Sunday, 21 May 2017

भारताची थ्री-स्टेज थोरियम अणुसाखळी.

१. थोरियम-२३२ हे विघटनशील मूलद्रव्य नाही. पण त्याची मात्रा युरेनियम हून अधिक आहे. त्यामुळे आर्थिक गणित सोपे होते.

२. युरेनियम हे मूलद्रव्य दोन अणुभारात सापडते - २३८ (हे ९९.३% आहे आणि विघटनशील नाही) आणि युरेनियम-२३५(हे एकूण युरेनियमच्या ०.७% आहे आणि विघटनशील आहे. सर्व जुनी तंत्रे आणि पहिले अणुबॉम्ब याच युरेनियम-२३५ पासून बनवलेले आहेत.

३. इथे प्रॉब्लेम हा आहे कि एक तर युरेनियम-२३५ फक्त ०.७% आहे. युरेनियम-२३५ ला युरेनियम-२३८ पासून वेगळे करणे म्हणजे डोक्याला शॉट देणारी प्रक्रिया आहे (खूप मोठे आणि खूप काळ चालणारे centrifuges बांधावे लागतात- त्यामुळे खर्च वाढतो). दुसरा प्रॉब्लेम असा कि युरेनियम विघटनामुळे तयार होणारी मूलद्रव्ये देखील किरणोत्सारी असतात - त्यामुळे विघटीत युरेनियम चे करायचे काय - हा खूप मोठा प्रश्न आहे ज्याचे उत्तर कुणाचकडे नाही. लोक त्या किरणोत्सारी कचऱ्याला लिटरली खड्डा करून पुरून ठेवतात. हजारो वर्षांनी तो कचरा सुरक्षित होईल. तोवर त्याला पुरून ठेवायचा.

४. या प्रॉब्लेमला वळसा म्हणून काही लोक युरेनियम-२३५ ऐवजी यु-२३८ ला प्लुटोनियम-२४० मध्ये रुपांतर करून प्लू-२४० ला विघतक म्हणून वापरू लागली. प्लू-२४० अतिशय उत्कृष्ट विघटक आहे - इतके चांगले कि त्याच्या पासून बॉम्ब बनवणे खूप सोपे आहे..

५. थोरियम चा हा फायदा कि ते यु-२३८ पेक्षा खूप अधिक मात्रेत उपलब्ध आहे. त्याचे byproducts म्हणजे नॉर्मल शिसे (lead) असते जे घातक नसते. त्याच्या पासून बॉम्ब बनवता येत नाही. त्यामुळे फक्त चांगल्या कारणासाठी थोरियम चा उपयोग होऊ शकतो आणि स्वस्तात देखील.

६. प्रॉब्लेम असा आहे कि थो-२३२ विघटनशील नाही. म्हणून भारताने थ्री-स्टेज प्रक्रिया डिझाईन केलेली आहे. इथे पहिल्या स्टेज मध्ये नैसर्गिक युरेनियम चे प्लू-२३९ मध्ये रुपांतर होते. पहिली स्टेज ची प्रक्रिया जवळपास सर्व जुन्या अणुभट्ट्या करतात - जसे तारापूर, कल्पक्कम इत्यादी - जिथे जिथे PHWR (pressurized heavy water reactor) हि संयंत्रे बसवलेली आहेत ती सगळी ऊर्जानिर्मिती बरोबरच युरेनियम-२३८ चे प्लू-२३९ मध्ये रुपांतर करत असतात. दुसऱ्या स्टेज मध्ये हे प्लू-२३९ वापरून थोरियम-२३२ चे युरेनियम-२३३ मध्ये रुपांतर करण्यात येते. हि प्रक्रिया करणारे अणुसंयंत्र कल्पक्कम येथे कार्यरत आहे. या संयंत्राचे नाव PFBR (prototype fast-breeder reactor) असे आहे. तिसऱ्या स्टेज मध्ये थोरियम-२३२ आणि युरेनियम-२३३ हे मिश्रण वापरून उर्जा बनते. यु-२३३ विघटीत होऊन अजून थो-२३२ ला यु-२३३ बनवते आणि साखळी स्वयंचालित होते. यातील पहिले दोन स्टेज चे तंत्रज्ञान भारताने विकसित केलेले आहे. तिसऱ्या स्टेजचे डिझाईन प्रक्रिया सुरु आहे. या संयंत्राचे नाव AHWR (advanced heavy water reactor) असे असून याचे डिझाईन मुंबई च्या Trombay येथील भाभा-अणुसंशोधन केंद्र (BARC) येथे सुरु आहे.

७. भारत सोडून अन्य कुणीही हि थोरियम-थ्री स्टेज सायकल विकसित करत नाहीये.

८. यासाठी पहिल्या स्टेप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात युरेनियम लागते. भारतात युरेनियम फार कमी आहे. जितके आहे, तितक्यातून आपल्याला भरपूर बॉम्ब बनवायचे आहेत, अणुपाणबुड्या, अणु-विमानवाहक नौका इत्यादी(रक्षाक्षेत्रात) बनवायचे आहे. त्यामुळे पहिल्या स्टेज मध्ये जाणारे युरेनियम प्लू-२३९ बनल्यावर दोन प्रवाहात विभाजित होते आणि पुढील स्टेप्स (रक्षा आणि उर्जा - दोन्ही कडच्या) खोळंबतात. म्हणून बाहेरून युरेनियम विकत आणणे गरजेचे आहे. बाहेरून विकत घेतलेले  युरेनियम हे आपण फक्त उर्जा निर्मिती साठीच वापरू, रक्षा-उपयोगासाठी नाही- हा करार आपण केलेला आहे. यामुळे आपले भारतातले युरेनियम शस्त्रउत्पादनासाठी मोकळे होते.

९. तिसरी स्टेज पूर्ण विकसित झाली कि मग आपली युरेनियम साठीचे अवलंबित्व कमी होईल. हे होण्यास अजून २० वर्षे तरी आहेत. तोवर भारताला खूप मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. जिथून मिळेल तिथून, जितक्यात मिळेल तितक्यात, जितकी मिळेल तितकी वीज हवी आहे.

तस्मात जैतापूर (आणि तत्सम प्रकल्प) अत्यावश्यक.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर - काही मते.

श्री संजय क्षीरसागर यांच्या या quote केलेल्या फेसबुक धाग्याला उत्तर देताना या पोस्ट ची निर्मिती झाली आहे. क्षीरसागरांचे मूळ पोस्ट इथे quote करीत आहे आणि खाली माझे उत्तर आहे. 
स. १८५७ च्या बंडाविषयीचे काही प्रश्न :-

(१) बंडखोरांनी दिल्लीच्या मोगल बादशाहीचे पुनरुज्जीवन का केले
(२) बंड झालेल्या ठिकाणचे सैनिक दिल्लीलाच का गोळा होत होते ?
(३) स. १८५७ चा उठाव पूर्वनियोजित मानला गेला तर संभाव्य लष्करी हालचाली लक्षात घेऊन रसद पुरवठा, दारुगोळा निर्मिती याविषयी काही उपाययोजना करण्यात आली होती कि नाही ?
(४) बंडखोर शिपाई इंग्रजांच्या तालमीत कवायती युद्धपद्धती शिकले होते व त्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांचा पराभव केला होता मग असे हे बहाद्दूर मुठभर इंग्रजांच्या समोर पराभूत कसे झाले ? तोफा - बंदुका दोन्हीकडे होत्या व त्यांचा वापर करण्याचे ज्ञानही उभयतांना होते मग बंडखोरांचे नेमके कुठे चुकले ?
(५) स. १८५७ चा लढा पूर्वनियोजित होता तर उठाव झाल्यावर सैनिकांच्या हालचाली विस्कळीत का झाल्या ? कित्येक ठिकाणी संस्थानिकांवर नेतृत्व लादण्यात आले तर कित्येक इंग्रजधार्जिणे राहिले. असे का ?
(६) उठावाचा टापू सीमित राहण्याची मुख्य कारणे कोणती ? उठावाच्या काही वर्षे अलीकडेच इंग्रजांनी शिखांचे स्वतंत्र राज्य धुळीस मिळवले होते तर ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या काही लष्करी तुकड्यांचा पराभव केला होता. तरीही शीख, शिंदे हे इंग्रजांच्या पक्षाला का चिटकून राहिले ?

