या रूपाने एकाच दिशेने बाहेर येईल, हि खूप गुंतागुंतीचे इंजिनियरिंग आहे. जमिनीवरच्या सगळ्या चाचण्या आता यशस्वी झाल्या आहेत. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन च्या tanks न सील करणाऱ्या द्रव्याने योग्य काम केले तर चाचणी यशस्वी होईल आणि हे तंत्रज्ञान standardize होईल. 

कावेरी जेट इंजिन

इंजिन (विशेषतः लो-बायपास जेट इंजिन) खूप खूप स्पेशल तंत्रज्ञान आहे. जगात फक्त अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, रशिया (आणि चोरून मारून चीन) यांच्या कडे हे तंत्रज्ञान आहे. हे खूप जपून ठेवलेले तंत्रज्ञान असते. एक जेट इंजिन बनवायला जवळपास ३२ engineering specializations मध्ये प्रभुत्व मिळवावे लागते. मेटलर्जी पासून इलेक्ट्रोनिक्स पर्यंत, मेकानिकल पासून एरोनोतीक्स पर्यंत, केमिस्ट्री, फोर्जिंग, वेल्डिंग, क्रिस्टल बिल्डींग, सेमीकंडक्टर, लोजीस्तीक्स. असे म्हणता येईल कि जैवतंत्रज्ञान सोडले तर उर्वरित सगळ्या इंजिनियरिंग आणि विज्ञानाच्या शाखांमध्ये एकसोबत प्रगती घडवावी लागते. 

एक कावेरी इंजिन जर व्यवस्थित हवे तसे बनले तर ३२-३५ वेगवेगळ्या नवीन इंडस्ट्री सुरु करता येतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळेल. साहजिक आहे, ज्यांच्या कडे हे तंत्र आहे, ते लोक याला खूप खूप काळजी पूर्वक जपतात. कावेरी मध्ये भारताला येत असलेला प्रॉब्लेम जेट-इंजिन च्या क्रिस्टल-ब्लेड बनवण्यात आहे. मेकानिकल डिझाईन वगैरे ठीक आहे, पण त्या खास जातीचे स्टील त्या खास पद्धतीने बनवता येत नाहीये (तोच प्रॉब्लेम विक्रांत, अरिहंत वगैरे बाबतीत आहे). आपण बनवलेल्या क्रिस्टल-ब्लेड या काही वेळा नंतर निखळून इंजिन बाहेर पडतात आणि इंजिन निकामी होते. त्या साठी थोडे अवजड इंजिन कावेरी च्या टीम ने बनवले, तर तेजस या हलक्या वजनाच्या विमानात इंजिन चे वजन हा महत्वाचा घटक असून तो कमी असावा लागतो. तात्पर्य - आपल्याला असे स्टील हवे जे वजनाने अर्धे असून शक्तीने दुप्पट आहे. 

इंजिन बनले आहे, पण ते तेजस ला आवश्यक उर्जा (कमी वजनात) देऊ शकत नाही, म्हणून तेजस ला अमेरिकन जी-ई ४१४ हे इंजिन शेवटी लावावे लागले.


यात वास्तविक कमीपणा काही नाही. भारताने औद्योगिक क्रांती मध्ये १९६० मध्ये उडी घेतली. तेव्हा आपण पाश्चात्य जगाच्या १२५-१५० वर्षे पिछाडीवर होतो. एकदम ४.५ जनरेशन (अत्याधुनिक) चे इंजिन आणि विमान बनवणे म्हणजे खूप मोठी उडी आहे. 

नामदेव ढसाळ - आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी ते राष्ट्रवादी - श्रद्धांजली

पद्मश्री नामदेव ढसाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला कुठलेच काव्य कधी फारसे समजले नाही, त्यामुळे त्यांच्या कवितेवर मी फारसे बोलणे उचित नाही. क्रियेवीण शब्दज्ञान तेची श्वानाचे वमन असे समर्थ रामदास स्वामींनी म्हंटले आहे. त्यामुळे तिथे मी मौन साधेन.

पण त्यांनी उत्तर-आयुष्यात घेतलेले निर्णय आणि मार्क्सवादापासून फारकत घेऊन संघाशी साधलेली जवळीक यामुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल फार आदर आहे. पण या आदराला कारण हे नाही कि माझा कल हिंदुत्वाकडे झुकतो. यात मला ढसाळांची दूरगामी धोका ओळखण्याची व्हिजन दिसते आणि तिला अनुसरून त्यांनी आपला पथ align केला आणि course-correction केले आणि दलित तरुणांचा एक मोठा सेक्शन मार्क्सवादी न होता राष्ट्रवादी बनला.

माझ्या एका निबंधात मी भारतात नोकझोक करून अस्थिरता पसरविण्यात हातभार लावणारे तीन जागतिक फोर्सेस बद्दल बोललो होतो. नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थर १९७२ मध्ये स्थापन केली, ती अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या धर्तीवर. 

दलित पॅन्थर चा इतिहास जाणून घ्यायला या अमेरिकन  ब्लॅक पॅन्थर पार्टी चा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. व्हिएत्नाम युद्ध सुरु असताना शीतयुद्ध कालीन सी-आय-ए विरुद्ध केजीबी युद्धाची एक कडी म्हणजे  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा उगम. हि पार्टी १९६६ ते १९८२ पर्यंत कार्यरत होती. अमेरिकेत सशस्त्र उठाव करून कृष्णवर्णीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हा या चळवळीचा एक उद्देश होता. 

एफ.बी.आय चे तत्कालीन अध्यक्ष जे.एडगर हूवर यांनी अश्या या चळवळीला खूप गंभीरतेने घेतले होते. कृष्णवर्णीय लोकांच्या बरोबरच अमेरिकेतले मूलनिवासी रेड-इंडियन्स, आणि श्वेतवर्णीय वंशवादी चळवळी ज्या अश्वेत लोकांना संपवण्यासाठी कार्यरत असायच्या (जसे कुप्रसिद्ध कु-क्लुक्स-क्लान Ku-klux-clan) या सर्वांचा भेद करायला एफबीआय ने COINTELPRO नावाचा एक प्रोजेक्ट चालवला होता. उत्सुकांनी गुगलून पाहावे. या सर्व अमेरिकी फुटीरवादी चळवळीना फूस सोव्हियत-रशियाची असायची. त्यामुळे एफबीआय ने साम-दान-दंड-भेद वाटेल ते वापरून या चळवळीच्या मध्ये आपली माणसे घुसवली आणि यांना क्षीण केले. अर्थात यातील बरेच मार्ग अमेरिकन संविधानानुसार बेकायदेशीर होते. हा प्रकल्प जरी १९७१ मध्ये बंद पडला तरी यांनी निर्माण केलेले assets आणि SOP (standard operating procedures) यांना एफबीआय पुढे वापरत राहिलीच. १९७२ पासून या  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा पडता काल सुरु झाला आणि हळूहळू करून १९८२ पर्यंत या पार्टीत केवल २७ सदस्य उरले. थोडक्यात काय तर हि पूर्ण चळवळ अमेरिकन लोकांनी आणि व्यवस्थेने संपवून पचवली, तिच्यातले मार्क्सवादी घटक बाजूला करून संपवले (बरेचदा शारीरिक रित्या संपवले) आणि उरलेले आत्मसात केले. 

१९७७ पासून  ब्लॅक पॅन्थर पार्टी अमेरिकन प्रॉब्लेम राहिली नाही. पण १९८० च्या दशकात रशियाने ने अफगाणिस्तान वर आक्रमण केले आणि शीतयुद्ध खूप मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडात घुसले. भारतात नक्षलवाद, खलिस्तान, आसाम, तामिळी वाघ (लिट्टे) इत्यादी चळवळी सुरु झाल्या होत्या. ८०च्य दशका-अखेर पर्यंत काश्मीर देखील पेटले होते. त्याच दरम्यान एक चमत्कारिक Afro-dalit project अमेरिकेत सुरु झाला. भारतातल्या दलितांच्या समस्या या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयलोकांच्या सारख्या आहेत आणि म्हणून त्यावर उपाय देखील तसाच असावा, या मताचे बरेच think-tanks भारतात पैसा ओतू लागले. या सर्व प्रकारचे पूर्ण डिटेल वर्णन राजीव मल्होत्रा यांच्या breaking india नावाच्या एका अभ्यासपूर्ण ग्रंथात आहे. यातील बऱ्याच प्रमाणात हा पैसा मिशनरी मार्फत देखील येतो. महाराष्ट्रातले एक पुरोगामी विचारवंत नुकतीच ज्यांच्यामागे बलात्कारासंबंधात पोलीस लागली होती, ते वर्ल्ड-कौन्सिल ऑफ चर्चेस यांची जागतिक परिषद अटेंड करतात यावरून हि शंकेची पाल अजून जोरात चुकचुकली.

