Sunday 15 March 2020

कोरोना व्हायरस च्या निमित्ताने spanish फ्लू च्या साथीचा इतिहास

१. शंभर वर्षांपूर्वी १९१८-१९१९-१९२० मध्ये spanish फ्लू ची साथ आली होती. जगभरात ४ ते १० कोटी लोक दगावले होते. भारतात ३० लाख ते २ कोटी लोक दगावले होते. माझे पणजोबा याच साथीमध्ये वारले होते. महायुद्धामुळे हिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पहिल्या महायुद्धात लष्कर भरती होणार नाही म्हणून कित्येक ठिकाणी याच्या बातम्या सर्व सरकारांनी दाबून टाकल्या. त्यामुळे हा रोग जास्त पसरला. असो.

२. हि साथ तीन फेज मध्ये आली. १९१८ च्या वसंत ऋतूत आलेल्या पहिल्या लाटेत खूप लोकांना बाधा झाली परंतु दगावणाऱ्या लोकांमध्ये लहान मुले आणि म्हातारे लोक जास्त होते. हि लाट देखील कॅनडा मध्ये कॅनडियन सेनेसाठी काम करणाऱ्या चीनी मजुरांमुळे सुरु झाली अशी थियरी आहे. कॅनडियन आणि अमेरिकन सेनेने हा विषाणू ब्रिटन आणि नंतर फ्रांस मध्ये पोहोचवला. १९१८च्या वसंत ऋतू मध्ये जर्मनीने फ्रान्सवर शेवटची निकराची चढाई सुरु केली. याला स्प्रिंग ओफेन्सीव म्हणतात (ऑपरेशन मायकल, ऑपरेशन जोर्जेट) - यात जर्मनीने फ्रांस-इंग्लंड-अमेरिका-कॅनडाची एकहाती मजबूत वाताहत केली. त्यांचे देखील भरपूर खासे योद्धे मारले गेले. माझ्या मनात दोन्ही महायुद्धात जर्मनी बद्दल असलेल्या soft-corner च्या अनेक कारणांपैकी हे एक आहे. असो. या (तात्पुरत्या) जर्मन विजयाचा दुष्परिणाम हा झाला कि त्यांनी भरपूर इंग्रज-फ्रेंच-कॅनडियन-अमेरिकन युद्धकैदी ताब्यात घेतले. आणि इंग्रज युद्धकैद्यांनी हा फ्लू चा व्हायरस जर्मन सेनेत पोहोचवला. एक चतुर्थांश जर्मन सेना फ्लू ने बाद झाली. मृत्यू कमी पण आजारी होऊन out of action झालेल्यांची संख्या खूप मोठी होती. इतकी मोठी कि पुढली चढाई जी जर्मनीला अमेरिका पूर्णपणे युद्धात उतरायच्या आत आटपायची होती, तिला ४ आठवडे पुढे ढकलावे लागले. तोवर उशीर झाला, मित्रदेशांनी जर्मनीला मागे ढकलायला सुरुवात केली. जर्मन सेनापतीने राजीनामा देऊन पलायन केले. तोवर इंग्रज-कॅनडियन-अमेरिकन-फ्रेंच सैनिकांना या फ्लू संबंधी resistance आला होता. भरपूर सैनिक रिकव्हर झाले होते. उलट जर्मन सैनिक आजारी होते किंवा नुकतेच आजारातून बरे झाले होते.

३. १९१८च्या शरद-शिशिर-हेमंत ऋतूत विषाणू मध्ये आमुलाग्र बदल झाला. विषाणूने इतक्या लोकांना बाधित केले आणि स्वतःच्या इतक्या खर्व कॉपी बनवल्या कि त्यात नवीन म्युटेशन्स घडले जे जास्त धोकादायक होते. दरम्यानच्या काळात रोगाची लागवण कमी झाली होती आणि हि महामारी आटोक्यात आली असे लोकांनी हळूहळू जाहीर करायला सुरुवात केली होती. पण हि दुसरी फेज सर्वाधिक घातक होती. पहिल्या फेज मध्ये बहुतेक बाल-वृद्धच दगावले होते. या दुसऱ्या फेज मध्ये तरणेताठे लोक देखील माश्यांसारखे पटापट पडू लागले. जर्मनीत या तापाला २४-तासांचा ताप म्हणू लागले. लक्षणे दिसू लागल्यानंतर २४ तासात लोक निळे पडून मृत्युमुखी पडू लागली. फुफ्फुसात पाणी साचून स्वतःच्या शरीराच्या पाण्यात बुडून लोक मरत होती (न्युमोनिया). विषाणू रोगप्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम घडवत होता.