इच्छुकांनी Parag Tope चा ग्रंथ आवर्जून वाचावा.. Operation Red Lotus: The Untold Story of the War of 1857 हे त्या ग्रंथाने फेबु पेज आहे. अप्रतिम संशोधन आहे. किंबहुना हि दिलेली लिंक तर वाचकांनी आवर्जून वाचावी. अप्रतिम संकेतस्थळ आहे. 

१. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे थोडक्यात मराठा मॉडेल पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न होता. ते मराठा मॉडेल जे महादजी शिंदेंनी १७८८ मध्ये अस्तित्वात आणले. तसे पाहिले तर मोगल बादशाही मराठ्यांवर १७३७ पासून कमीअधिक फरकाने विसंबून होती. पण १७८८ मध्ये ते ऑफिशियल झाले आणि मोगल बादशाह ला पेन्शन ठरली. थोडक्यात १८५७ चे इंग्रज-भारतीय युद्ध १८०२ पूर्व राजकीय समीकरण पुन्हा प्रचलित करायचा भारतीयांचा प्रयत्न होता. 

२. मुद्दा क्रमांक १ मध्ये दिलेली भूमिका लक्षात घेतली कि इतर प्रश्नांचे उत्तर मिळत जाते. अगदी पेशावर पासून बंगाल पर्यंत सैनिकांच्या coordinated हालचाली होत होत्या. 

३. १८५७ ला एक वैश्विक कारण देखील आहे. ते म्हणजे कापूस-व्यापारअफू-व्यापार आणि या दोन व्यापारांचे आपसातले समीकरण. याच सुमारास चीन मध्ये अफूचे दुसरे युद्ध सुरु होते आणि अमेरिकेत गृहयुद्ध होण्याच्या सीमेवर होते. अमेरिकन कापूस आणि दक्षिण अमेरिकन चांदी यांचा जागतिक अर्थव्यवस्थेत शिरकाव झाला होता आणि या दोन्ही गोष्टींवर भारताची असलेली "मोनोपोली" मोडीत निघाली होती. 

४. अमेरिकेतली दक्षिण-राज्ये (ज्यांना गृहयुद्धात confederation म्हणतात) तिथे कृष्ण-वर्णीयलोकांची गुलामी प्रचलित होती आणि गुलामांच्या करवी खूप स्वस्त कापूस जगात पंप होत असे. या व्यापाराला इंग्रजांचा वरदहस्त होता. 

५. या उलट चीन मध्ये सुरु असलेल्या अफू च्या युद्धात इंग्रजांचे खूप मोठे सैन्य अडकले होते. 

६. भारतात चपात्या आणि रक्त-कमळ यांची अदलाबदल तेव्हा सुरु झाली होती (१८५६ च्या आसपास). बैजाबाई शिंदे यांनी मथुरेत यज्ञ आयोजिला (माझा प्रवास लिहिणारे गोडसे भटजी याच यज्ञास मथुरेला जात होते - मराठीत ली पहिली प्रवासवर्णनात्मक डायरी असे या ग्रंथाला म्हणता येईल). शिंद्यांच्या मर्जीतल्या सावकारांनी या युद्धाला बऱ्यापैकी फंडिंग देखील केले होते. 

७. अफूचे दुसरे युद्ध चीन मध्ये जोर घेत होते. या सर्व परिस्थितीचा आढावा बहुदा भारतीयांनी घेतला असावा असा अंदाज आहे. अझिमुल्ला खानाला नानासाहेबांनी इंग्लंड ला धाडले तेव्हा तिथे अमेरिका आणि चीन मधल्या इंग्रज फौजांची स्थिती त्याच्या लक्षात येत होती. इस्तंबूल येथे असताना त्याने क्रायमिया (Crimea - सध्या रशिया-युक्रेन वादात गाजत असलेले) तिथे जाऊन इंग्रज फौजांची वाईट हालत देखील बघितली होती. 

८. इंग्रजांनी क्रायमिया मधून वगैरे माघार घेतली होती (जिंकल्यानंतर) आणि तिथे त्यांचे सैन्य थोडे मोकळे झाले. दरम्यान अमेरिकेतले दक्षिणी राज्य जिथे कापूस उगवतो - तिथला कापूस इंग्लंड-फ्रांस-जर्मनी-रशिया या चार देशातल्या एकूण कापूस गरजेचा ७०-८०% हिस्सा भागवत होता (१८३५ च्या अगोदर हा रोल भारताचा होता). १८३५ पासून हळूहळू अमेरिकेचा कापूस इंग्रज घेऊ लागले आणि त्यांना भारतीय कापसाची गरज भासेनाशी झाली. त्यांनी तेव्हा भारतीयांना नीळ आणि अफू पेरायला लावणे भाग पाडले आणि भारतातला अफू चीन ला विकत घ्यायला लावणे भाग पाडले (पहिले अफूचे युद्ध १८४२ च्या सुमारास झाले). 

९. वरील सगळी परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कारण हि परिस्थिती अझिमुल्ला खान आणि पर्यायाने पेशवे यांच्या ध्यानात आलेली होती. 

१०. अफूचा व्यापार हा इंग्रजांचा सर्वात फायदेशीर व्यापारापैकी होता आणि तो वाचवणे कंपनी ला अत्यावश्यक होते. इंग्लंड मधले उच्चभ्रू लोक अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांचे साठी होते (स्वस्तात कापूस मिळतो आणि भारताची सुपीक जमीन अफू उगवायला रिकामी मिळते), म्हणून त्यांनी गुलामगिरी कडे पूर्णतया दुर्लक्ष केले. क्रायमिया मध्ये रिकामे झालेले सैन्य चीन ला पाठवायला सुरुवात केली. (दीड-दोन लक्ष सेना होती हि). या कापसाच्या राजकारणाला कॉटन डिप्लोमसी म्हणतात. 

११. याच सुमारास भारताने स्वातंत्र्ययुद्धास सुरुवात केली. अपेक्षा हि होती कि कारण इंग्लंड ने मोठी सेना चीन मध्ये commit केलेली आहे आणि जहाजांचा ताफा सिंगापूर पर्यंत पोहोचला आहे, इंग्लंड प्रथम चीन कडे लक्ष देईल आणि इथे भारतीयांना मोकळा वेळ मिळेल. 

१२. सुरुवातीची सगळी लढाई भारतीयांनी व्यवस्थित जिंकली. दोन गोष्टी मात्र चुकल्या. एक म्हणजे इंग्रजांनी ब्रह्मदेशातली सेना भारताकडे आणली आणि चीन कडे जाणारी बहुतांश सेना जी सिंगापूर च्या पुढे गेली होती तिला परत भारतात आणले. क्रायमिया आणि इतरत्र युद्धाचा मजबूत अनुभव असलेली हि सेना भारतात पावसाळ्यानंतर उतरू लागली (कलकत्त्यात). दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांनी कलकत्ता ते कानपूर हा पूर्ण पट्टा गंगेच्या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूस दहा किलोमीटर पूर्णतया निर्मनुष्य केला. 