या एफ्रो-दलित प्रकल्पाचा ब्रीद-विचार म्हणजे तोच जो मूलनिवासी लोक प्रतिपादित असतात - दलित हे मूलनिवासी आहेत, इतर सर्व आक्रांते आहेत आणि त्यांना हिसंक मार्गाने बाहेर हाकलून देण्यात यावे. हा विचार वेगवेगळ्या मार्गाने या विचाराच्या बऱ्याच संघटना, विचारक आणि प्राध्यापक भारतात बोलत असतात.  ब्लॅक पॅन्थर पार्टी च्या धर्तीवर उभारलेली दलित पॅन्थर चळवळ या विचार प्रतीपादायला आणि कार्यान्वित करायला उत्कृष्ट platform होती. विशेषतः पश्चिम भारतात जिथून मार्क्सवादास महत्प्रयासाने शिवसेनेने निष्कासित केले होते. हा विचार मुळात चूक या साठी आहे कारण हा आर्य-आक्रमण सिद्धांत या खोट्या इतिहासावर आधारित आहे. भारतात दलित हे उपेक्षित होते आणि आहेत, पण त्याची कारणे पूर्ण वेगळी आहेत. दलित हे भारतातले कृष्णवर्णीय नाहीत. दलित असो कि ब्राह्मण, दोघांचा वंश एकच आहे आणि हे आता डी.एन.ए अभ्यासावरून हळूहळू समोर येते आहे. त्यामुळे जातींच्यात वांशिक दरी निर्माण करायचे जे बीज तेव्हा पेरल्या गेले होते ते असत्य तर होतेच, ठार विघातक देखील होते. जात म्हणजे वंश (रेस) नाही. जो कुणी हे बोलतो तो पूर्ण असत्यवक्ता असतो आणि देश-विघातक शक्तींचा अजेंडा (जाणता किंवा अजाणता) पुढे रेटत असतो. अश्या कल्पनांचे जिथल्या तिथे खंडन करावे. 

ढसाळांची एक सर्वोत्तम मुलाखतींच्या पैकी एक म्हणजे नोबेल विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांच्या प्रसिद्ध ग्रंथ "इंडिया-मिलियन म्युटिनीज नाऊ". त्यात आणीबाणीच्या काळाचे आणि त्या काळातल्या आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळातल्या ढसाळांचे उत्कृष्ट वर्णन आहे. तिथे दिसते कि दलित हे भारतातले कृष्णवर्णीय आहेत या विचारात  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच दलित पॅन्थर स्थापन झाली पण तिची गत देखील हळूहळू  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच होऊ लागली. आणीबाणी नंतर नामदेव ढसाळांचे गुन्हेगारी जगतातले मित्र त्यांना पैसे देऊ लागले. अचानक ढसाळांच्या कडे १०,००० रुपये वगैरे खेळू लागले. हा काल १९७९-८० चा आहे. मी पाकिस्तानका मतलब क्या, या माझ्या निबंधात या काळाविषयी सविस्तर लिहिले आहे. अमेरिकन पैसा चर्च आणि इतर मार्गांनी भारतात खेळू लागला होता. मुंबई चे गुन्हेगारी जगात काबुल ते इंडोनेशिया या प्राचीन अफू-च्या मार्गावरचे मोठे ठिकाण आहे. जेव्हा इथल्या underworld मध्ये पैसा अचानक पंप होतो, तेव्हा या जागतिक ड्रग-रूट मध्ये काहीतरी मोठे घडते आहे हे लगेच लक्षात येते (आजकाल हे मुंबई मधल्या property मार्केट च्या रेट्स वरून कळते, असो). इच्छुकांनी हा अप्रतिम ग्रंथ आणि त्यातील ढसाळांची सुंदर मुलाखत आवर्जून वाचावी. 

आता पुढे जे मी लिहतोय तो माझा कयास आहे, आणि या बद्दल तूर्तास कुठलाही ठोस पुरावा माझ्याकडे नाही फक्त वरील तथ्यांवर आधारित हा माझा तर्क आहे. मला ठाम खात्री आहे कि १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकात, जेव्हा भारतात अनेक विघटनकरी चळवळी चालत होत्या, त्यांना रशियाचा पाठींबा हमखास असेच. नामदेव ढसाळ यांनी काळाची हि बदलणारी चक्रे खूप लवकर ओळखली. आणि पडद्याआडून हि चक्रे फिरवणारे हे खेळाडू देखील ओळखले. १९८१ च्या सुमारास ढसाळ शांत झाले नि या मार्गातले खाचखळगे ओळखले. माझ्या मते तेव्हापासूनच ते या वरील नेटवर्क पासून तुटले आणि मुख्यधारेकडे झुकू लागले. हा त्यांचा झुकाव शेवटपर्यंत टिकून राहिला. 

त्यांच्या या बदलाचे खूप मोठे परिणाम मला दिसतात. त्या कठीण काळात (अजून हि कठीण काल गेलेला नाही, पण आज भारत बऱ्यापैकी सशक्त आहे) नामदेव ढासळ यांनी हा एक conscious decision घेतला आणि मार्क्सवादापासून फारकत घेतली. भारतीय तरुणाई मध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात राग आणि उद्वेग होता (जो आता परत हळूहळू दिसू लागलाय). त्यांच्या समर्थकांमध्ये धुमसत असलेला तो राग आणि उद्वेग नक्षलवाद वगैरे कडे झुकू न देता समाजाच्या मुख्यधारेत मिसळायला त्यांनी channelize केला. त्यांना लक्षात आले कि भारतीय दलितांच्या समस्या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांहून वेगळ्या आहेत आणि त्यांचे समाधान देखील. आणि त्या समाजाच्या मुख्यधारेत येऊनच सुटतील. आणि हे देखील कि भारतीय समाज चटकन बदलत नाही, आणि एकदा बदलला कि पुन्हा पूर्वीसारखा होत नाही. त्यामुळे हि हळूहळू होणारी प्रक्रिया आहे.

इंग्रजी मध्ये म्हणतात कि Hindsight is always 20/20. म्हणजे मागे वळून पाहताना सगळेच क्लियर दिसते कारण गोष्टी घडून गेल्या असतात. माझे वरील विचार हे मला hindsight ने दिलेले आहेत. ते सगळेच त्या वेळेस ढसाळ यांना आले असतील-नसतील, वेगळे आले असतील, वेगळ्या context मध्ये आले असतील. पण त्यांच्या कर्माची आणि निर्णयांची परिणीती म्हणजे दलित तरुणांचा एक घटक जो १९७० मध्ये मार्क्सवादाकडे झुकत होता तो घटक आणि त्या घटकाची पुढील पिढी राष्ट्रवादाकडे आली. 


बऱ्याच लोकांनी ढसाळांच्या आधी शिवसेना आणि मग रा.स्व.संघाच्या जवळीकी बद्दल लिहिले आहे (चांगले-वाईट). माझ्या मते त्यांचा हा प्रवास वरील गोष्टीस सर्वाधिक पाठबळ देतो. आधी लिहिल्या प्रमाणे, मला कवितेतले फारसे कळत नाही, फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजनीती आणि इतिहास शिकायची आवड आहे. त्या दृष्टीकोनातून मला श्री. नामदेव ढसाळ यांचे योगदान कौतुकास्पद आणि खूप प्रशंसास्पद जाणवते. या साठी त्यांना माझी श्रद्धांजली. 

नरसंहार - हिटलर, युरोपीय युद्धे आणि उपखंडातली परिस्थिती.

युरोपीय युद्ध अटळ होते. जर्मनी ने फक्त सुरुवात केली, इतकेच.. युद्धात ढकलले वगैरे बोलणे फोल आहे. १८७० पासून युरोप आणि जग एका मोठ्या युद्धाकडे येत होते. फार कशाला, अगदी शेरलॉक होम्स लिहिणारा आर्थर कॉनन डॉयल याने देखील आपल्या राय्खेनबाख फॉल्स या कादंबरीत हे निरीक्षण नोंदवलेले आहे. ते युद्ध पहिल्या आणि दुसर्या युद्धाच्या रुपात झाले १९९३ पर्यंत (युगोस्लाविया विघटन) चालू राहिले. १८८० पासूनची ती साखळी १९९३ मध्ये संपली आणि युरोप शांत झाला. हिटलर च्या युद्धाचा आता तरी निष्पक्ष विचार झाला पाहिजे. हिटलर असता, अगर नसता, युद्ध अटल होते. दुसरे युद्ध हे जर्मनी-रशिया मधला अनिर्णीत सामना होता जो रशियन क्रांतीमुळे १९१७ मध्ये अपूर्ण राहिला होता. इंग्रज-फ्रेंच-अमेरिका वगैरे सगळे बाजूला बसून गंमत पाहत होते आणि सुरुवातीला तर जर्मनीला समर्थन करीत होते. त्यामुळे त्या क्लिष्ट आणि रंजक इतिहासाला इतके सिम्प्लीफाय करू नका. आणि त्या simplified इतिहासाचा वापर इथली तुमची राजकीय उणीदुणी काढायला करू नका, हि विनंती. 

