Wednesday 2 June 2021

मुंबईचे अत्यावश्यक पतन

 This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

सदर लेख ऑर्कूटवर 20१३  साली लिहिला होता.. जुना ब्लॉग गूगळ ने डिलिटला.. हा लेख मित्राने सेव्ह करून ठेवला होता, त्याच्या उपकाराने पब्लिश करत आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
सेना-भाजप मध्ये जी सुंदोपसुंदी सुरु आहे असे मराठी-मिडिया भासवायचा प्रयत्न करतोय, हे त्यांच्या अज्ञानाचे द्योतक आहे. मुळात त्यांना हे अजून कळत नाही (कि वळत नाही) कि मोदी आणि अमित शाह हे दोघे खेळाचा नियम ठरवणार आणि त्यांनी ठरवलेल्या नियमांवरच ते त्यांचा खेळ खेळणार. त्यांनी कुठल्या नियमांनी खेळायचे हे मराठी-मिडिया, त्यांचा बोलविता-धनी म्हणजे दोन्ही-कॉंग्रेस आणि सेनेतले अतिउत्साही (भाजपात देखील आहेत) लोक ठरवणार नाहीत.

हिंदुत्वाच्या भल्यासाठी मुंबई चे पूर्ण पतन अत्यावश्यक आहे. ते लवकरच होणार हि श्रींची इच्छा आहे. मुंबई (आणि थोडेफार पुणे) केंद्रित शक्ती-स्थाने आपटणार, यामुळे..  मोदींची कसोटी यात असणार आहे कि ते मुंबई चे पतन पूर्णपणे आणि "कंट्रोल" मध्ये होऊ देतात कि लगाम सुटतो. जर त्यांनी मुंबई चे कंट्रोल्ड डीमोलीशन केले तर एक अभूतपूर्व राजकारणी या विशेषणावर त्यांचे पूर्ण स्वामित्व होईल.. या पतनात सेना आपली भूमिका चोख वठवीत आहे.

काही गोष्टी काळाच्या गर्भात अस्फुट आहेत तर असू द्याव्यात. पण थोडीबहुत gist अशी -

काबुल ते इंडोनेशिया या ड्रग-रूट वर मुंबई सर्वात महत्वाचा बिंदू आहे. मुंबई हि मुंबई बनली ती बेसिकली तस्करीच्या सोयीसाठी (ब्रिटीश काळापासून). मुंबई ची मूळ-वास्तू हि literally "gateway of India" या अर्थाने आहे. ती भारताची बाहेर बघायला असलेली खिडकी नाही. ते बाहेरच्यांचे भारतात घुसायला असलेले दार आहे.

भारतातली कुठलीही शक्ती या ड्रग-रूट मधल्या प्रस्थापित खेळाडूंशी पंगा घेऊ शकत नाही. टाटा, गोदरेज, वाडिया वगैरे लोक देखील याच अफूच्या व्यापारात १८५७ च्या सुमारास उतरून "मोठे" झाले. त्यांनी जी गुंतवणूक तेव्हा पासून केली आहे (बरी-वाईट) ती गुंतवणूक काही "बांधील्क्या" निर्माण करते. हि नवे फक्त उदाहरण दाखल आहेत.

आणीबाणी आणि सोवियत रशियाच्या अफगाणिस्थान स्वारीच्या काही वर्षे अगोदर पासून मुंबई मध्ये या अफू-लॉबीने जोरदार प्रवेश केला. त्यात आपले "जाणते राजे" आणि त्यांचे गुटखेवाले मित्र हे हिरीरीने सामील झाले. त्यामुळे - मुंबईची जी अत्यंत फास्ट ग्रोथ (थोडी बरी बव्हंशी वाईट) १९८० नंतर झाली त्यात बहुतेक पैसा याच लॉबीचा आहे.

रियल-इस्टेट, बॉलीवूड, शेयर-मार्केट - हे तीनही सेक्टर याच मध्यपूर्व स्थित लॉबीवर पूर्णतः अवलंबून आहे. हे कायदेशीर रित्या सिद्ध आता होऊ शकत नाही, त्यामुळे सरकारी SIT या पैश्याला हात लाऊ शकत नाही. पण १९८० नंतर मुंबईत असलेली जवळपास प्रत्येक मोठी गोष्ट हि घाण-पैसा आधारित आहे. वास्तविक "काळा-पैसा" हि टर्म इथे चुकीचे आहे, कारण कर-चुकवलेला पैसा हा काळा असतो. काळा पैसा काही वाईट नसतो. काळा-पैसा सरकार कडे नाही आला तरी देशात फिरत राहतो आणि जीडीपी ला भर देत राहतो.

हा जो घाणपैसा मी म्हणतो आहे तो मुंबई मध्ये या लॉबीने गुंतवला आहे आणि मन्नू-चिदंबरम च्या participatory notes मुळे जोरात भारतात आला आहे - पण FII च्या रुपात.

कॉंग्रेस ने सगळ्यात मोठा घोटाळा केलाय तो बँक मध्ये - जाणकार दबक्या आवाजात हे बोलून राहिले. SBI सारखी बँक आणि LIC सारखी संस्था डबघाई ला आलेली आहे. जर SBI कोसळली तर करोडो लोकांचे सेविंग जाणार. ती बँक डबघाई ला का आली? चुकीची कर्जे देण्यास त्यांना मजबूर करण्यात आले. आता त्यातली बहुतेक कर्जे "बुडीत" आहेत म्हणतात.

या सर्व झोल चा केंद्रबिंदू मुंबई आहे. हा डोलारा पडणे आवश्यक आहे. आणि एक खूप मोठे recession भारताकडे येत आहे - हे मी दोन वर्षे ओरडतोय. मोदी हे महाभारतातल्या घटोत्कचासारखे आहेत - इंद्राची अमोघ-शक्ती स्वतःवर घेऊन ते पडतील, जेणेकरून अर्जुन वाचेल - तो अर्जुन कोण? ते माहिती नाही.

जेव्हा आणि जर मार्केट मध्ये panic पसरेल, तेव्हा आणि तर मुंबई मध्ये शेयर-बाजार, बॉलीवूड आणि रियल-इस्टेट हे तीन सेक्टर बसतील - म्हणजेच यांशी संबंधित सगळे बसतील.

यात नगरसेवक आले, मनपा-अधिकारी, पोलीस, राज्य-सरकार, केंद्र-सरकार, मध्यपूर्वेतले मोठे ब्रोकर, अफू-लॉबी मध्ये लोक सगळे आले).. मुंबई मध्ये टिकून राहणे हा शिवसेनेचा खूप खूप मोठा पराक्रम आहे. पण तो एक खूप मोठी किंमत चुकवून केलेला आहे. तसाच जसा आणीबाणी च्या सुमारास इंदिरागंधी च्या vengeance पासुन स्वतःला (आणि पश्चिम महाराष्ट्राला) वाचवण्यात शरद पवारांचा खूप मोठा पराक्रम आहे. पण तो गाजवायला त्यांनी सैतानाची मदत घेतली.. या सर्व कर्माचे फळ आज न उद्या भोगावे लागणारच. त्याचीच चिन्हे आता दिसून राहिलीत.. म्हणून वरची कमेंट.

या सर्वांच्या नाकाखाली टिचून हिंदू-मुलींचा मध्यपूर्वेत वेश्या-म्हणून पाठवायचा मोठा व्यापार मुंबई मधून चालतो - हे सर्वांना माहिती आहे, पण कुणी काही बोली शकत नाही (या व्यापारात १८५० मध्ये आताचे काही प्रथितयश घराणे देखील होते ).

हे सगळे enforce करायला युपी-बिहार-बंगाल मधले मुसलमान (आणि काही प्रमाणात हिंदू) गुंड असतात. त्यांना मुली सप्लाय कराव्या लागतात. एकूण काय तर एक खूप मोठी  कुजलेली ecosystem आहे मुंबई.

हिंदुत्वाचे पूर्ण प्राकट्य व्हायला हिंदू (पक्षी> हिंदुत्वनिष्ठ) लोकांकडे भांडवलाची "ownership" आणि कंट्रोल हवा जो १७९० ते १८५७ या कालावधीत आपण गमावला. आपण गमावला कारण या कालावधीत पश्चिम-किनारपट्टी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जोरदार आपटली.. मराठे पतित झाले आणि दोन खूप मोठे दुष्काळ लगातार येऊन त्यांनी या भागाची पूर्ण वाताहत केली. त्यामुळे या लॉबीला (ज्यांचे नेतृत्व तेव्हा आणि आज देखील इंग्रज करतात) पाय रोवायची संधी मिळाली.