१३. चपाती आणि रक्तकमळ यांचे हे गणित होते कि गावकरी सैनिकांना रसद पुरवीत. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात इंग्रज करतील (इंग्रजी रेकॉर्ड सांगतात. विचार करा किती कोटी लोकांना मारले असेल आणि किती गावे उध्वस्त केली असतील). 

१४. जसजसा हा पट्टा निर्मनुष्य बनत केला तसतसे इंग्रजी सेना निर्धोकपणे बोटीने गंगेच्या मार्गाने आतपर्यंत येऊ लागली (जसे कानपूर). 

१५. शिखांचा प्रश्न वेगळा आहे. शिखांच्या काही निवडक तुकड्या युद्धात सामील होत्या. पण बहुतांश शीख पुरभैय्या लोकांवर डूख धरून होते (पुरभैय्या सैनिकांच्या मदतीने शिखांचा प्रभाव कंपनीने केला होता म्हणून). शिंदे दोन्ही बाजूने खेळत होते. नानासाहेबांना आणि तात्या टोपेंना बहुतांश फंडिंग शिंदेंच्या मर्जीतल्या सावकारांनी केलेले आहे. बैजाबाई शिंदेंचा रोल हा आतून बराच स्वातंत्र्ययोद्धांना सांभाळणारा होता - याचे पुरावे टोपे यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेले आहेत. 

१६. भारतीय स्वातंत्र्ययोद्धयांकडे शस्त्रास्त्रे सगळी होती. नव्हते ते त्या शस्त्रास्त्र चालू ठेवायला लागणारे military-industrial complex. त्यामानाने इंग्रजांनी जेव्हा चीनला जाणारे मोठे सैन्य भारताकडे वळवले तेव्हा प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आणि रसद आली.  भारतात कापूस त्यामानाने कमी बनत होता (कारण इंग्रजांनी अफू पेरायची भारतीयांवर केलेली सक्ती) - इंग्रजांना अमेरिकेतला कापूस प्रचुर प्रमाणात उपलब्ध होता (युद्धात कापसाचे महत्व अनन्यसाधारण आहे - कापड आणि जखमी सैनिकांच्या उपचारात). King Cotton हा एक प्रसिद्ध नारा होता तेव्हाचा. 

१७. भारतीयांच्या दृष्टीने हे एक राजकीय युद्ध होते. मोरे जिहाद वगैरे म्हणू देत - सहभाग घेणाऱ्या  आम-मुसलमानांसाठी हा जिहाद असेल हि. पण पेशवे (इतर सगळे नवाब लोक हे १८०२-पूर्व भारतात पेशव्यांच्या (म्हणजेच मराठ्यांच्या) अंमलाखाली असत जरी नावाला सगळे मोगल बादशाह ला मुजरे करत). या decision-maker लॉबी साठी हे युद्ध राजकीय युद्ध होते. मुख्य सत्ताकेंद्र हातात घेतली कि इंग्रज (तेव्हा इंग्रज पण नव्हते - कंपनी होती) यांची legitimacy नाहीशी होईल - हे गणित दिसते. कंपनी नरसंहार करील आणि भारतावर सर्वंकष युद्ध (total war) पुकारेल हे कुणाला वाटले नसावे. सर्वंकष युद्ध वर्षानुवर्षे खेळायला तितके develop असलेले औद्योगिक सेक्टर हवे. भारताची handloom आधारित अर्थव्यवस्था अश्या प्रकारचे "industrial" युद्ध औद्योगिक शक्ती विरुद्ध वर्षानुवर्षे चालवू शकत नाही. 

१८. १८५५-१८६४ या नौ वर्षात जगात तीन मोठी युद्धे झाली. चीन मधले दुसरे अफूचे युद्ध, भारताचे स्वातंत्र्यसमर आणि अमेरिकन गृहयुद्ध. इतर हि झाली (जसे तुर्की रशिया, इंग्रज यांचे क्रायमिया चे युद्ध - पण ते या मुद्द्यास अनुलक्षून संबंधित नाही. मुद्दा असा कि वरील तीनही युद्धात ब्रिटन (किंवा त्यांनी समर्थित केलेला पक्ष) जिंकला कारण पुढील पक्ष हा कृषी-आधारित होता, औद्योगिक नव्हता. 

१९. चीन-भारत-USA मधील दक्षिणी राज्ये > हे तीनही पक्ष industrialized नव्हते. यांच्या विरोधात असलेले ब्रिटन-ब्रिटन-USA मधील उत्तरी राज्ये हे मोठ्या प्रमाणात औद्योगिक होते. 

२०. प्जाताजाता गमतीची गोष्ट म्हणजे ब्रिटन ने प्रथम दक्षिणी राज्यांचे समर्थन केले (प्रत्यक्ष गृहयुद्ध सुरु व्हाय्च्या आधी). पण १८६२ येई पर्यंत पलटी मारली आणि दक्षिणी राज्ये घर-के-ना-घाट-के राहिले. 


२१. क्रायमिया-भारत-चीन-अमेरिका या चार ठिकाणी आपसात गुंतलेले राजकारण इंग्रजांनी छान खेळले आणि एक एक करून सगळीकडे विजयश्री संपादिली. हि चार युद्धे यांनी इंग्रजांची जागा जागतिक राजकारणात अशी ठसवली कि १९४५ पर्यंत जवळपास संपूर्ण जगावर इंग्रजांनी एकछत्री राज्य केले. अमेरिकेतले गणित थोडे चुकले नाहीतर १८६१-६२ मध्ये USA ची फाळणी करून त्यांनी त्यांचा अश्वमेध पूर्ण केला असता. ओव्हरऑल जगाच्या सुदैवाने उत्तरी राज्ये खमकी निघाली आणि USA एकसंघ राहिला.

निर्भय क्षेपणास्त्र

निर्भय क्रूज क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राच्या निमित्ताने बऱ्याच प्रकारची तंत्रज्ञाने विकसित झाली.. या गोष्टी उघड कुणी बोलत नाही, पण इंजिनियरिंगची आवड असेल (शिक्षण आवश्यक नाही) तर जितके प्रसिद्ध झाले आहे त्यावरून बरेच कयास बांधता येतात..

१. हे क्षेपणास्त्र हवेत "रेंगाळू" शकते.. रेंगाळणे हाच उचित शब्द आहे. इंग्रजीत यास loitering म्हणतात. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर हे क्षेपणास्त्र टार्गेट भोवती घिरट्या घालते, चाचपणी करते, ठोकायचा योग्य angle चे मोजमाप करते आणि मग टार्गेट ला ठोकते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - "रेंगाळणारे क्षेपणास्त्र" हे इंजिनियरिंग मधले बऱ्याच प्रगत तंत्रांपैकी एक आहे. कारण हे रेंगाळणे म्हणजे क्षेपणास्त्र स्वतःचे तात्कालिक निर्णय स्वतः घेते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्यातल्या AI (artificial intelligence) हा प्रकार हे निर्णय घेण्यास सक्षम असतो - केंद्रीय कमांड-सेंटर ला तो निर्णय घ्यावा लागत नाही.

२. ब्राह्मोस आणि निर्भय च्या लौंच मधील फरक म्हणजे दोन्ही क्षेपणास्त्रे उभी लौंच होतात आणि एक उंची गाठल्यावर आडवी होतात (मग रॉकेट गळून पडते आणि जेट इंजिन सुरु होते). मात्र उभ्याचे आडवे होताना ब्राह्मोस मध्ये क्षेपणास्त्राच्या शिर्षाशी काही लहान इंजिन्स लावले असतात. कुठलाही ब्राह्मोस लौंच व्हिडियो मध्ये हे दिसते. निर्भय मध्ये खालचे एकाच रॉकेट इंजिन क्षेपणास्त्राला उभ्याचे आडवे करते. इथे दोन्ही विडीयो दिले आहेत. उभे ते आडवे हा दिशा-बदल मधील फरक बघा. मी जे सांगतोय जे जाणवेल.