अगदी तसेच युद्ध गेले ६० वर्षे आशिया मध्ये हळूहळू  बिल्ड होत आहे. भारत, सुन्नी-मुसलमान आणि चीन हे तीन कोण आहेत या संघर्षाचे. या त्रिकोणी संघर्षाला तोंड फुटणे आणि त्यात कोट्यावधी लोकांचा जीव जाणे हे अटळ भविष्य आहे. हे जर कुणी बघू शकत असेल तर दुसर्या-युद्धातल्या हिटलरच्या भूमिकेची जाणीव होईल. जर हे हळूहळू बिल्ड-होत असलेले युद्ध लोकांना दिसत नसेल तर आपले तेच होईल. आणि हे भारतात आणि आसपास जवळ येणारे युद्ध लोकांना बिलकुल दिसत नाहीये हे भारतीय लोकांच्या राजकीय आकलनावरून हे स्पष्ट होते. दोन युरोपीय युद्धांना जर महायुद्ध म्हणत असू तर उपखंडात आणि आशियात बिल्ड होणार्या युद्धास जेव्हा तोंड फुटेल त्यास काय म्हणतील, याची काळजी वाटते. 

राहता राहिली बात नरसंहाराची, तर त्याच्याहून अधिक खून इंग्रज आणि स्टालिन यांनी केले आहेत. निव्वळ भारतात १८५७ च्या नंतर कलकत्ता ते कानपूर पर्यंत गंगेच्या दोन्ही तटांवर १० किलोमीटर पर्यंत निर्मनुष्य पट्टा इंग्रजांनी तयार केला होता. इथे अंदाजे ८५ लाख लोकांना मारले होते, आणि गावे च्या गावे जिवंत जाळली होती. त्यामुळे बॉडी-कौंट हा निकष धरला तर इंग्रज आणि स्टालिन हिटलर हून खूप पुढे येतात. इंग्रजांनी  भारतात वेळोवेळी घडवून आणलेले दुष्काळ यात धरले तर हीच संख्या ७-८ कोटी पर्यंत जाते. अगदी १९४३ मध्ये इंग्रजांनी बंगाल मध्ये दुष्काळ इंजिनियर केला नि ३० लाख लोकांना मारले. त्यामुळे शिव्या सिलेक्टिव्ह नसाव्यात. पाकिस्तानी सेनेने ३०-४० लाख बंगाली हिंदूंना असेच मारले. खुद्द बांगलादेशी लोक तिथल्या हिंदूंना असेच संपवत आहेत. तुर्कस्तान ने आर्मेनिया मध्ये हेच केले. इंग्रजांनी झुलुंच्या नरसंहारात खूप लोकांना मारले (त्यात गांधीजी इंग्रजांच्या बाजूनी होते). कंबोडिया मध्ये पोल-पॉटने देखील असेच घडवले, आणि चीन ने तिबेट मध्ये हेच चालवले आहे. भारतात कम्युनिस्ट पक्षांनी बंगाल च्या अनेक जिल्ह्यांमध्ये हेच चालवले आहे.

हिटलरच्या नरसंहाराचे समर्थन कुणीच करू देखील शकत नाही इतके ते अमानुष होते. पण १८५७ नंतर इंग्रजांनी उचललेल्या पाऊलांचे समर्थन करणारे लोक सत्तेत आहेत आणि इतरत्र सुद्धा, ते निष्कलंक सुटतात. 

नरसंहार हा रास्त मार्ग आहे - असे मानणारे घटक सर्वत्र आढळतात. त्यांना समाजमान्यता देखील बऱ्याच ठिकाणी मिळते. विशेषतः त्या समाजात जिथे एक देव-एक पुस्तक-एक प्रेषित वगैरे थेरं चालतात. फक्त धार्मिक नाही, हिटलर आणि कम्युनिझम देखील यात आले. पण यांच्या हून मोठा नरसंहार हा इंग्रजांसारख्या "दुकानदार" राष्ट्राने केला आहे - तो निव्वळ नफ्याकरता. 


हे सगळे आसपास घडत असताना, गाफील राहणे नि "आम्ही पण हे करू शकतो" अशी विश्वासार्ह-धमकी देऊ न शकणारे राष्ट्र आणि समाज एकतर स्वायत्तता गमावतो किंवा नष्ट होतो.  हि धमकी देता येणे आणि गरज पडल्यास ती खरी करून दाखवता येणे हि खरी ट्रिक आहे. ती जर जमली तर कमीतकमी बळी "घेऊन" मुद्दा सिद्ध करता येतो आणि शांती आणि स्वायत्तता अबाधित राखता येते. नाहीतर पुढे ते मोठ्या प्रमाणावर करावेच लागते. 

नवा अफगाणिस्थान - भारतापुढील ऑप्शन - हे लफडं सफल होईल काय?

भारताला व भारतियांना अफ़गाण लोकांबद्दल मनात सुरवतीपासुन एक सॉफ़्ट कॉर्नर आहे. तसाच तो अफ़गाण लोकांच्याही मनात आहे.  अफ़गाण भारतियांना मित्र मानतात व आपल्याही मनात या लोकांबद्दल सहानुभुती असते. एप्रिल २०१४ ला अफ़गाणिस्तानात निवडणुका आहेत. करझाई सरकारची दुसरी टर्म संपत आलेली आहे. घटनेप्रमाणे ते परत निवडणुक लढु शकत नाहीत. नवा भिडु नव राज यायच्या बेतात आहे. आजतागयत भारतानी अफ़गाणिस्थानात प्रचंड पैसा ओतलेला आहे. खुप सुधारणा केलेली आहे.

कराराप्रमाणे परदेशी फ़ौजा या इलेक्शन आधी परत जाणार आहेत. नाटोच सैन्य जास्त दिवस राहु शकणार नाही. त्यांनाही परत जाव लगेल. शिवाय त्यांचा रोल हा ट्रेनिंग देण व फ़क्त इमर्जन्सिला प्रत्यक्ष कृती करण इतकाच असणार आहे. निवडणुका होताच परत तालिबानी अतिरेकी अफ़गाणीस्थानात कारवाया सुरु करतील.

ज्या लहान मुलांना अफ़गाणिस्तानातल्या अराजकाची, तीथे होणार्‍या हत्यांची झळ पोचली आहे. तीच मुलं आता सज्ञान झालेली आहेत. ही मुलं नवा अफ़गाणिस्तान घडवणार आहेत का ? का जुना जुलुम तसाच परत सुरु होईल अफ़गाणिस्थानात स्थिर सरकार येण हे भारताच्या  हिताच आहे. अस मला वाटत. आजतगायत जशी भारतानी अफ़गाणिस्थानला मदत केली तशीच ती पुढेही करावी अस वाटतय. पण ते शक्य आहे का? निव्वळ कॉमन-सेन्स वरून काही मते पुढे मांडत आहे. 

केलेल्या गुंतवणुकी पर्यंत जायचा रस्ता जोवर सुकर नाही, तोवर केलेली गुंतवणूक हि जुगार असते. वेगाने वाहणाऱ्या नदीच्या मधोमध जर मला २० एकर सुंदर-अप्रतिम जमीन मिळाली (एक बेट) आणि त्यात बेटात मी पैसे गुंतवले तर मला फायदा होईल का? जोवर मी तीथर पोहोचायला बोट घेत नाही (पण वेगाने वाहणाऱ्या नदीत होडी कितीशी उपयोगी?) किंवा एक स्थायी पूल बांधत नाही, तोवर ती गुंतवणूक हि बुडीत खात्यात धरावी. 

अफगाणिस्थान आणि भारत तसेच काहीसे आहे. जोवर पाकिस्तानस आपण संपवत नाही, तोवर अफगाणिस्थान मधील गुंतवणूक पाकी किंवा इराण च्या भरोश्यावर असार आहे. 

तिथवर पोहोचायचा राजमार्ग म्हणजे लाहोर-पिंडी-अटक-पेशावर-काबुल. 
दुसरा मार्ग म्हणजे ग्वादर-क्वेट्टा-बोलन खिंडीतून कंदाहार-काबुल. 
तिसरा मार्ग म्हणजे चाहबहार देलाराम - कंदाहार-काबुल हा इराण मधला मार्ग (हा हायवे भारताने बांधला आहे). 
चौथा मार्ग म्हणजे जम्मू-उरी-पूंच-मुझफ्फराबाद-स्वात-काबुल. 
पाचवा मार्ग म्हणजे जम्मू-श्रीनगर-कारगिल-गील्गीत-वाखान-काबुल.