मुंबई हि एक नोड आहे. या सर्व प्रकारचे केंद्र हे सेन्ट्रल-लंडन आहे. आजही त्या भागाला "द सिटी" म्हणतात. तो वेगळा आणि रंजक इतिहास आहे. तो पुन्हा कधीतरी.

रबिन्द्रनाथ ठाकूर यांच्या शब्दात , " हे स्वर्गातल्या पित्या, भारतावर भीषण आणि निर्दय प्रहार कर, जेणेकरून तो स्वातंत्र्यरुपी स्वर्गात जागा होईल"..

जर मुंबईचे कंट्रोल्ड पतन मोदी करू शकले (लोकांचे सेविंग ला फारसा धक्का न देता) तर त्यांना मी तरी अवतारी पुरुष म्हणेन. कॉंग्रेस ने (बव्हंशी त्यांच्या नाईलाजाने) एक खूप मोठा टाईम-बॉम्ब लावून ठेवला आहे. तो फुटणार हे निश्चित - कधी आणि किती कंट्रोल्ड स्वरुपात - हे ठरायचे आहे.

 

 

 

Sunday 15 March 2020

कोरोना व्हायरस च्या निमित्ताने spanish फ्लू च्या साथीचा इतिहास

१. शंभर वर्षांपूर्वी १९१८-१९१९-१९२० मध्ये spanish फ्लू ची साथ आली होती. जगभरात ४ ते १० कोटी लोक दगावले होते. भारतात ३० लाख ते २ कोटी लोक दगावले होते. माझे पणजोबा याच साथीमध्ये वारले होते. महायुद्धामुळे हिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पहिल्या महायुद्धात लष्कर भरती होणार नाही म्हणून कित्येक ठिकाणी याच्या बातम्या सर्व सरकारांनी दाबून टाकल्या. त्यामुळे हा रोग जास्त पसरला. असो.

२. हि साथ तीन फेज मध्ये आली. १९१८ च्या वसंत ऋतूत आलेल्या पहिल्या लाटेत खूप लोकांना बाधा झाली परंतु दगावणाऱ्या लोकांमध्ये लहान मुले आणि म्हातारे लोक जास्त होते. हि लाट देखील कॅनडा मध्ये कॅनडियन सेनेसाठी काम करणाऱ्या चीनी मजुरांमुळे सुरु झाली अशी थियरी आहे. कॅनडियन आणि अमेरिकन सेनेने हा विषाणू ब्रिटन आणि नंतर फ्रांस मध्ये पोहोचवला. १९१८च्या वसंत ऋतू मध्ये जर्मनीने फ्रान्सवर शेवटची निकराची चढाई सुरु केली. याला स्प्रिंग ओफेन्सीव म्हणतात (ऑपरेशन मायकल, ऑपरेशन जोर्जेट) - यात जर्मनीने फ्रांस-इंग्लंड-अमेरिका-कॅनडाची एकहाती मजबूत वाताहत केली. त्यांचे देखील भरपूर खासे योद्धे मारले गेले. माझ्या मनात दोन्ही महायुद्धात जर्मनी बद्दल असलेल्या soft-corner च्या अनेक कारणांपैकी हे एक आहे. असो. या (तात्पुरत्या) जर्मन विजयाचा दुष्परिणाम हा झाला कि त्यांनी भरपूर इंग्रज-फ्रेंच-कॅनडियन-अमेरिकन युद्धकैदी ताब्यात घेतले. आणि इंग्रज युद्धकैद्यांनी हा फ्लू चा व्हायरस जर्मन सेनेत पोहोचवला. एक चतुर्थांश जर्मन सेना फ्लू ने बाद झाली. मृत्यू कमी पण आजारी होऊन out of action झालेल्यांची संख्या खूप मोठी होती. इतकी मोठी कि पुढली चढाई जी जर्मनीला अमेरिका पूर्णपणे युद्धात उतरायच्या आत आटपायची होती, तिला ४ आठवडे पुढे ढकलावे लागले. तोवर उशीर झाला, मित्रदेशांनी जर्मनीला मागे ढकलायला सुरुवात केली. जर्मन सेनापतीने राजीनामा देऊन पलायन केले. तोवर इंग्रज-कॅनडियन-अमेरिकन-फ्रेंच सैनिकांना या फ्लू संबंधी resistance आला होता. भरपूर सैनिक रिकव्हर झाले होते. उलट जर्मन सैनिक आजारी होते किंवा नुकतेच आजारातून बरे झाले होते.

३. १९१८च्या शरद-शिशिर-हेमंत ऋतूत विषाणू मध्ये आमुलाग्र बदल झाला. विषाणूने इतक्या लोकांना बाधित केले आणि स्वतःच्या इतक्या खर्व कॉपी बनवल्या कि त्यात नवीन म्युटेशन्स घडले जे जास्त धोकादायक होते. दरम्यानच्या काळात रोगाची लागवण कमी झाली होती आणि हि महामारी आटोक्यात आली असे लोकांनी हळूहळू जाहीर करायला सुरुवात केली होती. पण हि दुसरी फेज सर्वाधिक घातक होती. पहिल्या फेज मध्ये बहुतेक बाल-वृद्धच दगावले होते. या दुसऱ्या फेज मध्ये तरणेताठे लोक देखील माश्यांसारखे पटापट पडू लागले. जर्मनीत या तापाला २४-तासांचा ताप म्हणू लागले. लक्षणे दिसू लागल्यानंतर २४ तासात लोक निळे पडून मृत्युमुखी पडू लागली. फुफ्फुसात पाणी साचून स्वतःच्या शरीराच्या पाण्यात बुडून लोक मरत होती (न्युमोनिया). विषाणू रोगप्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम घडवत होता.

४. आमचे मायक्रोबायोलोजीस्ट पूर्वज bacteria ला शोधत होते कारण त्यांच्याहून लहान कुणी असते हे तेव्हा माहिती नव्हते. आणि इन्फ़्लुएन्ज़ा चा bacteria अनेक शवांमध्ये सापडला देखील. पण सर्व शवांमध्ये सापडत नव्हता. या bacteria विरुद्ध लस याच काळात बनली (आजही त्या लशीची प्रगत आवृत्ती आपण आपल्या लहान पोरांना देतो - HiB1 वगैरे नावांनी - हिमोफिलस इन्फ़्लुएन्ज़े). पण असे काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये पण जे या रोगाचे कारण असू शकते - हि कल्पना आली होती. पण कदाचित घोड्यांना मृत लोकांच्या फुफ्फुसातले द्रव टोचल्यावर bacteria सोबत हा अदृश्य विषाणू विरुद्ध देखील घोडा antibody बनवेल या आशेतून लोकांनी सैनिकांचे लसीकरण केले (महायुद्ध सुरु असल्यामुळे सर्व गोष्टींवर पहिला अधिकार सैन्याचा). पण फारसा फरक पडला नाही.

५. १९१९ च्या उन्हाळ्यानंतर या दुसऱ्या फेज ची मारकता कमी झाली. १९१९च्या हिवाळ्यात तिसरी फेज आली. ती तुलनेने कमी मारक होती (पहिली पेक्षा जास्त पण दुसरी पेक्षा कमी). तोवर खूप लोकांना रोगाची लागवण होऊन बरीच लोक दगावली होती तशीच बरीच बरी देखील झाली होती. जी बरी झाली होती ती या रोगाविरुद्ध त्यांच्या शरीरात antibody बाळगून होती. याला herd immunity म्हणतात. विषाणू खूप वेगात पसरला आणि ३/५% लोकांचा जीव घेऊन देखील ९५% लोकांना स्वतः विरुद्धची प्रतिकारशक्ती देऊन गेला.

६. जगभरात वर सांगितल्याप्रमाणे १० कोटीच्या आसपास लोक मेली. पहिल्या महायुद्धावर परिणाम झाला. अनेक नवीन शोध हि महामारी देऊन गेली. भारतात २ कोटी लोक मेली असावीत असा अंदाज आहे. स्वतः गांधी या रोगात मरता मरता वाचले होते.

७. पाश्चात्य जगतावर या साथीचा खूप खोल परिणाम झाला. फ्लू म्हंटला कि लोक घाबरतात. चालू असलेली कोरोना विषाणूची साथ याच कटू स्मृती चाळवते.. म्हणून हा लेखन प्रपंच. साथीस घाबरण्याचे कारण नाही. तूर्तास तरी. हा रोग दुर्दैवाने झालाच तरी शक्यता अशी आहे कि तुम्हाला प्रतिकार शक्ती देऊन जाईल. तस्मात काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, विटामिनची गोळी घेत चला.. लोकांशी स्पर्श व इतर संपर्क शक्यतोवर टाळा... वरचेवर हात धूत राहा.