४. आमचे मायक्रोबायोलोजीस्ट पूर्वज bacteria ला शोधत होते कारण त्यांच्याहून लहान कुणी असते हे तेव्हा माहिती नव्हते. आणि इन्फ़्लुएन्ज़ा चा bacteria अनेक शवांमध्ये सापडला देखील. पण सर्व शवांमध्ये सापडत नव्हता. या bacteria विरुद्ध लस याच काळात बनली (आजही त्या लशीची प्रगत आवृत्ती आपण आपल्या लहान पोरांना देतो - HiB1 वगैरे नावांनी - हिमोफिलस इन्फ़्लुएन्ज़े). पण असे काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये पण जे या रोगाचे कारण असू शकते - हि कल्पना आली होती. पण कदाचित घोड्यांना मृत लोकांच्या फुफ्फुसातले द्रव टोचल्यावर bacteria सोबत हा अदृश्य विषाणू विरुद्ध देखील घोडा antibody बनवेल या आशेतून लोकांनी सैनिकांचे लसीकरण केले (महायुद्ध सुरु असल्यामुळे सर्व गोष्टींवर पहिला अधिकार सैन्याचा). पण फारसा फरक पडला नाही.

५. १९१९ च्या उन्हाळ्यानंतर या दुसऱ्या फेज ची मारकता कमी झाली. १९१९च्या हिवाळ्यात तिसरी फेज आली. ती तुलनेने कमी मारक होती (पहिली पेक्षा जास्त पण दुसरी पेक्षा कमी). तोवर खूप लोकांना रोगाची लागवण होऊन बरीच लोक दगावली होती तशीच बरीच बरी देखील झाली होती. जी बरी झाली होती ती या रोगाविरुद्ध त्यांच्या शरीरात antibody बाळगून होती. याला herd immunity म्हणतात. विषाणू खूप वेगात पसरला आणि ३/५% लोकांचा जीव घेऊन देखील ९५% लोकांना स्वतः विरुद्धची प्रतिकारशक्ती देऊन गेला.

६. जगभरात वर सांगितल्याप्रमाणे १० कोटीच्या आसपास लोक मेली. पहिल्या महायुद्धावर परिणाम झाला. अनेक नवीन शोध हि महामारी देऊन गेली. भारतात २ कोटी लोक मेली असावीत असा अंदाज आहे. स्वतः गांधी या रोगात मरता मरता वाचले होते.

७. पाश्चात्य जगतावर या साथीचा खूप खोल परिणाम झाला. फ्लू म्हंटला कि लोक घाबरतात. चालू असलेली कोरोना विषाणूची साथ याच कटू स्मृती चाळवते.. म्हणून हा लेखन प्रपंच. साथीस घाबरण्याचे कारण नाही. तूर्तास तरी. हा रोग दुर्दैवाने झालाच तरी शक्यता अशी आहे कि तुम्हाला प्रतिकार शक्ती देऊन जाईल. तस्मात काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, विटामिनची गोळी घेत चला.. लोकांशी स्पर्श व इतर संपर्क शक्यतोवर टाळा... वरचेवर हात धूत राहा.

८. मी स्वतः महासुदर्शन काढा, लक्ष्मीविलास रस वगैरे नेहमीचे औषधे सुरु केली आहेत. माझा या काढ्यावर खूप विश्वास आहे. याने झालेली सर्दी बरी होत नाही, पण रोज घेत राहिले कि सर्दी मला तरी लवकर होत नाही.

बाकी अवघ्या आशा श्रीरामार्पण....