आता या पाच पैकी ४ आणि ५ हे दुर्गम ठिकाण (हिमालय) असल्यामुळे तिथून मार्ग बनवणे आणि तो टिकवणे कठीण आणि खर्चिक. अधिक मार्ग ४ आणि ५ सिद्ध व्हायला पाकव्याप्त काश्मित जिंकावा लागेल. उरले पहिले तीन पर्याय.

मार्ग १ हा सर्वार्थाने सोपा आणि फायदेशीर मार्ग आहे. पण त्यासाठी पाकी-पंजाब जिंकून (किंवा अनुकूल करून) अंकित करावा लागेल. हे व्हायला पाकी सेना आणि तिथले मुल्ला-मदरसे-जिहादी नेटवर्क पूर्णपणे संपवावे लागेल. आणि तो भूभाग २०-३० वर्षे धरून ठेऊन जमल्यास तिथल्या जनतेचे शीख-हिंदू पंथांमध्ये मतांतरण करावे लागेल. मोठी इन्व्हेस्टमेंट आहे पण हिचे फायदे खूप दूरगामी आणि मोठे असतील. अर्थशास्त्रात याला "rich dividends" मिळवून देणारा ऑप्शन म्हणता येईल. 

दुसर्या मार्ग हाती यावयास बलुचिस्तान जिंकावा किंवा अंकित करून अनुकूल करावा लागेल. इथे गुंतवणूक (पंजाब च्या तुलनेने) कमी आहे पण चीन शी उघड सामना संभवतो आणि मध्ये सिंध असल्यामुळे भारत-बलुचिस्तान logistics सांभाळणे कठीण होईल. तरी श्रेयस्कर मार्ग. हे व्हायला देखील पाकी सेनेचा पूर्ण विनाश आवश्यक आहे, पण पंजाब धरून ठेवण्यात येणारा खर्च इथे कमी असेल. तुलनेने बलुचिस्तान आणि बलुची लोक भारतास अनुकूल आहेत.

तिसऱ्या मार्गाची वाजपेयींनी निवड केलेली आहे. इराण चे चाहबहार बंदर आणि इथून कंदाहार पर्यंत मोठा राजमार्ग भारताने बांधून तयार केलेला आहे. पण मनमोहनसिंह यांच्या कारकिर्दीत इराण नीती होय होय-नाय नाय अशी राहिल्या मुळे इराण-भारत संबंध दुरावले आहेत. त्यामुळे हि गुंतवणूक कधी फलदायी ठरेल हे सांगणे कठीण आहे. अधिक इराण काही पाकिस्तान नाही, ती एक प्राचीन आणि स्वायत्त संस्कृती आहे. ती आपल्या मर्जीवर आपल्याशी वागेल आणि रशियाला अनुकूल घेऊन वागावे लागेल.

अफगाणिस्थान हा "अहिगणस्थान" आणि "गांधार" आहे आणि होता. तो हातचा जाऊ देणे मूर्खपण आहे हे शास्त्र सांगते. पण तिथवर पोहोचायचा मार्ग ताब्यात नसल्या कारणाने एका मर्यादे पलीकडे हि चर्चा निव्वळ पुस्तकी ठरते. 

कसे आहे कि, तुम्हाला पोरगी हवी आहे, पोरीला पण तुम्ही हवे आहात पण तिच्या पर्यंत पोहोचता येत नसेल तर काय फायदा या मोहोब्बतीचा? पोरगी गुपचूप येईल त्या नवऱ्यासोबत नांदू लागेल. तो नवरा या वेळेस चीन असेल. या विवाहात चडफडत बसण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. 

उपाय : कॉस्ट-बेनेफिट स्टडी

वरील पाच मार्ग या समस्येवरील उपाय आहेत. प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते, एक किंवा अनेक फायदे असतात, आणि एक किंवा अनेक साईड-इफेक्ट असतात. प्रत्येक निर्णय मोजावी लागणारी किंमत आणि मिळणारा फायदा यावर घ्यावा लागतो.

वरील पाच मार्ग हे पाच पर्याय आहेत. पाच हि पर्यायांचे काही किंमत आहे, आणि काही फायदे आहेत. पंजाब जिंकणे, ताब्यात ठेवणे आणि लोकसंख्येला परत हिंदू करून घेणे (क्रमशः) हा खूप  महाग पर्याय आहे. पण जर ती किंमत मोजायची तयारी भारताची असेल तर भारत ती नक्कीच मोजेल. 

यातील सर्वात सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग (मार्ग क्रमांक तीन - इराण मार्गे अफगाणिस्थान) भारताने ऑलरेडी निवडलेला आहे. इथे किंमत कमी आहे आणि फायदा देखील कमी आहे. मार्ग क्रमांक १ मध्ये किंमत अधिक आहे आणि फायदा खूप अधिक आहे. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक जण आणि देश आपापले निर्णय घेत असतो. आणि आज एक निर्णय घेतला म्हणजे भविष्यात इतर मार्ग निवडणार नाही, असे होत नाही. सोयीनुसार देशांच्या नीती बदलतात.

माझ्या मते काश्मीर आणि गील्गीत जिंकून त्या मार्गे अफगाणिस्थान पर्यंत पोहोचणे खूप अधिक खर्चिक आहे कारण भूगोल बिकट आहे. पंजाबचा मार्ग तुला वाटतो तितका महाग नाही (आहे, पण काश्मीर-मार्गे अफगाणिस्थान हा सर्वात महाग मार्ग असेल). जर चोख तयारी करून, योग्य वेळ निवडून आपल्या सोयीनुसार आणि पाकिस्तान च्या पूर्ण गैरसोयीनुसार निकराची लढाई केली तर पंजाब खूप सहज पडेल. 

पंजाब च्या सपाट भूमीवर आक्रमण करणे खूप सोपे आहे. काश्मीर-गील्गीत मध्ये हेच आक्रमण खूप वेळखाऊ आणि महाग पडेल. कारगिल ची लढाई म्हणूनच महागात पडली. १९६५ मध्ये तिथे लढायच्या भानगडीत आपण पडलोच नाही, सरळ लाहोर वर आक्रमण केले आणि २ दिवसात लाहोरची उपनगरे आपल्या ताब्यात आली. तीच लढाई अजून आठवडा-दीड आठवडाभर चालली असती तर मुलतान, हैदराबाद, कराची, आणि पिंडी च्या आसपास सेना पोहोचली असती.  काश्मीर-गील्गीत भाग निर्मनुष्य असताना जिंकायला २-३ महिने लागतील. लढता-लढता ६/७ महिने, ते देखील खूप रक्त सांडून आणि पैसा खर्चून.

खरी ट्रिक पंजाब धरून ठेवणे हि आहे. ते देखील सलग २०-३० वर्षे, कडक अंमलाखाली. जवळपास आणीबाणी सदृश परिस्थितीत. तेव्हा २०-३० वर्षांच्या नंतर ची पिढीच्या मनातला विखार कमी होऊन ती पिढी इतर भारतीयांशी मिसळायच्या लायकीची होईल. होल्डिंग टाईम खूप अधिक आहे, मोठी गुंतवणूक आहे ती. पण जर फळास आली तर खूप मोठा आणि स्थायी फायदा होईल. धंदा म्हंटले कि चढणे आले आणि बुडणे देखील आले. आणि युद्ध हा राजकारणाचा एक भाग आहे आणि राजकारण व्यापारावर चालते. जेव्हा हा पर्याय निवडून होणारा नफा या गुंतवणुकीहून कैकपटीने अधिक आहे हे भारताला पटेल आणि तितके सामर्थ्य वाढेल, हा निर्णय भारत एका पायावर घेईल. 

मराठे पंजाबात का गेले

तो मुलुख जर २/३ वर्षे धरून ठेवला असता तर कोट्यावधीचा महसूल मिळाला असता. पंजाब १९ महिने मराठ्यांनी राखला सुद्धा. अब्दाली हरला असता तर मराठ्यांची return of investment लगेच सुरु झाली असती. तीच गोष्ट इथे पण.

मराठे जिंकले आणि वाढले कारण त्यांचे military-industrial complex तगडे होते. आजच्या अमेरिकेसारखे. क्रेडीट वर युद्ध करायचे, सेना उभारायची, मोहीम करायची आणि जिंकल्यावर ज्याने मोहिमेला फायनान्स केले त्याला नफ्याचा वाटा द्यायचा - अमेरिकेचे हेच आजचे मॉडेल आहे. हे मॉडेल सेनेच्या आणि पुणे-दरबार च्या विश्वासार्हतेवर चालायचे. विचार कर ज्या सावकारांनी राघोबाला इतक्या दूरवरच्या मोहिमेला फायनान्स करायचे ठरवले आणि ३-४ वर्षे गुंतवणूक परत मिळणार नाही हे माहिती असताना देखील गुंतवणूक केली, तर मराठी सेनेची विश्वासार्हता किती असेल, ते विचार कर. 