८. मी स्वतः महासुदर्शन काढा, लक्ष्मीविलास रस वगैरे नेहमीचे औषधे सुरु केली आहेत. माझा या काढ्यावर खूप विश्वास आहे. याने झालेली सर्दी बरी होत नाही, पण रोज घेत राहिले कि सर्दी मला तरी लवकर होत नाही.

बाकी अवघ्या आशा श्रीरामार्पण....

Tuesday 7 May 2019

अपौरुषेय म्हणजे काय?

अपौरुषेय या शब्दा विषयी थोडेसे : बऱ्याच लोकांची या शब्दाच्या चुकीच्या माहितीमुळे निष्कर्षात चुका होतात. तस्मात हा लेखन प्रपंच.
चेतन ज्ञानापासून जड विश्वाची उत्पत्ती झाली - हा धर्माचा मुख्य सिद्धांत आहे. ज्ञानाला कुणीही उत्पन्न करू शकत नाही. म्हणजेच ज्ञान/वेद हे ईश्वर देखील निर्माण करू शकत नाही. कारण जर ईश्वराने ज्ञानास उत्पन्न केले असे म्हंटले तर आधी ईश्वर अज्ञानी होता का? आणि जर होता, तर हे अज्ञानी तत्व ज्ञानासारखी गोष्ट कशी काय निर्माण करू शकेल?
वेद म्हणजेच ज्ञान अपौरुषेय आहे - ते या अर्थाने. ज्ञान कुणीही निर्माण/उत्पन्न करू शकत नाही. पण ज्ञानापासून सर्व सृष्टी (देवी देवता लोक जगत इत्यादी) उत्पन्न होते.
वेद या ग्रंथांची भौतिक रचना माणसांनीच केलेली आहे. ज्या ऋषींना जे जे मंत्र समाधी अवस्थेत स्फुरले त्या ऋषींना त्या मंत्रांचे द्रष्टेपण दिलेले आहे. उदा. गायत्री मंत्राचा द्रष्टा ऋषी विश्वामित्र. हे पुरूषच होते (काही स्त्रिया देखील होत्या).
पण अपौरुषेय या शब्दात असलेला पुरुष हा "पुरे शेते स पुरुषः" (जो या पुरात वास्तव्य करून आहे तो) या अर्थाने अभिप्रेत आहे, व्यक्ती या अर्थाने नाही. सांख्ययोगात आणि सनातन धर्मात इतरत्र देखील "पुरुष" या शब्दाचा हा अर्थ अभिप्रेत आहे. परंपरेने विष्णू या देवतेला पुरुष म्हणतात (यद् विशितो भवन्ति तद् विष्णुः भवन्ति - जो विश्वाच्या आत शिरून सर्वत्र ओतप्रोत भरलेलआहे तो विष्णू - तुकारामांचे विष्णुमय जगत ते हेच). सेश्वरवादी लोक पुरुष या शब्दाचे प्रयोजन सहसा ईश्वर या अर्थाने करतात.
निरीश्वरवादी लोक (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक इत्यादी) पुरुष शब्दाचा उपयोग प्रकृती च्या सापेक्ष सहसा करतात. प्रकृतीने बनवलेल्या या तीन गुणांच्या आणि पाच महाभूतांच्या शरीरात जे तत्व वास्तव्य करून आहे, ते तत्व म्हणजे पुरुष. सांख्ययोगाचे सेश्वरत्व सापेक्ष आहे. चित्तवृत्तीनिरोध साधायच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे ईश्वर प्रणिधान. इथे ईश्वर हे एक साधन आहे, साध्य नाही की कैवल्य/मोक्ष  “देणारा” मुकूंद नाही. 

वेदांतातला ईश्वर आणि सांख्ययोगातला ईश्वर या दोहोंचे प्रायोजन खूप सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे. 

पण हा सुक्ष फरक जरी असला तरीही सेश्वरवादी असोत कि निरीश्वरवादी, वेदांचे म्हणजेच चेतन ज्ञानाचे अपौरुषेयत्व (वरील अर्थाने) हे आस्तिक दर्शनांच्या (म्हणजेच प्रचलित हिंदू धर्माच्या) गाभ्याशी आहे.

Wednesday 27 March 2019

उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणी - २७ मार्च २०१९


आज सकाळी भारताने पृथ्वीच्या लो-अर्थ-ओर्बीट (LEO) या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांना टिपू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पंप्र मोदींनी सकाळी ११:२३ ला केलेल्या tweet मुळे अनेकांचे थांबे दणाणले होते आणि आमच्यासारख्या जिंगो-लोकांना उत आला होता कि आता घोषणा काय करतील. एका तासाच्या विलंबानंतर मोदींनी भारताच्या उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती देशाला दिली आहे. मजेशीर प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. काहींचा भ्रमनिरास झाला, काहींना अपेक्षित असलेले पाकिस्तानशी युद्ध किंवा मसूद-अझहर चा मृत्यू वगैरे नाही मिळाल्यामुळे थोडा हिरमोड झाला, बहुतेक मोदींच्या विरोधकांनी आणि द्वेष्ट्यांनी तर सरळ याचे सुद्धा श्रेय पंडित नेहरूंना देऊन टाकले. थोडक्यात काय तर दुपार मोठी मजेशीर गेली. 

पण आज झालेल्या चाचणीचा अर्थ काय, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आजच्या चाचणीचे दोन परिमाण आहेत - तांत्रिक आणि भूराजकीय

भाग १ - चाचणीचे तांत्रिक परिमाण

मी खूप आधी (सुमारे १० वर्षांपूर्वी, ओर्कुटच्या काळात) भारताच्या जी.एस.एल.वी आणि त्यात उपयोगात येणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने माझा जुना फडणविशी ब्लॉग गुगल ने काहीही न सांगता काढून टाकला, त्यामुळे माझे असंख्य लेख नष्ट झाले. archives आणि cache मधून मी जे लेख वाचवू शकलो, त्यांना या नवीन ब्लोगवर टाकले आहे.. सुदैवाने क्रायोजेनिक इंजीनावरचा हा लेख वाचला.. त्याची लिंक मी इथे देत आहे. वाचकांनी तो लेख अगोदर वाचवा, आणि मग इथे पुढे सरकावे हा माझा सल्ला.. 






वरील लेखात तुम्हाला हे कळेल कि मनुष्याला पुढे जायला काहीतरी मागे सोडावे लागते. सहसा मागे सोडलेली गोष्ट माणसाने "जाळून" सोडलेली असते. कुठलीही गोष्ट जळायला आवश्यक अश्या दोन वस्तू - इंधन आणि प्राणवायू (ऑक्सिजन). अंतरिक्षात हवा नसते, त्यामुळे नुसते इंधन नेऊन उपयोगाचे नाही, सोबत ऑक्सिजन सुद्धा न्यावा लागतो. तर क्रायोजेनिक इंजिन मध्ये इंधन असते हायड्रोजन आणि सोबत जाळायला ऑक्सिजन. हे दोन्ही - २५० डिग्री सेल्शियस इतक्या तापमानावर ठेवलेले असतात, त्यांना क्षणार्धात वायुरूपात बदलवून ज्वलन घडवणे (कंट्रोल मध्ये, नाहीतर स्फोट व्हायचा) हे फार क्लिष्ट इंजिनियरिंग आहे. 

अश्या रॉकेट मध्ये वेगवेगळ्या स्टेज असतात, वरील परिच्छेदात वर्णिलेली स्टेज हि क्रायोजेनिक स्टेज म्हणवते. या स्टेज मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन च्या टाक्या असतात ज्यात द्रवरूपातील हे वायू प्रक्षेपणाच्या काही तास अगोदर भरले जातात. इतक्या मोठा टाक्या भरायला भरपूर वेळ लागतो, जो प्रोब्लेम नसतो कारण अंतराळ प्रक्षेपणे हि कित्येक महिने अगोदर ठरवलेली असतात, त्यांच्या प्रक्षेपणाचे ठिकाण ठरलेले असते आणि त्या ठिकाणी सर्व उपकरणे, सामग्री आणि काही प्रोब्लेम झाल्यास तो निस्तरायला इंजिनियर/वैज्ञानिक तत्पर असतात. तीनही शिफ्ट मध्ये. 