ब्राह्मोस लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=cUVMsuLW2EE

निर्भय लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=sqaEFatUIXU

भारताने विकसित केलेले तंत्र - इंजिन मध्ये थ्रस्ट व्हेक्टरिंग (thrust vectoring) हा प्रकार असतो. मराठीत भाषांतर कठीण आहे पण खालची रॉकेट-मोटर जे बळ (फोर्स) पृथ्वीवर (अर्थात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणबळावर) विरुद्ध दिशेने प्रयोग करते (न्यूटन चा तिसरा नियम) त्या बलाची दिशा ती मोटर बदलू शकते. बलाची दिशा बदलली कि क्षेपणास्त्राची दिशा (जी बलाच्या विरुद्ध असते) ती देखील बदलते. बोलायला सोपे आहे हे - पण १००० डिग्री-सेल्शियस (किंबहुना जास्तच) तापमानावर वेगाने जळणाऱ्या इंधनाची दिशा झटपट बदलणे (क्षेपणास्त्र crash न होऊ देता) एक मोठे तंत्रज्ञान आहे. सुखोई-तेजस वगैरे विमानांमध्ये आपण हे तंत्र विकसित केलेले आहे. पण त्या इंजिन्स चा व्यास मोठा असतो. निर्भय च्या जेट इंजिन चा व्यास खूप लहान आहे (तुलनेने). तेजस मधील तंत्राचे miniaturization यात भारताने यशस्वीरीत्या केलेले दिसते. 

३. क्षेपणास्त्राचा पथ कमांड सेंटर ने ठरवलेला असतो. एकदा तो मार्ग फीड केला कि क्षेपणास्त्र त्या मार्गावर चालते आणि टार्गेट ला ठोकते. निर्भय च्या यात्रेच्या पहिल्या दहा बिंदूंची माहिती आधीच फीड केलेली होती. पण अकरावा बिंदू फीड केलेला नव्हता. ती माहिती अकराव्या बिन्दुजवळ निर्भय पोहोचल्यावर शास्त्रज्ञांनी प्रसारित केली. निर्भय ने ती प्रसारित केलेली माहिती अनुसरून मार्गात यथोचित बदल केला. याचा अर्थ निर्भय ला आता भारतीय सेना जॉयस्टिक सारखी लांब बसून खेळवू शकते. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर काही नवीन माहिती मिळाली आणि दिशा वगैरे बदलायची असेल तर शेवटच्या क्षणी देखील निर्भय ला प्रोग्राम करता येते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - यात इस्रो ने गेल्या वर्षी सोडलेल्या रुक्मिणी (GSAT7) आणि IRNSS या दोन व्यवस्थांची परिपक्वता दिसते. याचा अर्थ भारताने संपूर्ण भारतीय उपखंडाचे उपग्रहीय-mapping जवळपास पूर्ण केलेले आहे हे दिसते. 

४. रेंगाळणारे क्षेपणास्त्र याचे आणखीन एक फलित म्हणजे याची खरी रेंज काय हे कोणालाच माहिती नाही. सरकार ने जाहीर केलेल्या माहिती नुसार "खूप वेळ रेंगाळून निर्भय ची रेंज १००० किमी आहे".. पण न रेंगाळता किती किमी आहे हे जाहीर केलेले नाही. म्हणजे वस्तुतः क्षेपणास्त्र खूप अधिक रेंज चे आहे. खूप अधिक.. दुप्पट असल्यास नवल नाही.

५. निर्भय ने ७० मिनिटात १०५० किमी प्रवास केला हे सरकार ने जाहीर केले - मग हे क्षेपणास्त्र "सब-सोनिक" (subsonic - म्हणजे ध्वनीच्या गती पेक्षा हळू चालणारे) कसे? कारण निर्भय ने पहिले ३०० किमी १० मिनिटात पार केले (ध्वनीच्या दीडपट गतीने - 1.46 mach) असे डी.आर.डी.ओ च्या पत्रकार परिषदेत सांगितले. म्हणजे निर्भयचे रेंगाळणे धरून सब-सोनिक.. न रेंगाळता निर्भय सुपर-सोनिक.. :) 

६. जमिनीपासून १०-१५ मीटर च्या उंचीवरून निर्भय उडते. त्यामुळे कुठल्याही रडार मध्ये ते दिसू शकत नाही. झाडे, डोंगर वगैरे उंचवटे यांना वळसा घालून जाणे - हि इंजिनियरिंग ची चांगली प्रगती दर्शविते. कारण हि सगळे अस्त्रे युद्धकाळातल्या धामधूमी साठी बनवलेली आहेत. १००० किमी दूर उडताना समोर झाड आले तर कंट्रोल-केंद्राशी संपर्क तुटू न देता स्वतःहून नवीन मार्ग calculate करणे आणि समोरील अडथळा वळसा घालून किंवा ओलांडून पार करणे - इम्प्रेसिव अभियांत्रिकी..

इतर बऱ्याच गोष्टी आहेत - मटेरीअल सायन्स, इलेक्ट्रोनिक्स, ballistics, खूप काही. एक टेक्नोलॉजी विकसित होते म्हणजे त्या सोबत असंख्य आधारभूत तंत्रे विकसित झालेली असतात. निर्भय च्या विकासात ७०-१०० वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या लहानमोठ्या टेक्नोलॉजी विकसित झाल्या असतील. कम्प्युटर प्रोगामिंग पासून पेंट कुठल्या केमिकल चा असावा (वेगवेगळी रसायने रेडियो लहरींना म्हणजे रडार ला वेगवेगळ्या प्रकारे interact करतात. रेडियो लहरींना फार जास्त परावर्तीत न करणारे पेंट आणि मटेरीअल आवश्यक असतात). तीच गोष्ट इंधनाची. इंजिन ची. पंखांची (रेंगाळतांना पंखाने दिशा बदलावी लागते). 

छान बातमी. अभियांत्रिकी मध्ये छान विकास झालेला बघून बरे वाटते. अभियांत्रिकी आणि प्युअर सायन्स हे खरे प्राणवायू आहेत देशाचे. बाकी टाईमपास आहे.

इंजिनियरिंग करणाऱ्या पोट्टे-पोट्टी हो, इंजिनियरिंग-पदवी घेऊन फिल्ड बदलू नका. पदव्युत्तर इंजिनियरिंग करा, त्यात पी.एच.डी करा. एम.बी.ए करून पैश्यांच्या मागे लागू नका हो.. पैसा आज न उद्या येईल, कुठे जातोय.. आवडीच्या फिल्ड मध्ये करियर करणे यातली मजा खूप वेगळी असते. स्वानुभवावरून बोलतोय.. :)

शुभमस्तु...


पुरोगामी : क्षमस्व

आजकाल एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे समाजात उतू आलेले पुरोगामित्व आणि पुरोगामी लोक. पुरोगामी हे सॉलिड विलक्षण लोक आहेत. सहसा राजकीय पटलावर डाव्या विचारसरणीचे लोक स्वतःला पुरोगामी, उदारमतवादी वगैरे म्हणवतात. यातले बरेच "डावे" किंवा लिबरल (उदारमतवादी) लोक स्वतःला पुरोगामी म्हणवून घेऊ लागले आहेत.. का? बहुतेक पुरोगामी हा शब्द सॉलिड पुरोगामी भासत असावा म्हणून. पण लिबरल आणि पुरोगामी असण्यातले काही महत्वाचे आणि मुलभूत फरक आजकाल लक्षात येऊ लागले आहेत. 