तशी विश्वासार्हता जेव्हा भारतीय सेनेची बनेल, मार्ग-१ लगेच उपलब्ध होईल. 


भारत मराठ्यांकडून शिकत नाही. स्वतःला इंग्रजांचा आणि मोगलांचा उत्तराधिकारी म्हणवतो पण इस्ट-इंडिया-कंपनी देखील अशीच वाढली, हे लक्षात घेत नाही. मोगल लुटीवर वाढले. पण मराठे आणि इंग्रज याच मिलिटरी-फायनान्स कॉम्लेक्स वर वाढले. भारताला वाढायचे असेल तर हि वृत्ती आणि हे स्वदेशी मिलिटरी-इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स निर्माण करून ते वाढवावे आणि जतन करावे लागेल. 

सार्वभौमत्व आणि गुप्तचर्य

सध्या जगात थोडेफार "सार्वभौम" म्हणता येतील असे फक्त ६-७ शक्ती आहेत... या देखील संपूर्णपणे "सार्वभौम" नाहीत.. सूची सार्वभौमत्वाची उतरती यादी आहे)

१. नाटो (यात सर्व पाश्चात्य देश आले - अमेरिका, कानेडा, पश्चिमी युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू-झीलंड, दक्षिण कोरिया, जपान, तैवान, सिंगापूर, थोड्याफार प्रमाणात इस्राईल आणि दक्षिणपूर्व आशिया) - याची दोरी सी-आय-ए च्या हातात आहे.
२. चीन (पी.एल.ए - पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांचे मिलिटरी इंटेलिजन्स)
३. रशिया (पूर्वीचे केजीबी आताचे एफ.एस.बी) आणि इस्राईल
४. इराण
५. पाकिस्तान (मनो या न मानो)
६. भारत
७. ब्राझील

इस्राईल दोन ठिकाणी टाकता येईल. मोसाद वगैरे तसे पहिले तर अमेरिकेच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही. इस्राईल हा तगून आहे कारण इस.१२०० नंतर पूर्वेचा खुष्कीचा मार्ग १९२० मध्ये उघडला. तुर्कांनी जेरुसलेम आणि १४०० मध्ये इस्तंबुल जिंकल्यावर पूर्वेचा दरवाजा पश्चिमेसाठी बंद झाला तो १९२३ मध्ये उघडला. ८०० वर्षे झालेला कोंडमारा पश्चिम विसरलेली नाही. तो महत्प्रयासाने उघडलेला दरवाजा आणि सुएझ कालव्यावरचा ताबा हाती राहावा म्हणून इस्राईल १९४८ मध्ये बनवले. १९२०-४८ तो भाग इंग्रजांची वसाहत होता. 

म्हणून इस्राईल च्या बहुतेक नीती अमेरिकेला अनुसरून असतात. बऱ्याच वेळेस इस्राईल स्वतंत्र नीती राबवते आणि अमेरिकेस ऐकण्यास भाग पाडते कारण ज्यू लोकांच्या ताब्यात मोठमोठ्या बँक आहेत (बार्कले, जे.पी.मॉर्गन, लेहमन ब्रदर्स, रॉकफेलर, रॉथचाईल्ड, गोल्डमन साक्स, एच.एस.बी.सी, इतर बरेच. खुद्द इस्ट इंडिया कंपनी मध्ये रॉथचाईल्ड घराण्याचा मोठा सहभाग होता, असो). म्हणून इस्राईल दोन ठिकाणी आहे. अर्थात हि यादी माझी आहे. माझ्या माहितीवर आणि कल्पनाशक्तीवर आधारित आहे. त्यामुळे यावर किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

युरोप मधील सर्व देश आणि शक्ती १९९० नंतर पूर्णपणे अमेरिकेच्या कह्यात आहेत. अर्थात अमेरिका हि इंग्लंड ची उत्तराधिकारी आहे (१९४१ पासून). एम.आय.६ ला एफ.बी.आय चे अधिकारी पाठवून सी.आय.ए सुरु करण्यात आली. उत्सुक लोकांनी "द गुड शेफर्ड" हा रोबर्ट दिनिरो चा चित्रपट बघावा. हा इतिहास थोडाफार समजेल. 

भारताची "आय.बी" हि इंग्रजांच्या एम.आय.५ वर आधारित आहे, तर १९६८ मधली रॉ थोडीफार सी.आय.ए  सारखी बनवली आहे. यात केजीबी चा देखील मोठा सहभाग होता. बांगलादेश चे युद्ध हा सी.आय.ए आणि केजीबी यांच्यातील जगभर चालणाऱ्या युद्धाचा एक भाग होता. 

सार्वभौमपणे भारताने घेतलेले निर्णय तसे विरळा आहेत. १९७४ ची अणुचाचणी, १९९८ ची अणुचाचणी, सियाचीन १९८४, ऑपरेशन पराक्रम, २००१, श्रीलंकेतले आयपीकेएफ १९८७, ऑपरेशन ब्रासटाक १९८६ (हे मोसाद सोबत केलेले एक ऑपरेशन होते असे म्हणतात जे आय.एस.आय ने अमेरिकेच्या सहाय्याने हाणून पाडले.) तीच गोष्ट २००१ च्या ऑपरेशन पराक्रम ची जे देखील अमेरिकेने हाणून पाडले. बाकी बहुतेक गोष्टी भारताकरवी "करविल्या" गेल्या आहेत (अगदी १९७१ चे युद्ध सुद्धा).. अर्थात सगळेच म्यानेज केलेले नसते, थोडीफार फ्रीडम असतेच, ती कशी फायद्याची करायचे हे त्या वेळेसच्या नेतृत्वाच्या कर्तुत्वावर ठरते. म्हणून ७१च्या इंदिरा गांधी, सबंध नरसिंह राव आणि जून २००२ पर्यंतचे वाजपेयी हे उत्कृष्ट पंतप्रधान अनुक्रमे ठरतात. 

आय.एस.आय चा रेकॉर्ड रॉ आणि आय.बी पेक्षा खरंच चांगला आहे. याला कारण त्यांना भारतात एजंट सहज मिळतात. प्रत्येक अशी एजन्सी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या "background" विषयी सजग असते. रॉ मध्ये, आयबी मध्ये वरिष्ठ पातळीवर विशिष्ट प्रदेशातले "हिंदू" असतात असे दिसते. हे आयबी पेक्षा रॉ मध्ये जास्त आढळते. सीआयए मध्ये आंग्लवंशीय प्रोटेस्टंट गोरे असतात, मेक्सिकन आणि गोरे काथोलिक देखील घेत नाहीत. चीन मध्ये हान वंशीय मध्य चीन मधले लोक असतात. पाकिस्तानात ग्रांड-ट्रंक रोड (लाहोर ते पिंडी) या भागातले पंजाबी बरेलवी पंथाचे लोक वरिष्ठ पदावर असत (आता बदलत आहे, म्हणून प्रॉब्लेम सुरु झाला आहे). 

तर योग्य पार्श्वभूमी आणि योग्य त्या माणसाची शिफारस नसेल तर सहसा वरच्या पदावर जाता येत नाही, विशेषतः या फिल्ड मध्ये. हे थोडे जुने संदर्भ आहेत. आता गोष्टी बदलू लागल्या आहेत आणि हे घडणारे बदल आता समाजात देखील दिसत आहेत. डोळे उघडे ठेऊन बघणे आवश्यक आहे. 

पाकिस्तान हा भारत केंद्रित आहे. पण भारतास शत्रू तीन प्रकारचे आहेत (तीन ग्लोबल फोर्स). कमीअधिक प्रमाणात या तीनही शक्तींशी भारत युद्धरत आहे. या तीन शक्तींचे आधुनिक (१९४५ नंतरचे स्वरूप) सीआयए, केजीबी आणि आयएसआय होते. १९९० नंतर केजीबीची जागा चीन ने घेतली आहे. या चौकोनाच्या तीन कोनांशी वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या संदर्भात शत्रुत्व आणि मैत्री आणि न्युट्रल असणे ही तीनही रीस्पोंस भारत दाखवत आला आहे. हे तीन कोण देखील भारताविषयी असेच रीस्पोंस दाखवत राहतात.