एक सामरिक मिसाईल हे दिसायला जरी रॉकेट सारखे असले (टेक्निकली ते रॉकेटच) तरी वरील परिच्छेदात वर्णिलेल्या सोयी आणि सुविधा क्षेपणास्त्राला मिळत नाहीत. कारण क्षेपणास्त्र सोडायची वेळ युद्धात येते आणि युद्धजन्य परिस्थितीत वेळ आणि जागा हि सर्वात महत्वाची. म्हणून सहसा युद्धात वापरायच्या क्षेपणास्त्रांमध्ये इंधन हे द्रवरुपातले नसते तर घनरुपातले असले (solid fuel). सहसा क्षेपणास्त्रे पृथ्वीचे वातावरण सोडत नाहीत, त्यामुळे इंधन जळायला लागणारा ऑक्सिजन हवेतूनच मिळतो.. अगदी १०,००० किमी मारा करू शकणारी ICBM (Inter-Continental Ballistic Missile) सुद्धा फार उंच जातात पण वातावरणाच्या बाहेर जात नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन चे काय करायचे - हा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही. 

एका टिपिकल क्षेपणास्त्राची वाट (trajectory) हि सहसा अशी दिसते - 


आपण हवेत फेकलेला दगड सुद्धा याच मार्गाने जातो - जोवर आपण दिलेली शक्ती आहे तोवर दगड वर जातो, मग एका उंचीवर जाऊन तो थांबतो (गती शून्य होते) आणि मग तितक्याच वेगाने येऊन खाली पडतो. क्षेपणास्त्र देखील असेच काम करते, त्याच्या सर्वोच्च बिदुवर त्याची गती सर्वात कमी असते (एखाद्या सेकंदासाठी गती शून्य होते). कुठल्याही क्षेपणास्त्राला पाडायला, हा सर्वात सोपा बिंदू आहे. या बिंदू नंतर खाली पडतांना क्षेपणास्त्र गुरुत्वाकर्षण मुळे वेग धरते आणि जेव्हा ते टार्गेट वर आदळते त्याची गती आवाजाच्या ७-१० पट असते (mach 7-10). क्षेपणास्त्राच्या खाली पडतांनाच्या स्टेज मध्ये त्याला अडवून नष्ट करणे (interception) जवळपास अशक्य असते. कारण विलक्षण गती. तुमच्या रडार ते पडतांना दिसते पण ते इतक्या वेगात पडत असते (गुरुत्वाकर्षण त्याला साथ देते आहे) कि तुम्ही त्याचे सहसा काहीच करू शकत नाही. ध्वनीचा दहापट वेग म्हणजे जवळपास तासाला १०,००० किमी हा स्पीड.. 

हे झाले साधारण क्षेपणास्त्र. 

आज ज्याची चाचणी झाली, त्या क्षेपणास्त्राला पाच मुख्य प्रॉब्लेमना सामोरे जावे लागते. 

१. ३००-५०० किमी उंचीवर वातावरण नाही - इंधन जळायला ऑक्सिजन येणार कुठून - सोबत न्यावा लागेल.

२. द्रव रुपात ऑक्सिजन नेता येणार नाही (टाकी भरायला तासंतास लागतात - युद्धात इतका अवधी कसा मिळणार). घन रुपात शुद्ध ऑक्सिजन नेणे शक्य नाही युद्धजन्य परिस्थितीत. त्यामुळे ऑक्सिजन सोडणारे oxidants  सोबत असतात - क्लिष्ट केमिस्ट्री आहे - विश्वास ठेवा. इथे सांगता येणार नाही. 

३. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या ठिकाणाचा भरोसा नाही - हे युद्ध आहे, कुठूनही प्रक्षेपण करता आले पाहिजे (विमानातून, जहाजातून, पाणबुडीतून, ट्रकच्या कंटेनर मधून, रेल्वेतून). प्रक्षेपण करणारे लोक हे सैनिक असतात, शास्त्रज्ञ नाही, काही प्रोब्लेम आला तर तो दुरुस्त करायला कुणीही नसणार. अधिक, ट्रक जर जबलपूरच्या एखाद्या माळरानात उभा असेल तर इंजिनियर कुठून आणणार? त्यामुळे ready-to-launch स्वरुपात असलेल्या canister मध्ये  यांना स्टोर केलेले असते. 

४. सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे या क्षेपणास्त्राचे जे टार्गेट आहे ते सेकंदाला ८-१५ किमी या गतीने पृथ्वीची प्रदक्षिणा करत असते. सेकंदाला ८-१५ किमी म्हणजे ताशी ३२,५०० ते ५४,००० किमी - हा वेग.. मी वर म्हंटले आहे - इतक्या वेगात जाणाऱ्या वस्तूला बघणे सोपे आहे (tracking) पण अडवणे (interception) खूप कठीण. साधारण क्षेपणास्त्राचे टार्गेट स्थिर असते किंवा तुलनेने खूप हळू चालत, अगर उडत असते. वरील आकृतीनुसार सर्वोच्च बिंदूवर साधारण क्षेपणास्त्राची गती शून्य असते - शून्य (किंवा सर्वात कमी गती असलेला बिंदू) गती असतांना सेकंदाला ८-१५ किमी गतीने जाणार्या उपग्रहाला पोहोचायचे कसे? 

५. बरे गणिताने टायमिंग साधून जर क्षेपणास्त्र सोडले तर ते उपग्रहाजवळ जाईल देखील. पण मग त्या क्षणी त्या उपग्रहाला फोडायचे कसे? दोन मार्ग आहेत. पहिला सर्वात सोपा आणि सर्वात inefficient म्हणजे proximity fuse. म्हणजेच थोडेफार जवळ जाऊन जोरात स्फोट घडवायचा. आपल्यापासून ५० मीटर वर मोठा स्फोट झाला तरी आपल्याला इजा होते. प्रत्यक्ष आपल्या अंगावर बॉम्ब फुटायची आवश्यकता नाही. दुसरा मार्ग म्हणजे Kinetic Kill. Kinetic kill म्हणजे प्रत्यक्ष धक्का देऊन मग स्फोट करणे. ८-१५ किमी/सेकंद गतीने जाणाऱ्या उपग्रहाला धक्का देणे म्हणजे स्वतः देखील जवळपास त्याच गतीने प्रवास करणे हे ओघाने आलेच. क्षेपणास्त्राच्या सर्वोच्च बिंदूवर (जिथे गती सर्वांत कमी असते), तिथे ती सर्वात कमी गती हि ८-१५ किमी/सेकंद च्या रेंज मध्ये ठेवणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इतक्या वेगात स्वतः जात असतांना टार्गेट ला अंतरिक्षात बघणे, track करणे - जिथे सौर-लहरी असतात, कॉस्मिक-किरणे इलेक्ट्रोनिक वस्तूंना इजा पोहोचवत असतात, तापमानातील फरक आणि तफावत प्रचंड असते. आपण आज घेतलेल्या चाचणीत दुसरा मार्ग निवडला होता जो खचितच अत्याधिक अवघड आहे. आज मोदींनी हे सांगितले नाही, पण चाणाक्ष लोकांच्या सहज लक्षात आले कि सेकंदाला ८-१५ किमी वेगाने जाणाऱ्या वस्तूला बघायचे (tracking) आणि अडवायचे (interception) - दोन्ही करायचे तंत्रज्ञान आता भारताकडे आहे - याचे अप्लिकेशन साधारण मिसाईल अवरोधी शिल्ड (anti ballistic missile defensive shield - ज्याला आपण Prithvi Aerial Defense - PAD - प्रद्युम्न  आणि advanced air defence - AAD असे म्हणतो) इथे आहे. आता येणाऱ्या मिसाईल ला भारत त्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील भारत बघू आणि अडवू शकतो हे आपण शब्दात जाहीर न करता जगाला दाखवून दिले. 

या पाच प्रॉब्लेम वरून तुम्हाला कळेल कि आज झालेली चाचणी हि तांत्रिक दृष्ट्या किती क्लिष्ट होती ते. आजची चाचणी हे सांगते कि आपण हे पाचही खूप क्लिष्ट असे प्रॉब्लेम सोडवले आहेत.. खूप मोठी गोष्ट आहे हि. 

म्हणून आपल्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. तांत्रिक दृष्ट्या आजची चाचणी अणुचाचणी इतकीच क्लिष्ट आणि महत्वाची होती. ती करून भारताने एक खूप मोठा मैलाचा दगड सर केला आहे. 

भाग दोन -चाचणीचे भूराजकीय परिमाण

बऱ्याच पुरोगामी लोकांची आज या कारणास्तव जळाली कि मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हि चाचणी जाहीर का केली? ती तशी करणे आवश्यक होते म्हणून. 

वर सांगितल्या प्रमाणे, आजची उपग्रहरोधी क्षेपणास्त्र चाचणी हि तांत्रित दृष्ट्या अणुचाचणी इतकीच क्लिष्ट होती. पण ती राजकीय दृष्ट्या सुद्धा अणुचाचणी इतकीच महत्वाची होती. 