मला लिबरल लोक आवडतात पण आताशा पुरोगामी लोकांची धास्ती (पक्षी: जशी ओलीस ठेवलेल्या माणसाला अपहरणकर्त्याची वाटते तशी) वाटू लागली आहे. डावे लोक देखील स्वागतार्ह आणि छान असतात, जर ते योग्य प्रकारचे डावे असतील तर. योग्य प्रकारचे डावे म्हणजे काय तर एक उदाहरण - सीपीआय-मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी हे अयोग्य किंवा "पुरोगामी" प्रकारचे डावे आहेत. फार लांब कशाला, अगदी सरकार चालवत असलेले "संयुक्त पुरोगामी आघाडी" देखील "पुरोगामी" आहे.

बरेच आदरणीय डावे विचारक आणि सुधारक आहेत हे विचारसरणी ने समाजवादी आहेत (बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा, महात्मा गांधी, आंबेडकर, आधुनिक काळात राजीव दीक्षित इत्यादी). हे "योग्य" प्रकारचे डावे आहेत कारण यांची काही मते पटली नाहीत तरी खूप शिकायला मिळते आणि या मतभेदात देखील राष्ट्रघात होत नाही. 

पुरोगामी हा शब्द तसा छान आहे, मनात आशावाद निर्माण करणारा आहे, नाही का?. भविष्याचे एक सोनेरी आणि आशादायक स्वप्न दाखवणारा शब्द आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. 

प्रत्यक्षात "पुरोगामी" म्हणजे हळूहळू सुधारणा. पुरोगामी म्हणजे हळूहळू, आस्ते कदम, प्रोग्रेसिव्हली एका बंदिस्त आणि कडक नियंत्रणाखाली जगणाऱ्या समाजाचे निर्माण करणारे लोक.  एक असा समाज जो बंदिस्त आहे, जिथे विचार-स्वातंत्र्य नाही (किंवा फक्त "पुरोगामी विचारांनाच स्वातंत्र्य आहे), जिथे जातीय अस्मिता वैयक्तिक अस्मितेला (आणि धार्मिक अस्मितेला आणि राष्ट्रीय अस्मितेला) उल्लंघून जाते. जिथे कुणा एका ऐतिहासिक पुरुषावर किंवा त्या व्यक्तीच्या एखाद्या विचारावर केलेली एक लहानशी टीका देखील "महापुरुषाचा अवमान" आणि पर्यायाने जातीय अस्मितेचा अवमान ठरतो आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते. 

अश्या या पुरोगामी समाजात जगातली सगळी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे फक्त "पुरोगामी" लोकांसाठी रक्षित असते आणि समाज पचवू शकेल त्याहून किंबहुना जास्तच समता, बंधुता आणि पुरोगामी स्वातंत्र्य नाक दाबून समाजास पाजली जाते, ते समाजास आवडो अगर नावडो. अर्थात ज्यास हे आवडत नाही तो साहजिकच "प्रतिगामी" आणि सनातनी ठरवून त्यास काफिर ठरवण्याचे काम पुरोगामी लोक नेमाने करत आलेले आहेत. लाब पल्ल्याचा विचार केला तर जो एजेंडा मार्क्स चा होता, तोच एजेंडा पुरोगामी लोकांचा असतो. फरक हाच कि पुरोगाम्यांना मार्क्स चा एजेंडा हळूहळू, आस्ते कदम, पुरोगामी पाने (प्रोग्रेसिव्ह्ली) राबवायचा असतो. 

अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टी दुसऱ्या टोकावर असलेले लोक देखील करतात (उदा. हरयाणा चे खाप पंचायत वाले). पण आधुनिक भारतात प्रचलित असलेला intellectual discourse हा तथाकथित "पुरोगामी" लोकांनी रचलेला आहे, या अतिउजव्या खाप-टाईप च्या लोकांनी नाही. त्यामुळे पुरोगाम्यांच्या वरची नजर हटवून दुर्घटना घडू देण्यात हशील नाही. 

लिबरल आणि पुरोगामी - जसे भासवले जाते तसे खरोखरच एक आहेत का?

अय निजः परोवेति, गणना लघुचेत साम् !
उदार चरितानाम् तु, वसुधैव कुटुम्बकम् !! 
हे माझे आणि ते परक्याचे असा विचार लहान बुद्धीचे लोक करतात. उदार लोक संपूर्ण वसुधेला एक कुटुंब मानतात. 

महाभारतातला हा श्लोक भरपूर प्रसिद्ध आहे. यात उल्लेखलेले "उदारचरित" लोक किंवा "लिबरल" लोक हे खरच "प्रोग्रेसिव्ह किंवा पुरोगामी" आहेत का?

उदार अथवा लिबरल लोक (आधुनिक संज्ञा वापरल्यास योग्य प्रकारचे डावे) हे पुरोगामी लोकांहून प्रत्यक्षात फार वेगळे असतात. लिबरल माणूस तुमच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेऊन तुमच्या विचारस्वातंत्र्याचे रक्षण करावयास झटेल. पुरोगामी ते आहेत जे सहसा तिसऱ्याचे विचारस्वातंत्र्य जपायला तुमचे तोंड फोडेल कारण तुमचे अस्तित्व त्यास असहनीय असते. सहसा हे "तिसरे" म्हणजे जातीय किंवा सांप्रदायिक अल्पसंख्यांक लोक. उदार अथवा लिबरल माणसाला विचारांच्या मुक्त आदान-प्रदानात value दिसते. पुरोगामी माणसास या मुक्त वैधारिक आदानप्रदानात धोका आणि कावा दिसतो. उदार अथवा लिबरल तेच बोलतो जे त्यास योग्य वाटते. पुरोगामी सहसा जे पोलिटिकली करेक्ट आहे तेच बोलतो. इथे योग्य-अयोग्य चा प्रश्नच येत नाही. पुरोगामी double-standards ठेवतात. उदार ठेवत नाहीत. नोबेल पारितोषिक विजेते पुरोगामी यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले दुहेरी मापदंड लोकांनी बघितले आहेतच. १९९१ मध्ये देश डबघाई ला आलेला असताना अश्याच पुरोगामी (आणि सनातनी देखील) लोकांनी उदारीकरणाला विरोध केला होता.

लिबरल जागा आणि जगू द्या या न्यायाने जगतात. पुरोगामी मात्र विचारांचे नियंत्रण, त्या प्रक्रियेत हस्तक्षेप आणि त्यांचे "सेन्सरिंग" (censoring) करत असतात कारण पुरोगामी लोकांना समाजाला काही हवे आणि काय नको हे पूर्णपणे माहिती असते. पुरोगाम्यांना मार्क्स ने (अथवा देवाने) दिलेले वरदानच आहे जणू. लिबरल माणसासाठी लेखणी, भाषा एक औजार आहे. पुरोगामी माणसासाठी लेखणी आणि भाषा शस्त्र असते. आपण काय बोलतोय याबात बरेच पुरोगामी सहसा विचार करत नाहीत जोवर ते एकाच एक विचार मोठमोठ्याने ओरडून समोरच्यास शांत केले जात नाही. कारण पुरोगामी लोकांकडे सत्याची सहसा sole-agency असते. लोकांनी काय विचार करावा, काय करू नये या सर्व गोष्टी पुरोगामी ठरवतात. 