हे तीन शत्रू यासाठी आहे कारण भारताला अजून "स्वत्व" सापडलेले नाही. "भारतीय" असणे म्हणजे काय हो भाऊ? हा भारतीय या सिनेमातला प्रश्न खूप बोचरा आणि खरा आहे. माझ्या मते भारतीय असणे म्हणजे धार्मिक संस्कृतीचा असणे. या संस्कृतीच्या रक्षणासाठी वाटेल ते करणे हे भारतीय गणराज्याचे एकमेव कर्तव्य असले पाहिजे, असे मला वाटते. यालाच मिडिया वाले हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात..  पण नेहरूप्रणीत व्यवस्थेला हे पटत नाही. म्हणून, पुलं म्हणतात तसे भारताची परराष्ट्रीय नीती "होय होय, नाही नाही" अशी नेहमी असते. 

एक प्रश्न - उत्तर भारतात झालेला विजेचा मोठा झोल यात चीन मधून आणून लावलेले transponder bugged होते म्हणून झाला नसेल कशावरून

ऑपरेशन पराक्रम सुरु असताना गोध्रा मध्ये ट्रेन कशी जाळली आणि त्याच्या ३ आठवडे पूर्वी धमकी मुशर्रफ ने कशी काय दिली? यांवर विचार केला कि कोण किती पाण्यात हे कळते. यावरून त्यांचे इथले पेनेट्रेशन आणि आपले तिथले पेनेट्रेशन किती याची कल्पना येते आणि कोण अधिक "सार्वभौम" या प्रश्नाचे उत्तर देखील मिळते. 

ऋग्वेदात असलेल्या या श्लोकाने (जो आपण रोज आरती नंतर अर्थ न समजता म्हणतो, तो लिहून मी हा लेख संपवतो). उत्सुकांनी गुगल करून याचा अर्थ शोधावा..

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं 
समंतपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति 
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो 
मरूतस्यावसन् गृहे ।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

ख्रिस्ती आणि मुस्लिमांमध्ये असलेला ज्यू विरोध - कारणे आणि इतिहास - २०११ मधील लेख

१. ज्यूंचा द्वेष मुस्लीम आणि ख्रिस्ती खूप करतात. ज्यूद्वेष्ट्या ख्रिस्त्यांची संख्या अमेरिकेत प्रचुर आहे. अगदी हॉलीवूड मधले मोठमोठे लोक यात आहेत. मध्यंतरी मेल गिब्सन असे काही जाहीररित्या बोलला होता. 

२. जगात जे काही वाईट घडते ते ज्यू झायोनिस्ट घडवतात हे मानणारे खूप गोरे ख्रिस्ती आहेत. बहुतांश मुस्लीम देखील हे मानतात. भारतीय उपखंडातील मुस्लीम ज्यू लोक आणि हिंदू (त्यातल्यात्यात ब्राह्मण) एकत्र मिळून कारस्थाने रचतात वगैरे पण बोलतात. पाकिस्तानात हे गेले ४-५ दशके सुरु आहे. भारतात देखील हे रुजले आहे. मुंबईचे माजी पोलीस उपयुक्त हसन मुश्रीफ यांनी लिहिलेल्या  "हू किल्ड करकरे" या पुस्तकात अशीच आगपाखड केलेली आहे.

३. वास्तविक भारतात ब्राह्मणविरोध हा खूप जुना आहे. स्वतः वेदांतदेखील याचे दाखले आहेत (यज्ञ आणि इतर कर्मकांड करणाऱ्या समाजाचा विरोध). नास्तीकात देखील बुद्ध, महावीर, अनेक संत (ज्यात जन्माने ब्राह्मण असलेले देखील आहेत असे), सुधारक वगैरेंनी हा विरोध केला आहेच. पण हा विरोध जेव्हा राष्ट्रद्रोही शक्ती करू लागतात किंवा त्या असल्या लोकांचे सहाय्य प्राप्त करू लागतात तेव्हा लंका आतून फोडणारा विभीषण कोण, याची ओळख पटते. 

४. तसलीच गोष्ट ज्यूविरोधाची आहे. फरक हा आहे, कि आपल्याकडचे ऋषी, संत, विचारक वगैरे मंडळी "राजकारणी" नव्हती. कारण भारतीयांची मानसिक "ऑपरेटिंग सिस्टीम" जिला आपण "धर्म" म्हणतो त्या धार्मिक व्यवस्थेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ अगदी आधीपासून वेगळे ठेवल्या गेले आहेत, अगदी कटाक्षाने. मध्यपूर्वेच्या व्यवस्थेत हे अगदी १८व्या-१९व्या शतका पर्यंत शक्य नव्हते. त्यामुळे ज्युद्वेश हा नेहमी राजकीय आणि सामरिक रुपात प्रकट झाला आहे. धर्म (याला सनातन धर्म पण म्हणतात) हा मूलतः "सेक्युलर" आहे. सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे - रिलीजन आणि स्टेट चे सेपरेशन... म्हणजेच धर्म-अर्थ आणि मोक्ष यांचे सेपरेशन.  धर्म म्हणजे घटना, न्याय, code of conduct,  आचारसंहिता... 

५. ख्रिस्ती आणि मुस्लीम ज्यूंचा द्वेष का करतात याची एक कथा आहे. आणि ती कथा आधुनिक काळात मूलनिवासी किंवा संभाजी बिग्रेड वाले, किंवा द्रमुक वाले, कांचा इलाईया वगैरे मंडळी ब्राह्मणांचा द्वेष का करतात, याच्याशी थोडीबहुत सिमिलर आहे. 

६. ज्यू म्हणजे अब्राहम याची परंपरा. त्या कालानुरूप त्यांचे जे विचार, घटना, संहिता, समज वगैरे होते ते सगळे बायबल च्या जुन्या करारात नमूद केलेले आहे. हळूहळू हे "एका ईश्वरास" मानणारे अब्राहम चे वंशज कालांतराने "एकाच ईश्वरास" मानू लागले. म्हणजे जसे आपल्याकडचे वैष्णव विष्णूला आराध्य मानतात, इतर देवांना विष्णूचे सहकारी मानतात, पण त्यांचे अस्तित्व नाकारत नाहीत. तसेच याह्वेह या देवतेला पूजणाऱ्या संप्रदायाचे लोक कालांतराने याह्वेह हाच एकमेव ईश्वर आहे, असे मानू लागले. हे लोक इजिप्त मध्ये राहायचे. त्याकाळी तिथे तिथला राजा (ज्याला फेरोह म्हणतात) तो ईश्वर असतो, असा तिथल्या लोकांचा समज होता. अब्राहम च्या सांगण्यावरून ज्यूंनी याह्वेह हा त्यांचा प्रमुख देव आहे हे म्हणणे सुरु केले आणि म्हणून त्यांची इजिप्त मधून हकालपट्टी झाली. पुढे मोझेस (अरबी मध्ये मुसा) च्या नेतृत्वाखाली या लोकांनी ४० वर्षे सिनाई च्या वाळवंटात भटकून जो आजचा इस्राईल तिथे पोहोचले.

७ .पूर्व (भारत) आणि प्राचीन ग्रीस आणि रोम यांच्यातील व्यापाराचा एक महत्वाचा बिंदू म्हणजे जेरुसलेम (हिब्रू मध्ये येरुशलाईम). वाळवंटात हा एक सुपीक ओएसीस आहे आणि जवळच जॉर्डन नदी डेड सी (मृत समुद्र) ला मिळते. इथे पारशी लोकांची सत्ता होती आणि कानान नावाची टोळी या संपूर्ण जॉर्डन नदीच्या परिसरात वास्तव्यास होती. पारशी राजे यांचा संप्रदाय हा खूप वैदिक श्रौत संप्रदायाशी मिळताजुळता आहे.

८. प्राचीन भारतात किंवा "आर्यावर्तात" (जो इराण पासून ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला होता, अनेक आर्य लोक राज्य करीत असत. हा महाभारताच्या पूर्वीचा काळ आहे जेव्हा सरस्वती नदी पूर्ण भरात वाहायची आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीची शहरे हळूहळू वासू लागली होती. तेव्हा पंजाबात भरत नावाचे लोक वसत. त्यांचा राजा सुदास आणि पुरोहित वशिष्ठ ऋषी होते. कुभा नदी (आजची काबुल) आणि त्या आसपास इतर आर्य लोक राज्य करीत. चामयाननावाच्या आर्यप्रमुखाच्या नेतृत्वाखाली आणि गाधी नावाच्या वैदिक राजाचा मुलगा "विश्वामित्र" ज्याने क्षात्रवर्ण सोडून ब्राह्मण वर्ण पत्करला होता, त्याच्या पौरोहित्याखाली दहा राजांची एक युती बनवली. हे राजे आजच्या अफगाणिस्तान आणि भारतानजीकच्या इराण (थोडक्यात सिंधू च्या पश्चिम तीरावर असलेले) इथले होते. या युतीने पंचनद वर आक्रमण केले. इंद्राच्या मदतीने आणि वशिष्ठाच्या पौरोहित्य मुळे इथला राजा सुदास याने परूष्णी नदीच्या तीरावर (म्हणजे रावी नदी, आजच्या लाहोर जवळ) या दहा राजांच्या सैन्याचा एकत्रित पराभव केला आणि सप्तसिंधू चे रक्षण केले. याला दाशराज्ञ युद्ध म्हणतात.