लक्षात घ्या - आजचे संपूर्ण युग आणि या युगातील सर्व उपकरणे हि डिजिटली एकमेकांशी लिंक झालेली आहेत. अगदी आपण घरी दैनंदिन वापरणाऱ्या गोष्टी देखील आता आपण मोबाईल वरून लांबून हाताळू शकतो - कारण सगळे काही एकमेकांशी नेटवर्क झालेले आहे. घर-कार-फ्रीज-टीव्ही-एसी-वाशिंग मशीन-पंखे-दिवे-भांडे धुवायचे मशीन - सगळे काही एकमेकांशी डिजिटली लिंक झालेले आहे. आपल्याकडे याचे प्रस्थ अजून यायचे आहे पण टीव्हीवर जाहिरातींमध्ये हे दिसू लागले आहे. हे सगळे नेटवर्क सांभाळायचे आणि संचालित करायचे काम हे अवकाशातील उपग्रह आणि जमिनी खालील optical fiber cable जाळ्याने होते. यातील उपग्रह हा सर्वात महत्वाचा घटक - सगळे फोन, टीव्ही उपग्रहाच्या माध्यमातूनच संचालित होते. एक उपग्रह बनवायला कित्येक महिने लागतात, तो पडायला तीन मिनिटे लागतात. 

अगोदर उपग्रह खूप उंच असल्या मुळे त्यांना कुणी हात लाऊ शकत नसे. शीतयुद्धात उपग्रह देखील क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या कक्षेत आले. त्यामुळे एखाद्या देशाच्या सर्व उपग्रहांना पाडणे हे आता ३ मिनिटांचे काम झाले आहे. उपग्रह निकामी झाले कि संपूर्ण देश कोलमडतो, सगळे दळणवळण आणि त्यांची साधने बंद पडतात. 

हे क्षेपणास्त्रे हि आजकालचे नवीन अणुबॉम्ब आहेत. अणुबॉम्ब ची भीती का होती (आणि आहे)? दुसऱ्या महायुद्धात जर एक शहर उध्वस्त करायला ४०० विमाने आणि शेकडो बॉम्ब लागायचे (आणि वेळ) तेच काम एक बॉम्ब काही मिनिटात करू शकतो - हे जेव्हा जगणे हिरोशिमा-नागासाकी ला बघितले तेव्हा माणुसकी थरारून उठली होती. इतकी मोठी संहारक शक्ती हि नेहमी घाबरवणारी असते. माणुसकीच्या इतिहासात "क्षणार्धात होत्याचे नव्हते होणे" - हि म्हण फक्त म्हण म्हणूनच होती हिरोशिमा अगोदर.. ते प्रत्यक्षात घडू शकते हे बघितल्यावर जगाचा युद्धाकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला. 

हि शक्ती कमीत कमी लोकांकडे राहणे हा त्या वेळेसच्या शक्तींचा अट्टाहास होता - कारण अणुबॉम्ब च्या नुसत्या असण्याने युद्धे टाळता येत होती (अमेरिका-रशिया १९४७ मध्ये इराण मध्ये युद्धाच्या खूप जवळ आले होते - इराण मधून माघार घ्यायला रशिया टाळाटाळ करत होता, अमेरिकेने रशियन सेनेवर अणुबॉम्ब टाकायची धमकी दिली आणि रशियाने घाबरून माघार घेतली - हि मोठी गोष्ट आहे खूप). अणुबॉम्ब वापरावा लागत नाही सहसा. त्याच्या नुसत्या आपल्याकडे असण्याने आपल्याला हवे ते करवून घेता येते - हे जगाने बघितले. 

१९४९ मध्ये रशिया कडे अणुबॉम्ब आला आणि मग फ्रांस, ब्रिटन, चीन वगैरे. या इतिहासावर पुन्हा कधीतरी लिहीन. पण १९५०च्या दशकात अणुबॉम्ब विरोधी वातावरण तयार झाले आणि ज्यांच्याकडे १९६८ अगोदर अणुबॉम्ब होता, त्यांनी अणुबॉम्बचे तंत्रज्ञान त्यांच्यापुरतेच राहावे आणि इतरांना ते बनवता येऊ नये असा करार केला.. याची वाच्यता १९५०च्या दशकातच झाली होती आणि त्यावेळेस डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी नेहरूंना १९६० मध्ये अणुचाचणी करा आणि या लहान क्लब मध्ये भारताला स्थान मिळवून द्या असा सल्ला दिला होता. नेहरूंनी तो नेहमी प्रमाणे धुडकावला. शांती अहिंसा वगैरे वगैरे -  नेहरूंना पडण्यार्या बहुतांश शिव्या (काश्मीर प्रश्न असो, युनो मधील स्थान मिळवायची संधी गमावणे असो, चीनसंबंधी बोटचेपे धोरण असो कि अणुबॉम्ब न फोडणे हा निर्णय असो - या बहुतेक शिव्या न्याय्य शिव्या आहेत. नेहरूंच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारताला खूप मोठी किंमत आजतागायत मोजावी लागत आहे). 

असो, तर आपण भाभांचे ऐकून अगोदर अणुचाचणी केली नाही आणि मग २००७/०८ पर्यंत अणुशक्ती म्हणून मान्यता मिळवायची भिक मागत बसावे लागले. आणि २००८ मध्ये मनमोहन सिंह यांनी अमेरिकेशी केलेल्या करारान्वये देखील आपण आयात करत असलेले युरेनियम हे अंतरराष्ट्रीय एजन्सी (IAEA) यांच्या देखरेखी खाली करावे लागते. ती एजन्सी चीनवर किंवा फ्रांस वर देखरेख करू शकत नाही (कि आयात होत असलेले युरेनियम भट्टीत उपयोगात आणले जात आहे कि अणुबॉम्ब बनवायला उपयोगात आणले जात आह). 

त्यामुळे नेहरूंनी १९६० मध्ये सोडलेली संधी आजवर आपल्याला भोवते आहे. 

मी हे इथे सांगायचे कारण कि उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र - हे तंत्रज्ञान हे त्यावेळेस च्या अणुबॉम्ब इतकेच disruptive आहे. त्यामुळे सध्या जिनीवा, स्वित्झरलंड मध्ये हे तंत्रज्ञान असेच सीमित ठेवायचा करार करायची बैठक सुरु आहे. हि बैठक अजून काही वर्षे वरचेवर भेटत राहील. आणि मग १९६८ सारखाच एक करार करेल कि अमुक तारखे नंतर कुणीही उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राच्या चाचण्या करू शकणार नाही आणि जो करेल त्यावर अंतरराष्ट्रीय निर्बंध लागतील. 

मोदींनी या वेळेस नेहरूंची चूक टाळली. कोणताही आंतरराष्ट्रीय करार होण्याच्या आत भारताने आता  अमेरिका-रशिया-चीन या तिकडी च्या बैठकीत कायमचे स्थान मिळवले आहे. आता जेव्हा केव्हा करार होईल (जो होईलच - कारण हे तंत्रज्ञानाच तितके भयावह आहे ), तेव्हा आपण "आतले" असू.. बाहेरचे नाही..  

दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानशी सुरु असलेले प्रोब्लेम. चीन ने सिंध प्रांतात आपली सेना तैनात केलेली आहे. जर पाकिस्तानशी युद्ध उद्भवले (जे अनिवार्य दिसते आहे ), तर चीन विरुद्ध या तंत्रज्ञानाशिवाय युद्धात उतरणे खूप disadvantage चे ठरले असते. आता आपल्याकडे पण चीन चे उपग्रह पाडायचे तंत्रज्ञान असल्यामुळे चीन उघडपणे भारताविरुद्ध आघाडी उघडतांना दहा वेळेला विचार करेल (को अगोदर पाच वेळेलाच केला असता). पाकिस्तानचा एक मोठा प्यादा आपण या चाली मुळे परस्पर गुंतवून ठेवला आहे. 

या वरील कारणास्तव हि चाचणी करणे आणि या चाचणी ची घोषणा पंतप्रधानाने करणे हे क्रमप्राप्त होते. आणि आवश्यक होते.. 

कारण जर अणुबॉम्ब किंवा हे क्षेपणास्त्र वापरायची वेळ आली तर तो निर्णय सेना घेत नसते - तो निर्णय पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष घेतात. म्हणून अश्या अस्त्रांना राजकीय अस्त्रे म्हणतात (strategic weapons). जी शस्त्रास्त्रे वापरायचा (अगर न वापरायचा) निर्णय सेना घेते त्यांना tactical weapons म्हणतात. 

भारतीय अभियंता आणि शास्त्रज्ञांना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.. एक खूप अवघड तंत्रज्ञान पहिल्या झटक्यात आत्मसात केल्या बद्दल (चीन ४ वेळेस अपयशी ठरला, पाचव्यांदा यश आले).

