Tuesday 7 May 2019

अपौरुषेय म्हणजे काय?

अपौरुषेय या शब्दा विषयी थोडेसे : बऱ्याच लोकांची या शब्दाच्या चुकीच्या माहितीमुळे निष्कर्षात चुका होतात. तस्मात हा लेखन प्रपंच.
चेतन ज्ञानापासून जड विश्वाची उत्पत्ती झाली - हा धर्माचा मुख्य सिद्धांत आहे. ज्ञानाला कुणीही उत्पन्न करू शकत नाही. म्हणजेच ज्ञान/वेद हे ईश्वर देखील निर्माण करू शकत नाही. कारण जर ईश्वराने ज्ञानास उत्पन्न केले असे म्हंटले तर आधी ईश्वर अज्ञानी होता का? आणि जर होता, तर हे अज्ञानी तत्व ज्ञानासारखी गोष्ट कशी काय निर्माण करू शकेल?
वेद म्हणजेच ज्ञान अपौरुषेय आहे - ते या अर्थाने. ज्ञान कुणीही निर्माण/उत्पन्न करू शकत नाही. पण ज्ञानापासून सर्व सृष्टी (देवी देवता लोक जगत इत्यादी) उत्पन्न होते.
वेद या ग्रंथांची भौतिक रचना माणसांनीच केलेली आहे. ज्या ऋषींना जे जे मंत्र समाधी अवस्थेत स्फुरले त्या ऋषींना त्या मंत्रांचे द्रष्टेपण दिलेले आहे. उदा. गायत्री मंत्राचा द्रष्टा ऋषी विश्वामित्र. हे पुरूषच होते (काही स्त्रिया देखील होत्या).
पण अपौरुषेय या शब्दात असलेला पुरुष हा "पुरे शेते स पुरुषः" (जो या पुरात वास्तव्य करून आहे तो) या अर्थाने अभिप्रेत आहे, व्यक्ती या अर्थाने नाही. सांख्ययोगात आणि सनातन धर्मात इतरत्र देखील "पुरुष" या शब्दाचा हा अर्थ अभिप्रेत आहे. परंपरेने विष्णू या देवतेला पुरुष म्हणतात (यद् विशितो भवन्ति तद् विष्णुः भवन्ति - जो विश्वाच्या आत शिरून सर्वत्र ओतप्रोत भरलेलआहे तो विष्णू - तुकारामांचे विष्णुमय जगत ते हेच). सेश्वरवादी लोक पुरुष या शब्दाचे प्रयोजन सहसा ईश्वर या अर्थाने करतात.
निरीश्वरवादी लोक (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक इत्यादी) पुरुष शब्दाचा उपयोग प्रकृती च्या सापेक्ष सहसा करतात. प्रकृतीने बनवलेल्या या तीन गुणांच्या आणि पाच महाभूतांच्या शरीरात जे तत्व वास्तव्य करून आहे, ते तत्व म्हणजे पुरुष. सांख्ययोगाचे सेश्वरत्व सापेक्ष आहे. चित्तवृत्तीनिरोध साधायच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे ईश्वर प्रणिधान. इथे ईश्वर हे एक साधन आहे, साध्य नाही की कैवल्य/मोक्ष  “देणारा” मुकूंद नाही. 

वेदांतातला ईश्वर आणि सांख्ययोगातला ईश्वर या दोहोंचे प्रायोजन खूप सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे. 

पण हा सुक्ष फरक जरी असला तरीही सेश्वरवादी असोत कि निरीश्वरवादी, वेदांचे म्हणजेच चेतन ज्ञानाचे अपौरुषेयत्व (वरील अर्थाने) हे आस्तिक दर्शनांच्या (म्हणजेच प्रचलित हिंदू धर्माच्या) गाभ्याशी आहे.