९ .या आक्रमक अश्या दहा टोळी मध्ये "अनु" नावाचे एक लोक होते. याच अनु वरून "यवन" हा शब्द आला आहे. कालांतराने हे लोक मुस्लीम झाले आणि अनार्य झाले कि गोष्ट पुढची. पण स्वतः इराण हे नाव "आर्यानाम वाजैः" या पारशी म्हणीवरून पडले आहे. याचे संस्कृत रूप म्हणजे आर्यानाम वासैः - आर्यांचे वसतीस्थान. भारतावरील इराणी आर्यांचे आक्रमण भारतीय आर्यांनी परतवून लावले (पुढे अनेकदा). पण यांची पश्चिमेकडे सत्ता ग्रीस पर्यंत पोहोचलेली. येरुशलाइम चा भाग यांच्याच ताब्यात होता. 

१०. जेव्हा मुसा येरुशलाइम जवळ पोहोचला त्याने ज्यूंना हुकुम सोडला कि कानान जातीचा निर्वंश करा. तेव्हा एक खूप मोठा नरसंहार करून ज्यूंनी इस्राईलची भूमी हस्तगत केली. आणि पुढे तिथे त्यांच्या सोलोमन (अरबी मध्ये सुलेमान) नावाच्या राजाने याह्वेह देवतेचे मोठे मंदिर बांधले. 

११. या घटनेनंतर ज्यूलोकांनी परत असा हिंसाचार केल्याचे वाचनात नाही. पण यांनी हा हिंसाचार ईश्वराचे अधिष्ठान समजून आणि "अविश्वासू लोकांना" आपल्या देवाने केलेली शिक्षा असे म्हंटले आणि इथून "काफिर" कि संकल्पना उद्भवली. 

१२. वर मुद्दा क्रमांक ८ मध्ये उल्लेखिलेल्या इराण आणि दाशराज्ञयुद्धाचा संबंध काय हे वाचकांना वाटत असेल. तर याचे उत्तर मुद्दा क्रमांक ६ मध्ये आहे. इराणी आर्य यांच्यातील अनु या टोळी मध्ये झरतुष्ट्र नावाचे ऋषी उद्भवले. साधारण बुद्धाच्या ५०० वर्षे अगोदर. वैदिक आर्यांच्यात असेल्या अनेक देवतांपैकी त्यांनी "अहूर माझदा" नावाच्या देवतेला सर्वोच्च स्थान दिले. इथे अहूर म्हणजे असुर. माझदा म्हणजे नक्की कोण हे माहिती नाही पण बहुतेक महादेव या शब्दाचे पारशीकरण आहे. हा पारशीलोकांचा महादेव म्हणजे आपला रुद्र किंवा शंकर हे कळावयास मार्ग नाही. दुसरे एक दैवत म्हणजे यम ज्याला पारशीभाषेत जमशेद म्हणतात. असो. भारतात प्रचलित असलेल्या सर्व संकल्पनांचे विपरीत संदर्भ प्राचीन पारशी जीवन पद्धतीत सापडतात. भारतात चांगल्या शक्तींना आपण देव म्हणतो, इरणात ते वाईट शक्तींना देव म्हणत. इथे आपण असुर म्हणजे वाईट समजतो, तिथे अहूर हे चांगले गण आहेत. बाकी मित्र, वरुण, इंद्र, अग्नी वगैरे सगळे देव (कि अहूर) तसेच आहे. आपल्यासारखा यज्ञ ते लोक करतात. वर्णव्यवस्था आहे (होती). जानवे घालीत (अजूनही घालतात, पण उलटे). यांनी हळूहळू अहूर माझदा हा प्रमुख देव आणि इतर सगळे सहकारी हि कल्पना सुरु केली. अहूर माझदाचे उपासक "स्वर्गात" जातील आणि अनुपासक नरकात. स्वर्ग आणि नरक या संकल्पना याच पारशी झारतुष्ट्रीय प्रणालीने जगाला दिल्या आहेत. भारतात या संकल्पना खूप उशिरा आल्या आणि कर्मसिद्धांत प्रचलित असल्यामुळे इथे स्वर्ग आणि नरक कायमचे नसतात. वेळ संपली कि दोन्ही सोडून जीव परत जन्म घेतो, हि मान्यता.

१३. पण हीच संकल्पना पश्चिमेत या यहुदी (ज्यू) लोकांनी उचलली आणि याह्वेहचे हळूहळू आराध्यदेवतेपासून एकमात्र ईश्वर असे रुपांतर झाले. अब्राहमच्या काळात याह्वेह एक प्रमुख देव होता (अहूर माझदा किंवा वैष्णवांच्या अथवा शैवांच्या विष्णू/शिवासारखा). पण मुसाच्या काळात आणि त्यानंतर प्रमुख देवाचे रुपांतर एकाच खऱ्या देवात झाले आणि यास न मानणारे हे काफिर ठरले आणि कानान च्या नरसंहारानंतर काफरांचे भविष्य एकच - ते म्हणजे मौत आणि नंतर नरक (कायमचा - कयामत पर्यंत आणि त्यानंतर देखील). 

१४. येरुशलाइमला वस्ती केल्यावर हे लोक भारत-चीन आणि पश्चिम (ग्रीस-रोम-फिनीशिया) वगैरे भागातील व्यापारातले केद्रबिंदू बनले आणि मालदार बनले. इराणच्या राजांनी मुद्दा क्रमांक १० मध्ये वर्णिलेल्या प्रसिद्ध सोलोमनने बांधलेल्या याह्वेह मंदिरांना तीन वेळेला तोडले. दोन वेळेला ज्यूंनी ते परत बांधले. नंतर त्यांची सत्ता जाऊन तिथे रोमन सत्ता आली आणि त्या मंदिराची फक्त एक भिंत आज येरुशलाइम मध्ये उभी आहे. ती भिंत आज समस्त ज्यूंसाठी पवित्र स्थान आहे. तिथे हे तुटलेले मंदिर परत बनेल या भविष्यावर विसंबून. तिथे आज अल-अक्सा म्हणून मशीद आहे जे पूर्वी एक चर्च होते.

१५. इराण आणि रोम यांच्यात चालू असलेल्या संघर्षात यांनी ज्युलियस सीझर च्या आक्रमणापुढे नमते घेऊन रोम चे मांडलिकत्व पत्करले आणि तेव्हा पासून ज्यू पाश्चात्य "शक्ती"च्या अंकित राहिले. यापुढे त्यांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व १९४८ मध्येच आले आणि आताही ते पश्चिमेच्या "अंकित" आहेत. असो. तो मुद्दा वेगळा.

१६. हा जो "एकेश्वरवाद" ज्यूंनी शोधला, त्याला रिफाईन केले ते येशू ख्रिस्ताने आणि नंतर मोहम्मद ने. या दोघांनी "काफिर" हि संकल्पना क्रमशः प्रगत केली. तसे पाहिले तर ज्यू लोक स्वर्ग मानीत नाहीत, फक्त नरक मानतात आणि याह्वेह हा एक खरा ईश्वर नाही असे म्हणणारा नरकात जातो असे मानतात. ख्रिस्त्यांनी स्वर्ग देखील आणला आणि एकेश्वरास (म्हणजे याह्वेला) न मानणारा नरकात जातोच, पण मानणारा स्वर्गात जातो हा इंसेंटीव जाहीर केला. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या ४०० वर्षानंतर एक "बायबल-नवा करार" नावाचा ग्रंथ सरकारमान्य झाला. येशूच्या आयुष्याबद्दल सांगणारे अनेक समकालीन पुरावे (किंवा बखरी) होते. यांच्यातील चार अश्या बखरी निवडल्या ज्या ख्रिस्ताचे देवत्व सिद्ध करतात. इतर सगळ्या बखरी ज्या त्या सिद्ध करीत नाहीत त्यांना नाकारले. हे ज्या संमेलनात ठरले त्याला कौन्सिल ऑफ नीस असे म्हणतात. 