पंतप्रधान मोदींचे अभिनंदन - नेहरूंची चूक टाळल्या बद्दल आणि या चाचणीला राजकीय पाठींबा देण्याचे धाडस करण्या बद्दल.. 

देश तुम्हा दोघांचा कायम ऋणी राहील....

वंदे मातरम....

Thursday 1 June 2017

अल्पायुषी मराठे आणि bacteria - भाग २

गेल्या भागात आपण इन्फेक्शन आणि त्यांच्या मध्ययुगीन आयुष्यावर होणारा परिणाम यावर थोडीशी चर्चा केली. आता याचे पुढील विवरण इथे करायचा प्रयत्न करतोय. थोडा घाईत आहे. त्यामुळे हि पोस्ट थोडी छोटी असेल. पोटाच्या (टायफाईड, आतड्याचा टीबी, गुढघी इत्यादी) विकारांमुळे बाजीराव, माधवराव, नानासाहेब, चिमाजी, शिवछत्रपती इत्यादी दिग्गज वारल्याचे आपण मागच्या भागात बघितले. स्वच्छतेची साधने आणि सामान्यतः त्या काळातले मनुष्यजातीचे या विषयाबाबतचे अज्ञान हे या मागची कारणे आहेत. आता मुख्य प्रश्न असा कि मोगलांचे सरदार इतके कसे काय जगले?

ऐतिहासिक वस्तुस्थिती हि आहे कि हिंदूंचे स्वच्छतेबाबतचे आग्रह आणि विटाळ इत्यादी खूप कडक असतात. गुप्तकाळात आणि त्या नंतरच्या वर्धनकाळात चीनी प्रवासी लोकांनी भारतीय दिवसातून दोन वेळेस आंघोळ करतात व स्वच्छतेबाबतीत खूप आग्रही आहेत हे वारंवार सांगितलेले आहे. हि बाब नंतरच्या युरोपीय प्रवाश्यांच्या रोजनिशीत देखील वरचेवर आढळते. तत्कालीन विश्वात भारतीय लोक आणि त्यातल्यात्यातल हिंदू हे स्वच्छतेचे अत्याग्रही असत हे दिसते. मग पेशवे मंडळींच्या घरात पुरुष मंडळी अशी वरचेवर या आजारांमुळे का मरावीत कि जे आजार विष्ठेमुळे पसरले जाऊ शकतात? दुसरा प्रश्न असा कि त्या घरातल्या स्त्रियांना हे पोटाचे आजार होऊन ते वारले वगैरे माझ्यातरी वाचनात नाही. इथे एकाच फरक आहे कि स्त्रिया मोहिमेवर जात नसत. तस्मात पुरुष मंडळींना हे इन्फेक्शन मोहिमेवर असतांना झाले असावे असे माझे गृहीतक आहे.

हे होण्याचे जे कारण मला सुचते आहे ते मी इथे लिहोतो. मराठी मोहिमा सहसा वेगवान असत. बाजारबुणगे असत पण अगदी bare-minimum. तिथे सफाई करणारा crew (इथे नाईलाजास्तव जातींचा उल्लेख करावा लागत आहे, क्षमस्व) जसे महार-मांग-भंगी कमी असावेत किंवा नसावेत असा माझा कयास आहे. सैनिक म्हणून नव्हे तर सफाई-कामगार म्हणून. सैनिक म्हणून अनेक महार शिपाई आणि सरदार मराठी सैन्यात अगदी १८१८ पर्यंत मुबलक प्रमाणात होते हे आपल्याला प्राथमिक साधनांवरून माहिती आहे. पानिपतच्या मोहिमेत हि मंडळी इतकी तरली कारण भरपूर बाजारबुणगे नेले होते (त्यात हे सफाईदल देखील आले). म्हणून तर एक-दिड महिन्यानंतर रोगराई वगैरे पसरू लागली (अन्यथा आधीच पसरली असती जे बरे झाले असते कारण मन आधीच युद्ध झाले असते आणि कदाचित आधी युद्ध झाले असते तर विजय मिळाला असता, असो.)

बाजीरावाच्या मोहिमेत, नानासाहेबांच्या आधीच्या मोहिमेत, चिमाजीअप्पांच्या मोहिमेत आणि माधवरावाच्या राक्षसभुवन मोहिमेत असा मोठा बाजारबुणग्यांचा crew होता असे वाचनात तरी नाही. या उलट मोगलांच्या मोहिमा फारच मोठ्या आणि elaborate असत (म्हणून हळूहळू चालत - त्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे). सोबत जनानखाना, मुद्पाकखाना, आणि इतर सर्व लवाजमा चाले. यात उपर्लिखित सर्व गोष्टी आल्यात.

आधीच्या मुसलमानांच्या मोहिमांच्या काळात (खिलजी, तुघलक़, लोधी वगैरे मंडळी) त्यांचे बरेच सुलतान रोगराईमुळे भरपूर मेली आहेत. बरेच लोक गुप्तरोगांमुळे मेली (अनिर्बंध बलात्कार आणि स्त्रियांचा, पुरुषांचा, लहान मुलांचा वासनांध उपभोग) हे आपल्याला दिसतेच. त्या काळात देखील मोहिमांच्या शीघ्रतेमुळे सफाईदल सोबतीला नसावे (अल्लाउद्दिन खिलजी ८००० स्वारांनिशी देवगिरीवर चालून आला हा इतिहास आहे). सपोर्ट-crew कुठल्याही मोहिमेमध्ये खूप आवश्यक गोष्ट आहे.

काहीकाही मोहिमांचे स्वरूप असे असते कि तिथे असल्या लवाजम्याला जागा नसते. उदाहरणार्थ फक्त घोडदल असेल तर - जी बाजीराव आणि इतर मराठे बहुतांश असायचे). पण जर तोफखाना, पायदळ वगैरे सोबत असेल तर असा सपोर्ट-crew न्यावाच लागतो (तोफा ओढणारी असंख्य जनावरे असतात त्यांची साफसफाई अत्यावश्यक असते). माझ्या मते अश्या मोहिमांमध्ये सफाईदल प्रकर्षाने न्यावेच लागते.

 जाता जाता - पानिपतात महादजी शिंद्यांचा जीव अश्याच एका भिस्ती माणसाने वाचवला होता. भिस्ती लोक याच सफाईदलाचे लोक असतात.

Wednesday 31 May 2017

अल्पायुषी मराठे आणि bacteria

भाग १ - अल्पायुषी मराठे सत्ताधीश - या विषयावर मी बोलणार होतो. इतक्यातच चालू असलेला एक धागा बघून टिप्पणी करावीशी वाटली.
आपल्याला अलेक्झांडर फ्लेमिंग ने उपकृत करून ठेवले आहे. पेनिसिलीन च्या शोधामुळे माणसाच्या जीवनमानात खूप मोठा बदल पडला आहे, इतका कि आपण खूप गोष्टी गृहीत धरतो.
पेशव्यांच्या घराण्यात असलेला टीबी - खरोखरच तो टीबी होता का? माधवरावांचे बद्दल माहिती भरपूर आहे, त्या माहितीवरून समजते कि बहुतेक आतड्यांचा टीबी झाला होता. तीच गोष्ट टायफॉईड ची आहे. संडास झाल्यानंतर साबणाने हात घासावे, हि गोष्ट आपण आज खूप बेसिक समजतो. पण खूप नवीन आणि महत्वाची गोष्ट आहे हि. अगदी आता-आता पर्यंत लोक संडासनंतर हात राखेने किंवा मातीने घासायचे. मी युरोप मध्ये असताना "हात धुवा प्रकल्प" डेन्मार्क च्या सरकारने सुरु केला होता - सर्वत्र "हात धुतले का?" असे विचारणारे फलक झळकले होते. त्या वर्षी फ्लू ची लागण कमी लोकांना झाली असा रिपोर्ट नंतर छापला होता. शक्यतो इतरांचा स्पर्श टाळला तर बरेच संसर्गजन्य रोग टळतात हे माझे निरीक्षण आहे.
बाजीराव-चिमाजी-नानासाहेब-माधवराव वगैरे मंडळी पोटाच्या विकाराने का वारली, यावर त्यांच्या घरी स्वयंपाक करणारे लोक किती स्वच्छता पाळीत असत आणि सर्वात मुख्य म्हणजे स्वयंपाकी लोकांच्यात कुणी (carrier) या जंतूंचा वाहक होता का? हे तपासले पाहिजे. Abhiram Dixit यांनी सांगितल्या प्रमाणे नीट न उकळलेले दुध हे एक मोठे कारण असू शकते. धारोष्ण दुध पिणे वगैरे ठीक पण गायींची निगा नीट राखली जात होती का - वगैरे प्रश्नांची उत्तरे आता मिळणे मुश्कील आहे.
थोरले महाराज गूढघी (bloody flux) म्हणजे रक्ताचे जुलाब या विकाराने वारले असे वाचनात आले आहे. विषमज्वर म्हणजे काय ते माहिती नाही, पण अमिबिक जुलाब किंवा कॉलरा हे फार भयानक विकार आहे. कॉलरा एका धडधाकड माणसाला १२ तासात लंबा करू शकतो.
पेशव्यांचे असो किंवा थोरले महाराज असोत - त्यांना हे विकार घरातल्याच मंडळींकडून किंवा घरी काम करणाऱ्या स्टाफ करून झाले असावेत हा माझा दाट संशय आहे.
उत्सुक लोकांनी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रसिद्ध असलेल्या "टायफॉईड मेरी" या केस बद्दल वाचावे - मेरी नावाची एक स्वयंपाकिण होती - ती जिथे जिथे नोकरी करे तिथे तिथे लोक टायफॉईड होऊन मरत असत. लोकांना वाटले कि मेरी जादूटोणा करते. नंतर लक्षात आले कि मेरी हि टायफाईड च्या bacteria ची वाहक होती - हा bacteria तिच्या मोठ्या आतड्यात घर करून राहत असे आणि विष्ठेवाटे रोज निघत असे. संडास झाल्यावर तिथली जागा पाण्याने धुणे ठीक, पण नखात इत्यादी मळाचा एखादा कण देखील पुरसा असतो पिण्याच्या पाण्यात किंवा न उकळलेल्या अन्नात पडून इन्फेक्शन पसरवायला.
टायफॉईड मेरी सारखी किंवा सारखा कुणी मनुष्य पेशवे स्वयंपाकघरात नक्कीच कार्यरत असावा. :-)
फ्लेमिंग महाराज कि जय
लुई पाश्चर कि जय..