पुरोगामी हे नेहमी "सेक्युलर" असतात. लिबरल किंवा उदार  हे सर्व-पंथ समभाव ठेवणारे असतात. अर्थात कोण सेक्युलर आणि कोण सांप्रदायिक किंवा कम्युनल हे ठरवण्याचा अधिकार हे नेहमी पुरोगामी स्वतः कडे राखून ठेवतात. उदा: पुरोगामी नेते नितीश कुमार यांच्या मते आता आडवाणी सेक्युलर आणि मोदी कम्युनल आहेत. 

भारताचे उदाहरण

भारताचे बघा ना. समान नागरी कायदा मागणारे प्रतिगामी, विविध संप्रदायांना वेगळा पर्सनल कायदा देणारे पुरोगामी. गम्मत आहे सगळी. हा खेळ समजला कि पुरोगामी-प्रतिगामी अशी छान वाटणी करता येते मग. जातीय राजकारण खेळणारे पुरोगामी (त्यातल्या त्यात मागास जाती असतील तर उच्च-कोटीचे पुरोगामी. जितकी जात मागास, तितके त्या जातीचे राजकारण खेळणारे नेते पुरोगामी म्हणवतात). अर्थात पुरोगामित्व टिकवून ठेवायला जात जितकी जास्त वेळ मागास राहील तितके बरे, हे सोपे गणित आहे. जातीय आरक्षणाच्या कालमर्यादेवर प्रश्नचिन्ह उभारणारे म्हणजे सनातनी प्रतिगामी, मनुवादी, रेसिस्ट. इस्लाम वर, मुसलमानांवर, ख्रिस्ती मिशनरी लोकांवर टीका करणारे ते प्रतिगामी. ८०% समाजास एकत्र करून राजकारण खेळायची भाषा करणारे तर फारच मोठे प्रतिगामी, फाशीस्ट, हिटलर चे समर्थक इत्यादी म्हणवले जातात. 

या उलट वारकरी, हिंदूंचे देवी-देवता, रीतीरिवाज, सणवार मंदिरे व चालीरीती, साहित्य, इतिहास यांच्यावर वाटेल त्या शब्दात निंदा-नालस्ती करणारे, तोडमरोड करणारे लोक हे पुरोगामी विचारवंत म्हणवतात. जातींना एकमेकांविरुद्ध उभे ठाकून विष पेरणारे लोक म्हणजे पुरोगामी. काश्मीर पाकिस्तान ला देऊन टाकावा असे म्हणणाऱ्या अरुंधती रॉय सारख्या ज्येष्ठ पुरोगामी विदुषी या लोकांच्या अध्वर्यू आहेत. पुरोगामी सहसा माओवादी लोकांचे समर्थन करतात, यांना जिहादी आतंकवादी लोकांचे मानवाधिकार वगैरे चोख लक्षात असतात. राष्ट्राच्या संपत्तीवर अमुक संप्रदायाच्या लोकांचा पहिला हक्क आहे वगैरे पुरोगामी उद्गार आपल्याच सांप्रत पुरोगामी पंतप्रधानांचे आहेत. 

भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जिहादी संघटना (इंडियन मुजाहिदीन) खरोखरच अस्तित्वात आहेत का? हा मूलभूत सवाल फक्त पुरोगामी लोकांनाच पडू पडतो. बऱ्याच पुरोगाम्यांना यात आणि इतर आतंकवादी हल्ल्यांमध्ये तथाकथित उच्चवर्णीय लोकांचे किंवा "सनातनी संघटनांचे" षडयंत्र दिसते. 


यांना मी लिबरल किंवा उदारचरित नाही म्हणणार.. यांच्या साठी एकच शब्द योग्य आहे - पुरोगामी...

भारताचे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन आणि कावेरी जेट इंजिन

कावेरी इंजिन, क्रायोजेनिक इंजिन या संबंधी काही मुक्त विचार.. 

जी.एस.एल.व्ही ची चाचणी ४ जानेवारी ला होते आहे. त्यात एतद्देशीय क्रायोजेनिक इंजिन आहे. बघू कसे चालते ते. खूप आवश्यक आहे ते इंजिन. ते तंत्रज्ञान खूप कामाचे आहे.

क्रायोजेनिक इंजिन चा फंडा हा कि ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तरल अवस्थेत साठवलेले असतात (उणे १९६ देग्री शून्य खाली, अजून खाली, पण वर नाही). आता ऑक्सिजन चा बोईलिंग पोइंत -१८३ डिग्री सेल्सियस आहे आणि हायड्रोजन चा -२५३ डिग्री सेल्सियस. हायड्रोजन जाळून पाणी बनवायला हायड्रोजन ऑक्सिजन च्या दुप्पट असावा लागतो (पाण्याचा फोर्मुला H2O आहे - दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन). 

क्रायोजेनिक इंजिन हे नॉर्मल इंजिन च्या वरती असते. खालचे इंजिन २००० डिग्री वर जळत असताना त्याला लागून असलेले ऑक्सिजन आणि हायड्रोजन साठवून ठेवणारे tank आणि त्यांना जाळणारे इंजिन हे -२५३ डिग्री वर ठेवावे लागते. यास उपाय म्हणजे मोठे इन्सुलेशन ठेवा - पण त्याने वजन वाढते - रॉकेट मध्ये एक एक ग्राम वजन महत्वाचे असते. अधिक खूप थंडी मध्ये स्टील देखील पापडासारखे तुटते. ज्यांना तरल नायट्रोजन सोबत काम करायचा अनुभव आहे, त्यांने हे अनुभवले असेल - उणे १९६ डिग्री मध्ये लोखंडाची किंवा नॉर्मल स्टेनलेस स्टील ची वस्तू बुडवून बाहेर काढली तर पापड तुटावा तशी तुटते. 

इथे तर हजारो टन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वर न्यायचे आहे खालचे रॉकेट धगधगत असताना. गेल्या खेपेस जो प्रॉब्लेम होता तो असा कि ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या टाक्यांना सील करणारा जो भाग आहे तो खूप काल थंडीत राहिल्या मुळे थोडा नाजूक झाला आणि तिथून हायड्रोजन ची गळती सुरु झाली. शेवटच्या क्षणी हे लक्षात आले नि लौंच स्थगित केली. बघू तो प्रॉब्लेम सेटल झालाय का ते. क्रायोजेनिक इंजिन आता व्यवस्थित काम करते. 

क्रायोजेनिक इंजिन देखील खूप क्लिष्ट आहे. अनुक्रमे -२५३ आणि -१८५ डिग्री वर वेगवेगळे असलेले दोन तरल वायू एकत्र आणून "जाळायचे" आणि १५०० डिग्री पर्यंत क्षणार्थात नेऊन अश्या रीतीने पेटवायचे कि त्यांची उर्जा जेट-exhaust च्या रूपाने एकाच दिशेने बाहेर येईल, हि खूप गुंतागुंतीचे इंजिनियरिंग आहे. जमिनीवरच्या सगळ्या चाचण्या आता यशस्वी झाल्या आहेत. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन च्या tanks न सील करणाऱ्या द्रव्याने योग्य काम केले तर चाचणी यशस्वी होईल आणि हे तंत्रज्ञान standardize होईल. 

कावेरी जेट इंजिन

इंजिन (विशेषतः लो-बायपास जेट इंजिन) खूप खूप स्पेशल तंत्रज्ञान आहे. जगात फक्त अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, रशिया (आणि चोरून मारून चीन) यांच्या कडे हे तंत्रज्ञान आहे. हे खूप जपून ठेवलेले तंत्रज्ञान असते. एक जेट इंजिन बनवायला जवळपास ३२ engineering specializations मध्ये प्रभुत्व मिळवावे लागते. मेटलर्जी पासून इलेक्ट्रोनिक्स पर्यंत, मेकानिकल पासून एरोनोतीक्स पर्यंत, केमिस्ट्री, फोर्जिंग, वेल्डिंग, क्रिस्टल बिल्डींग, सेमीकंडक्टर, लोजीस्तीक्स. असे म्हणता येईल कि जैवतंत्रज्ञान सोडले तर उर्वरित सगळ्या इंजिनियरिंग आणि विज्ञानाच्या शाखांमध्ये एकसोबत प्रगती घडवावी लागते. 