१७. ख्रिस्त हा देव आणि देवपुत्र दोन्ही आहे. देव म्हणजे एकमेव ईश्वर याह्वेह. हे जो मानतो तो इ.स ४०० नंतर ख्रिस्ती अशी व्याख्या प्रचलित झाली आणि रोमन काथोलिक चर्च प्रस्थापित झाला. ज्यू लोकांनी येशूला याह्वेह म्हणणे नाकारले आणि पुरावा म्हणून बायबलचा जुना करार दाखवू लागले. आता ख्रिस्त्यांना बायबलच्या जुना करार नाकारून चालणार नाही कारण याह्वेह आणि त्याचे एकेश्वरत्व तिथूनच आलेले आहे. जर जुना करार नाकारला तर ईश्वराचे अस्तित्वच नाकारले जाईल. म्हणून ती जुनी अब्राहामाची परंपरा ख्रिस्त्यांना हवी असते. पण त्या परंपरेचा निष्कर्ष म्हणजे येशू ईश्वरपुत्र नाही, हे मान्य नाही. 

१८. हे सगळे करणारे रोमन साम्राज्यातले मोठे कर्तेधर्ते होते. ज्यात स्वतः रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन हा होता. यानेच नीस ची कौन्सिल बोलावली, रोमन साम्राज्याचा अधिकृत रीलीकन ख्रिस्ती केला आणि सोयीनुसार हवे ते बदल करून घेतले. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीस आणि रोम चे सर्व सणवार तसेच ठेऊन त्यांना नवीन नाव देण्यात आले. उत्तरायण सुरु होण्याच्या सणाचे युरोपात फार महत्व आहे. सध्या तो २२ डिसेंबर ला असतो, पण त्याकाळी तो २५ डिसेंबर ला येई. (पृथ्वीच्या अक्ष स्वतःभोवती फिरतो, तसे ऋतू बदलतात. जसे पानिपतच्या वेळेस मकर संक्रांत १० जानेवारीला येई, विवेकानंदाच्या वेळेस १२ ला, आजकाल १४ला आणि हळूहळू १५ ला होते आहे, तसे). जुन्या करारानुसार ख्रिस्ताचा जन्म उन्हाळ्यात झाला होता. पण नवीन करार हा जन्म डिसेंबरमध्ये घेऊन आला.

१९. तीच गोष्ट इस्लाम ची. "अल्ला" हि अरबस्तानातल्या कुरेशी टोळी ची कुलदेवी. त्यांच्या चंद्र अथवा सोम या देवतेचे स्त्रीरूप. मोहम्मद ने याच "अल्ला" या देवीचा संबंध ज्यूंच्या याह्वेहशी जोडला. अल्ला "पुरुष" झाला आणि मोहम्मद त्याचा शेवटचा प्रेषित. प्रेषितांची मालिका एडम (आदम) पासून सुरु होऊन अब्राहम (इब्राहीम), मोझेस (मुसा), येशू (इसा) करत करत मोहम्मद पर्यंत येऊन थांबते. ज्यू लोक या निष्कर्षाला नाकारतात कारण जुन्या करारात हे असले काही नाही. मुस्लिमांना जुना करार "खोटा" आहे हे म्हणणे शक्य नाही करण मग मोहम्मद कुरणात जे काही बोलला ते देखील खोटे ठरते. पण ज्यू जो पर्यंत आहेत तो पर्यंत जुन्या करारावरती हक्क गाजवता येत नाही. 

२०. जुना करार आणि त्यातील प्राचीन परंपरेचे आपण एकमेव वारसदार आहोत हे सिद्ध करायची चढाओढ ख्रिस्ती आणि मुस्लीम लोकांमध्ये लागली असून ती गेली १४०० वर्षे अविरत सुरु आहे आणि यामध्ये फरफट झाली ती ज्यू लोकांची. 

२१. आता आपल्याला वाटेल कि यात भांडण्यासारखे काय? हा प्रश्न यासाठी पडतो कारण आपण याकडे आपल्या भारतीय दृष्टीने विचार करतो कि मोक्षमार्गाचा वारसा सांगायला इतकी कुतरओढ का? कारण आपण हे विसरतो कि या व्यवस्थेत भारताप्रमाणे मोक्ष आणि अर्थ वेगळे नाही होऊ शकत. या मोक्ष मार्गाचे निमित्त घेऊन कत्तली झाल्या, साम्राज्ये बनली आणि मोडली, गुलामगिरी आली, वसाहतवाद उद्भवला, आजची सर्व अर्थव्यवस्था उदयास आली. हे सगळे या व्यवस्थेत institutionalize झाले आहे. व्यवस्थेचा मूलभूत भाग. यावर मनापासून विश्वास ठेवणारे लोक अमेरिकेसारख्या अथवा इंग्लंड आणि रोमन साम्राज्य, तुर्की खिलाफत, मुघल साम्राज्य, नादिरशाह चे इराणी साम्राज्य वगैरे आजी-माजी साम्राज्यांमध्ये कार्यरत राहून अर्थनीती, युद्धनीती, परराष्ट्रनीती, गृहनीती इत्यादी ठरवल्या आहेत. चढाया केल्या आहेत. 

२२. जर हा हक्क सोडला तर या सगळ्या आजी-माजी नीतीच फोल ठरतील. म्हणून या दोन संप्रदायातील लोकांना ज्यू नको आहेत पण त्यांची परंपरा हवी आहे. ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ला ज्यूंनी घडवले हि वावडी जगात सगळे वाईटसाईट कारस्थानी ज्यू श्रीमंत व्यापारी घडवतात हे पश्चिमेतली खूप पॉप्युलर दंतकथा आहे, त्याचाच एक हिस्सा आहे. मुस्लीम जगतात देखील हि दंतकथा होती आणि १९४८ नंतर हळूहळू हिला लोकमान्यता प्राप्त होऊ लागली. याला कारण देखील आहे. इंग्लंड आणि फ्रांस मधील ज्यू व्यापाऱ्यांनी जमिनी हळूहळू विकत घेऊन आजचा इस्राईल बनवला. खूप रोचक इतिहास आहे तो, पण तो पुन्हा कधी. त्यामुळे मधली काही शतके दबून असलेला मुस्लिमांचा ज्यूविरोध परत उफाळून आला आणि आता तर त्याला भरती येत आहे. 

२३. वर मुद्दा क्रमांक ३ आणि ५ मध्ये मी याची तुलना मूलनिवासी किंवा संभाजी बिग्रेडी टाईपच्या लोकांच्या ब्राह्मणविरोधाशी का केली हे वरील मुद्द्यांवरून समजेलच. ती आयडिया तिथे चालली तर भारतात देखील चालेल हा तिथल्या "सूत्रधारांचा" गैरसमज आहे. म्हणूनच लक्ष्मण माने टाईप चे लोक वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्च चे सभासद वगैरे होऊन तिथे हिंदूंना आणि ब्राह्मणांना शिव्या काय घालतात, पोलीस आयुक्त मुश्रीफ पाकी लोकांसारखे बोलू काय लागतात, त्यांना संभाजी बिग्रेड समर्थन काय देते, मग पाकिस्तानात २६/११ चा मुंबई हल्ला ब्राह्मणांनी घडवला, हेमंत करकरेंना संघाच्या आणि आयबी च्या ब्राह्मणांनी मारले ते देखील इस्राईलच्या ज्यूंची मदत घेऊन हि असली धेडगुजरी वावडी काय उठवण्यात येते, तिला भारतात पॉप्युलर करणारे उच्चपदस्थ लोक पुढे काय येतात, हे सगळे एकमेकात गुंतलेले आहे. जसा ज्यूद्वेष ख्रिस्ती आणि मुस्लीम व्यवस्थेत institutionalize झाला आहे, तसाच ब्राह्मणद्वेष भारतात institutionalize करायचा हा प्रयत्न आहे. 

२४. काही चांगल्या लोकांना हे समजले आणि त्यांनी लेखणी शांत केली. खरा विरोध ब्राह्मणांना किंवा "ब्राह्मण्याला" नसून त्याच्या झालेल्या दुरुपयोगाला आहे. जर तो दुरुपयोग झाला नसता आणि जातीने ब्राह्मण असलेले काही लोक "माजले" नसते तर जे अत्याचार झाले ते झाले नसते. खरा प्रॉब्लेम तो "माज" आणि ती वृत्ती आहे, जात नव्हे. हे काही लोकांना समजले आहे आणि ते असल्या खेळात बाहुले होणे नाकारतात. 

२५. उरलेले काही जाणूनबुजून बाहुले होतात कारण त्यांचा निहित राजकीय आणि आर्थिक स्वार्थ, तर काही लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ख्रिस्ती आणि मुस्लीमात असलेल्या ज्यूद्वेष्ट्यांचे देखील हेच दोन प्रकार आहेत. 


सध्याच्या जगात, इस्राईल हा भारताचा मित्र आहे. आणि ज्यू हे हिंदूंचे मित्र आहेत. जर इस्राईल नष्ट झाले अथवा ज्यू तिथून परत हाकलल्या गेले तर भारतावर पुन्हा बिकट परिस्थिती येईल.