Sunday 21 May 2017

पी.व्ही.नरसिंहराव - आधुनिक भारताचा राष्ट्रपिता

आधुनिक काळातला सर्वोत्कृष्ट भारतीय नेता म्हणजे पी.व्ही.नरसिंह राव....  हा माणूस इतका उपेक्षित आहे कि विचारू नका. पण हा नसता तर भारत आता पर्यंत तुटला असता.. 

१. नरसिंह राव
२. अटलबिहारी वाजपेयी
३. इंदिरा गांधी (आणीबाणी मुळे नंबर खाली, अन्यथा दोन नंबर वर असत्या)

कुणाचा भाग्योदय कधी आणि कसा होईल सांगणे कठीण असते. ज्योतिषात एक विपरीत राजयोग म्हणून प्रकार ऐकून आहे. याचा ज्योतिषीय अर्थ आणि संदर्भ नक्की काय ते माहिती नाही, पण ज्यांचा विपदा कोसळल्यावर विपरीत परिस्थितीत दुसऱ्याच्या नुकसानामुळे काही लोकांचा भाग्योदय ज्या योगामुळे होतो  त्याला विपरीत राजयोग असे म्हणतात. नरसिंहराव हे खरे विपरीत राजयोगी. हे खरे आहे कि ते मंत्री म्हणून चमकले नाही. जागतिक  ब्यांकेचा रेटा होता हे खरंय, पण ज्या तऱ्हेने हे त्यांनी काम केले ते अप्रतिम होते.

पण पंतप्रधान झाल्यानंतर ते ३-४ वर्षात एक खूप मोठे आणि प्रचंड चक्र फिरवून गेले जे आजतागायत फिरतंय. भारताला पहिल्यांदा एक जेनुईन बुद्धीजीवी आणि संपूर्णपणे तटस्थ माणूस पंतप्रधान म्हणून भेटला. अर्थव्यवहार, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण क्षेत्रातले लोक यांना खूप दुवा देतात. सोवियत युनियनच्या पतनानंतर कुठल्याही युनो मध्ये सांभाळून घेणाऱ्या मायबापाशिवाय  या नवीन जगात चालायला सुरुवात यांनी करून दिली. काश्मीर मध्ये प्रॉब्लेम सुरु झाला होतं, पंजाब धुमसत होता, सोने गहाण टाकावे लागले होते, पूर्वेत नक्षली लोकांनी उच्छाद मांडला होता, श्रीलंकेत आणि तामिळनाडू मध्ये लिट्टे मंडळींनी नुकतेच राजीवगांधींना मारले होते आणि ३००० भारतीय जवान हुतात्मे झाले होते. समस्त शेजार शत्रू होता, आणि एकमेव मित्र लयाला गेला होता. भारतात हिंदू-मुस्लीम समस्या टोकाला जाऊ लागल्या होत्या, पाकिस्तानने अणुबॉम्ब कार्यान्वित केला होता (१९८९). 

हे सगळे आधीच्या पंतप्रधानांच्या पुण्याई मुळे घडले. यात जनता पार्टी चे मोरारजी देसाई देखील आले, आय.बी आणि रॉ वाले या गृहस्थाला खूप शिव्या घालतात. याने झिया-उल-हक यांच्याशी गप्पा मारतामारता सांगितले कि भारताला पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल माहिती आहे. एका खूप मोठ्या राष्ट्रीय सिक्रेट ची लिक या पंतप्रधानामुळे झाली होती, त्यामुळे ८० च्या दशकात (१९८६-८८) पर्यंत पाकिस्तानने चोऱ्यामाऱ्या करून आणि चीनशी मैत्री करून अणुबॉम्ब बनवला. विचार करा कि पाकिस्तान कडे अणुबॉम्ब आहे, आणि भारताकडे नाही, अश्या परिस्थितीत आतून आणि बाहेरून सर्वत्र भारत मार खात असताना ५ वर्षे राज्य करणे, आणि बाजी पालटणे हे खूप मोठ्या माणसाचे काम आहे.

अश्या परिस्थितीत कुणीच भारतात राज्य केले नाही. नेहरूंवर इंग्रजांचा आणि रशियाचा वरदहस्त होता. इंदिरांवर देखीलसोवियत रशियाचा पूर्ण वरदहस्त होता. नरसिंहराव आणि कारगील पर्यंतचे वाजपेयी, हे दोनच "स्वतंत्र" पंतप्रधान होते. क्लिंटन यांच्या भेटीनंतर, वाजपेयी देखील ढेपाळले. 

नरसिंह राव मुळे खालील गोष्टी झाल्या
१. अर्थव्यवस्था खुली झाली आणि त्या नादात देश विकल्या गेला नाही
२. अणु कार्यक्रम सुरु झाला. अणुबॉम्ब चे संपूर्ण श्रेय नरसिंह रावांना आहे. खुद्द वाजपेयींनी हे त्यांच्या मरणोत्तर कबुल केले आहे.
३. इस्राईल, विएतनाम सोबत मैत्री संबंध प्रस्थापित
४. काश्मीर संबंधी प्रस्ताव लोकसभेत व राज्यसभेत पारित करून घेतला. आता काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे व ते देऊन टाकायला लोकसभेत मंजुरी घ्यावी लागेल.
५. संरक्षण क्षेत्रात हळूहळू भारत स्वयंपूर्ण होऊ लागला (अग्नी, तेजस, आकाश, अर्जुन आणि इतर काही प्रकल्प यांनी सुरु केले)
६. कम्युनिस्ट लोकांना पूर्वेत रोखले.
७. रामजन्मभूमी आंदोलनात त्रयस्थ राहिले.
८. लायसन्स राज संपवला
९. शरद पवार व इतर प्रभृती यांना रोखले.
१०. काश्मीर मध्ये आर्मी घातली. सियाचीन वर सदैव सेना ठेवायचा निर्णय यांचा. चीनशी परत व्यापारी संबंध प्रस्थापित केले. आज तो व्यापार ६० अब्ज डॉलर इतका आहे. 

थोडक्यात जे जे काही नेहरूंनी करून भारताला ३% ग्रोथ रेट वर सीमित ठेवत होते, ते सर्व काढून आजचा ७-८% णे वाढणारा भारत बनवला. आजचा भारत (सर्व गुणदोषांसकट) नरसिंहरावांचा भारत आहे, नेहरू-महात्मा गांधी वगैरेंचा नाही. 