एक कावेरी इंजिन जर व्यवस्थित हवे तसे बनले तर ३२-३५ वेगवेगळ्या नवीन इंडस्ट्री सुरु करता येतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळेल. साहजिक आहे, ज्यांच्या कडे हे तंत्र आहे, ते लोक याला खूप खूप काळजी पूर्वक जपतात. कावेरी मध्ये भारताला येत असलेला प्रॉब्लेम जेट-इंजिन च्या क्रिस्टल-ब्लेड बनवण्यात आहे. मेकानिकल डिझाईन वगैरे ठीक आहे, पण त्या खास जातीचे स्टील त्या खास पद्धतीने बनवता येत नाहीये (तोच प्रॉब्लेम विक्रांत, अरिहंत वगैरे बाबतीत आहे). आपण बनवलेल्या क्रिस्टल-ब्लेड या काही वेळा नंतर निखळून इंजिन बाहेर पडतात आणि इंजिन निकामी होते. त्या साठी थोडे अवजड इंजिन कावेरी च्या टीम ने बनवले, तर तेजस या हलक्या वजनाच्या विमानात इंजिन चे वजन हा महत्वाचा घटक असून तो कमी असावा लागतो. तात्पर्य - आपल्याला असे स्टील हवे जे वजनाने अर्धे असून शक्तीने दुप्पट आहे. 

इंजिन बनले आहे, पण ते तेजस ला आवश्यक उर्जा (कमी वजनात) देऊ शकत नाही, म्हणून तेजस ला अमेरिकन जी-ई ४१४ हे इंजिन शेवटी लावावे लागले.


यात वास्तविक कमीपणा काही नाही. भारताने औद्योगिक क्रांती मध्ये १९६० मध्ये उडी घेतली. तेव्हा आपण पाश्चात्य जगाच्या १२५-१५० वर्षे पिछाडीवर होतो. एकदम ४.५ जनरेशन (अत्याधुनिक) चे इंजिन आणि विमान बनवणे म्हणजे खूप मोठी उडी आहे. 

नामदेव ढसाळ - आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी ते राष्ट्रवादी - श्रद्धांजली

पद्मश्री नामदेव ढसाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला कुठलेच काव्य कधी फारसे समजले नाही, त्यामुळे त्यांच्या कवितेवर मी फारसे बोलणे उचित नाही. क्रियेवीण शब्दज्ञान तेची श्वानाचे वमन असे समर्थ रामदास स्वामींनी म्हंटले आहे. त्यामुळे तिथे मी मौन साधेन.

पण त्यांनी उत्तर-आयुष्यात घेतलेले निर्णय आणि मार्क्सवादापासून फारकत घेऊन संघाशी साधलेली जवळीक यामुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल फार आदर आहे. पण या आदराला कारण हे नाही कि माझा कल हिंदुत्वाकडे झुकतो. यात मला ढसाळांची दूरगामी धोका ओळखण्याची व्हिजन दिसते आणि तिला अनुसरून त्यांनी आपला पथ align केला आणि course-correction केले आणि दलित तरुणांचा एक मोठा सेक्शन मार्क्सवादी न होता राष्ट्रवादी बनला.

माझ्या एका निबंधात मी भारतात नोकझोक करून अस्थिरता पसरविण्यात हातभार लावणारे तीन जागतिक फोर्सेस बद्दल बोललो होतो. नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थर १९७२ मध्ये स्थापन केली, ती अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या धर्तीवर. 

दलित पॅन्थर चा इतिहास जाणून घ्यायला या अमेरिकन  ब्लॅक पॅन्थर पार्टी चा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. व्हिएत्नाम युद्ध सुरु असताना शीतयुद्ध कालीन सी-आय-ए विरुद्ध केजीबी युद्धाची एक कडी म्हणजे  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा उगम. हि पार्टी १९६६ ते १९८२ पर्यंत कार्यरत होती. अमेरिकेत सशस्त्र उठाव करून कृष्णवर्णीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हा या चळवळीचा एक उद्देश होता. 

एफ.बी.आय चे तत्कालीन अध्यक्ष जे.एडगर हूवर यांनी अश्या या चळवळीला खूप गंभीरतेने घेतले होते. कृष्णवर्णीय लोकांच्या बरोबरच अमेरिकेतले मूलनिवासी रेड-इंडियन्स, आणि श्वेतवर्णीय वंशवादी चळवळी ज्या अश्वेत लोकांना संपवण्यासाठी कार्यरत असायच्या (जसे कुप्रसिद्ध कु-क्लुक्स-क्लान Ku-klux-clan) या सर्वांचा भेद करायला एफबीआय ने COINTELPRO नावाचा एक प्रोजेक्ट चालवला होता. उत्सुकांनी गुगलून पाहावे. या सर्व अमेरिकी फुटीरवादी चळवळीना फूस सोव्हियत-रशियाची असायची. त्यामुळे एफबीआय ने साम-दान-दंड-भेद वाटेल ते वापरून या चळवळीच्या मध्ये आपली माणसे घुसवली आणि यांना क्षीण केले. अर्थात यातील बरेच मार्ग अमेरिकन संविधानानुसार बेकायदेशीर होते. हा प्रकल्प जरी १९७१ मध्ये बंद पडला तरी यांनी निर्माण केलेले assets आणि SOP (standard operating procedures) यांना एफबीआय पुढे वापरत राहिलीच. १९७२ पासून या  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा पडता काल सुरु झाला आणि हळूहळू करून १९८२ पर्यंत या पार्टीत केवल २७ सदस्य उरले. थोडक्यात काय तर हि पूर्ण चळवळ अमेरिकन लोकांनी आणि व्यवस्थेने संपवून पचवली, तिच्यातले मार्क्सवादी घटक बाजूला करून संपवले (बरेचदा शारीरिक रित्या संपवले) आणि उरलेले आत्मसात केले. 

१९७७ पासून  ब्लॅक पॅन्थर पार्टी अमेरिकन प्रॉब्लेम राहिली नाही. पण १९८० च्या दशकात रशियाने ने अफगाणिस्तान वर आक्रमण केले आणि शीतयुद्ध खूप मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडात घुसले. भारतात नक्षलवाद, खलिस्तान, आसाम, तामिळी वाघ (लिट्टे) इत्यादी चळवळी सुरु झाल्या होत्या. ८०च्य दशका-अखेर पर्यंत काश्मीर देखील पेटले होते. त्याच दरम्यान एक चमत्कारिक Afro-dalit project अमेरिकेत सुरु झाला. भारतातल्या दलितांच्या समस्या या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयलोकांच्या सारख्या आहेत आणि म्हणून त्यावर उपाय देखील तसाच असावा, या मताचे बरेच think-tanks भारतात पैसा ओतू लागले. या सर्व प्रकारचे पूर्ण डिटेल वर्णन राजीव मल्होत्रा यांच्या breaking india नावाच्या एका अभ्यासपूर्ण ग्रंथात आहे. यातील बऱ्याच प्रमाणात हा पैसा मिशनरी मार्फत देखील येतो. महाराष्ट्रातले एक पुरोगामी विचारवंत नुकतीच ज्यांच्यामागे बलात्कारासंबंधात पोलीस लागली होती, ते वर्ल्ड-कौन्सिल ऑफ चर्चेस यांची जागतिक परिषद अटेंड करतात यावरून हि शंकेची पाल अजून जोरात चुकचुकली.