१९२१ साली तेलंगणा मध्ये रावांचा जन्म झाला. हे नक्की कुणाचे पुत्र हे माहिती नाही पण तेलंगणा मधल्या एका सधन ब्राह्मण कुटुंबाने या अज्ञात मुलाला दत्तक घेतले. हे आधीपासूनच सशस्त्र क्रांतीवाले होते. हैदराबादमुक्ती संग्रामात बॉम्ब वगैरे स्मगल करून ठिकठिकाणी स्फोट घडवायचे कार्यात यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. मराठीत उपलब्ध असलेले अभिनव भारत वगैरे संघटनांनी बनवलेले अनेक बॉम्ब बनवायचे पुस्तके यांनी तेलुगु मध्ये भाषांतरित केली (नंतर अनेक कादंबऱ्या त्यांनी मराठी मधून तेलुगु मध्ये भाषांतरित केली). मुक्तीसंग्रमानंतर ते तिथल्या विधिमंडळात निवडून आले. तिथे त्यांनी कुळकायदा राबवायला सुरुवात केली. या मुळे अनेक जमीनदार जातींना त्यांनी दुखावले पण सामान्यांचा दुवा घेतला. वंशाधिकाराने आलेली सर्व जमीन यांनी दान करून स्वतः उदाहरण प्रस्थापित करून दिले.. 

चांगले निर्णय कसे त्रासदायक ठरतात हे त्यांना १९७३ मध्ये समजले कारण इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त करून टाकले (कारण रेड्डी, नायुडू आणि कम्मा जातीचे तेलुगु जमीनदार भडकले होते, आणि राव ब्राह्मण असल्यामुळे यांच्या मागे एक वोट करणारी लॉबी नव्हती). त्यांच्या या कामाचे क्रेडीट दुसरा कुणीतरी खून गेला..

पण यांना हेरून इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. १९७३ च्या या हृदयभगानंतर यांनी एक धडा घेतला. वयाची पन्नाशी आली होती. तो धडा म्हणजे कॉंग्रेस मध्ये टिकायचे असल्यास कधीही आपली अक्कल लावू नये (ती कितीही बरोबर असली तरी गांधी सुलतानांपुढे आणि त्यांच्या हुजऱ्यापुढे शहाणपण चालत नाही).. या घटने नंतर त्यांचे १९९० पर्यंतचे करीयर म्हणजे गांधीघराणे भक्ती चा आदर्श परिपाठ होता. 

आणीबाणी मध्ये त्यांनी इंदिरांना समर्थन दिले. त्या बदल्यात इंदिरा गांधींनी त्यांना महत्वाचे खाते देणे सुरु केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "१२ भाषा उत्कृष्ट पणे लिहिता-बोलता-वाचता येणाऱ्या या  ज्ञानमार्तंड माणसाचे मन कधीच कुणालाच समजले नाही. कुणाही समोर याने आपले मन उघडे केले नाही".. 


इंदिरा गांधींच्या हत्येनंतर यांनी आपली निष्ठा राजीव गांधींच्या चरणी वाहिली. पण रावांचे वय झाले होते. १९९० मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पण त्यांच्या आयुष्यातला राजयोग तर सुरु होणार होता. राजीव गांधींची हत्या झाली आणि सर्वत्र घालमेल उडाली. 

हे नंतर समजले कि नरसिंहरावांनी छद्मनाम धारण करीत राजीव गांधींवर कडाक्याची टीका केली होती (१९८८-८७ मध्ये). इंडियन एक्सप्रेस मधला एक अग्रलेख खूप गाजला होता जो कॉंग्रेसच्या खूप आतल्या माणसाने लिहिला होता पण नाव दिले नव्हते. त्यांच्या मृत्युनंतर हे एक्सप्रेस ने उघड केले कि तो लेखक राव होते. असो, १९९० मध्ये रावांनी उघडपणे कधीही कुठलेही मतप्रदर्शन केले नाही. अर्जुन सिंह, शरद पवार, आणि नारायणदत्त तिवारी या तिघांच्या पंतप्रधान पदासाठी मारामाऱ्या सुरु झाल्या होत्या. कुणीच जिंकेन नि कॉंग्रेस तीन तुकड्यात जाणार अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा compromise candidate म्हणून रावांना तिघांनी मान्यता दिली. असे म्हणतात कि जेव्हा हा निर्णय त्यांना समजला तेव्हा राव आपल्या सामानाची packing करीत होते, कायमचे हैदराबादेत सेटल व्हायला. ते नुकतेच राजकारणातून निवृत्त झाले होते पण त्यांची निवृत्ती कॉंग्रेस कमिटी ने जाहीर केली नव्हती. 

पवार-सिंह-तिवारी त्रिकुटाची कल्पना होती कि निवडणुकी नंतर यांना हाकलून देऊ. पण १९९०-९१ च्या निवडणुकीत तिघांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि राव पंतप्रधान झाले.

अर्थात, याच काळात ग्रामीण गरिबी ३३% वरून ४८% पर्यंत गेली. अन्नधान्याच्या किमती १९९६ मध्ये ६०% ने वाढल्या असे वाचनात आले होते. या नीतीचा बोजा सर्वात खालचा सामाजिक थरावर पडू लागला. सबसिडी कमी केल्यामुळे लहान शेतकरी असणे हळूहळू त्रासदायक होऊ लागले. १९९६ मध्ये कॉंग्रेस निवडणुकीत हरली.

अर्थात हरता हरता रावांनी आडवाणींनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतलाच. त्यांना एका आर्थिक घोटाळ्यात गोवून त्यांची पंतप्रधान बनायच्या आशेवर पाणी फिरवले. वाजपेयी हे भाजपाचे compromise candidate म्हणून पुढे आले. १९९६ मध्ये वाजपेयींनी शपथ घेतली (१३ दिवसांचे सरकार) त्या शपथ विधी नंतर राव वाजपेयींशी हस्तांदोलन करायला आणि अभिनंदन करायला गेले. रावांनी हस्तांदोलन तर केले. पण त्यांच्या हातात एक चिट्ठी होती. ती गुपचूप पणे हस्तांदोलनाच्या निमित्ताने वाजपेयींच्या हातात दिली. त्या चिट्ठीमध्ये लिहिले होते - Bomb is ready, go ahead. रावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट वाजपेयींनी जाहीर केली. 

दीड वर्षांनी भारताने अणुबॉम्ब फोडल्या नंतर सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आल्या. त्याच दरम्यान कॉंग्रेस अध्यक्षपदाचे इतर उमेदवार राजेश पायलट आणि माधवराव शिंदे यांचा "अचानक अपघाती" मृत्यू झाला आणि सीताराम केसरी देखील त्याच ६ महिन्याच्या कालावधीत वारले. रावांनी काळाची पावले ओळखली आणि दिल्ली सोडली. उर्वरित काळ ते हैदराबादेत राहिले आणि २००४ मध्ये त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा फोटो देखील कुठेही नाही, कुणाही कॉंग्रेस वाल्याने त्यांना साधी श्रद्धांजली देखील वाहिली नाही. या थोर नेत्याला जाणीवपूर्वक विजनवासात आणि अज्ञातवासात ढकलण्यात आले.   

१९९० पूर्व नेहरूंच्या भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते - समाजवाद आणि non-allignment movement. या दोन्ही आधारस्तंभांना रावांनी कायमचे जमीनदोस्त केले. या सर्वांचे दोषही आता हळूहळू पुढे येत आहेत. पूर्वी सगळेच गरीब होते. आता मध्यमवर्ग-श्रीमंत-गरीब अशी दरी वाढू लागली आहे. त्यामुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम आता उघड दिसू लागले आहेत. 

भांडवलशाहीला पर्याय नाही. पण भांडवल फक्त शहरी भागात केंद्रित होऊ लागले. त्यामुळे गाव-शहर ही दरी वाढली. लोकांचे शहराकडे मायग्रेशन सुरु झाले, गावे ओस पडू लागली आणि शहरे बकाल. वास्तविक आता गावागावात भांडवल निर्मिती होणे आवश्यक आहे. पण ते होत नाहीये. 

रावांनी एका खूप मोठ्या संकटातून भारताला बाहेर काढले. भारताला जगासमोर खुले केले. जुन्या गांजलेल्या आणि माजलेल्या लायसन्सशाही वाल्या व्यवस्थेचा बिमोड केला, आणि सोवियत रशियोत्तर जगात भारताला नवीन आणि जवळचे मित्र मिळवून दिले. त्यांच्यामुळे आज भारत धनसंपन्न आहे आणि होतोय, अधिकाधिक असमान, शक्तीसंपन्न होतोय, confident होतोय. 

पी.व्ही.नरसिंह रावांना आज कॉंग्रेस मध्ये काहीही स्थान नाही. जग त्यांना विसरले आहे. भारत त्यांना विसरला आहे. अगदी जाणीवपूर्वक. पण, आधी म्हंटल्या प्रमाणे सर्वगुणदोषांसकट ते आजच्या भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत. आजचा भारत रावांचा भारत आहे.