या एफ्रो-दलित प्रकल्पाचा ब्रीद-विचार म्हणजे तोच जो मूलनिवासी लोक प्रतिपादित असतात - दलित हे मूलनिवासी आहेत, इतर सर्व आक्रांते आहेत आणि त्यांना हिसंक मार्गाने बाहेर हाकलून देण्यात यावे. हा विचार वेगवेगळ्या मार्गाने या विचाराच्या बऱ्याच संघटना, विचारक आणि प्राध्यापक भारतात बोलत असतात.  ब्लॅक पॅन्थर पार्टी च्या धर्तीवर उभारलेली दलित पॅन्थर चळवळ या विचार प्रतीपादायला आणि कार्यान्वित करायला उत्कृष्ट platform होती. विशेषतः पश्चिम भारतात जिथून मार्क्सवादास महत्प्रयासाने शिवसेनेने निष्कासित केले होते. हा विचार मुळात चूक या साठी आहे कारण हा आर्य-आक्रमण सिद्धांत या खोट्या इतिहासावर आधारित आहे. भारतात दलित हे उपेक्षित होते आणि आहेत, पण त्याची कारणे पूर्ण वेगळी आहेत. दलित हे भारतातले कृष्णवर्णीय नाहीत. दलित असो कि ब्राह्मण, दोघांचा वंश एकच आहे आणि हे आता डी.एन.ए अभ्यासावरून हळूहळू समोर येते आहे. त्यामुळे जातींच्यात वांशिक दरी निर्माण करायचे जे बीज तेव्हा पेरल्या गेले होते ते असत्य तर होतेच, ठार विघातक देखील होते. जात म्हणजे वंश (रेस) नाही. जो कुणी हे बोलतो तो पूर्ण असत्यवक्ता असतो आणि देश-विघातक शक्तींचा अजेंडा (जाणता किंवा अजाणता) पुढे रेटत असतो. अश्या कल्पनांचे जिथल्या तिथे खंडन करावे. 

ढसाळांची एक सर्वोत्तम मुलाखतींच्या पैकी एक म्हणजे नोबेल विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांच्या प्रसिद्ध ग्रंथ "इंडिया-मिलियन म्युटिनीज नाऊ". त्यात आणीबाणीच्या काळाचे आणि त्या काळातल्या आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळातल्या ढसाळांचे उत्कृष्ट वर्णन आहे. तिथे दिसते कि दलित हे भारतातले कृष्णवर्णीय आहेत या विचारात  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच दलित पॅन्थर स्थापन झाली पण तिची गत देखील हळूहळू  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच होऊ लागली. आणीबाणी नंतर नामदेव ढसाळांचे गुन्हेगारी जगतातले मित्र त्यांना पैसे देऊ लागले. अचानक ढसाळांच्या कडे १०,००० रुपये वगैरे खेळू लागले. हा काल १९७९-८० चा आहे. मी पाकिस्तानका मतलब क्या, या माझ्या निबंधात या काळाविषयी सविस्तर लिहिले आहे. अमेरिकन पैसा चर्च आणि इतर मार्गांनी भारतात खेळू लागला होता. मुंबई चे गुन्हेगारी जगात काबुल ते इंडोनेशिया या प्राचीन अफू-च्या मार्गावरचे मोठे ठिकाण आहे. जेव्हा इथल्या underworld मध्ये पैसा अचानक पंप होतो, तेव्हा या जागतिक ड्रग-रूट मध्ये काहीतरी मोठे घडते आहे हे लगेच लक्षात येते (आजकाल हे मुंबई मधल्या property मार्केट च्या रेट्स वरून कळते, असो). इच्छुकांनी हा अप्रतिम ग्रंथ आणि त्यातील ढसाळांची सुंदर मुलाखत आवर्जून वाचावी. 

आता पुढे जे मी लिहतोय तो माझा कयास आहे, आणि या बद्दल तूर्तास कुठलाही ठोस पुरावा माझ्याकडे नाही फक्त वरील तथ्यांवर आधारित हा माझा तर्क आहे. मला ठाम खात्री आहे कि १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकात, जेव्हा भारतात अनेक विघटनकरी चळवळी चालत होत्या, त्यांना रशियाचा पाठींबा हमखास असेच. नामदेव ढसाळ यांनी काळाची हि बदलणारी चक्रे खूप लवकर ओळखली. आणि पडद्याआडून हि चक्रे फिरवणारे हे खेळाडू देखील ओळखले. १९८१ च्या सुमारास ढसाळ शांत झाले नि या मार्गातले खाचखळगे ओळखले. माझ्या मते तेव्हापासूनच ते या वरील नेटवर्क पासून तुटले आणि मुख्यधारेकडे झुकू लागले. हा त्यांचा झुकाव शेवटपर्यंत टिकून राहिला. 

त्यांच्या या बदलाचे खूप मोठे परिणाम मला दिसतात. त्या कठीण काळात (अजून हि कठीण काल गेलेला नाही, पण आज भारत बऱ्यापैकी सशक्त आहे) नामदेव ढासळ यांनी हा एक conscious decision घेतला आणि मार्क्सवादापासून फारकत घेतली. भारतीय तरुणाई मध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात राग आणि उद्वेग होता (जो आता परत हळूहळू दिसू लागलाय). त्यांच्या समर्थकांमध्ये धुमसत असलेला तो राग आणि उद्वेग नक्षलवाद वगैरे कडे झुकू न देता समाजाच्या मुख्यधारेत मिसळायला त्यांनी channelize केला. त्यांना लक्षात आले कि भारतीय दलितांच्या समस्या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांहून वेगळ्या आहेत आणि त्यांचे समाधान देखील. आणि त्या समाजाच्या मुख्यधारेत येऊनच सुटतील. आणि हे देखील कि भारतीय समाज चटकन बदलत नाही, आणि एकदा बदलला कि पुन्हा पूर्वीसारखा होत नाही. त्यामुळे हि हळूहळू होणारी प्रक्रिया आहे.

इंग्रजी मध्ये म्हणतात कि Hindsight is always 20/20. म्हणजे मागे वळून पाहताना सगळेच क्लियर दिसते कारण गोष्टी घडून गेल्या असतात. माझे वरील विचार हे मला hindsight ने दिलेले आहेत. ते सगळेच त्या वेळेस ढसाळ यांना आले असतील-नसतील, वेगळे आले असतील, वेगळ्या context मध्ये आले असतील. पण त्यांच्या कर्माची आणि निर्णयांची परिणीती म्हणजे दलित तरुणांचा एक घटक जो १९७० मध्ये मार्क्सवादाकडे झुकत होता तो घटक आणि त्या घटकाची पुढील पिढी राष्ट्रवादाकडे आली. 


बऱ्याच लोकांनी ढसाळांच्या आधी शिवसेना आणि मग रा.स्व.संघाच्या जवळीकी बद्दल लिहिले आहे (चांगले-वाईट). माझ्या मते त्यांचा हा प्रवास वरील गोष्टीस सर्वाधिक पाठबळ देतो. आधी लिहिल्या प्रमाणे, मला कवितेतले फारसे कळत नाही, फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजनीती आणि इतिहास शिकायची आवड आहे. त्या दृष्टीकोनातून मला श्री. नामदेव ढसाळ यांचे योगदान कौतुकास्पद आणि खूप प्रशंसास्पद जाणवते. या साठी त्यांना माझी श्रद्धांजली.