Thursday, 1 June 2017

अल्पायुषी मराठे आणि bacteria - भाग २

गेल्या भागात आपण इन्फेक्शन आणि त्यांच्या मध्ययुगीन आयुष्यावर होणारा परिणाम यावर थोडीशी चर्चा केली. आता याचे पुढील विवरण इथे करायचा प्रयत्न करतोय. थोडा घाईत आहे. त्यामुळे हि पोस्ट थोडी छोटी असेल. पोटाच्या (टायफाईड, आतड्याचा टीबी, गुढघी इत्यादी) विकारांमुळे बाजीराव, माधवराव, नानासाहेब, चिमाजी, शिवछत्रपती इत्यादी दिग्गज वारल्याचे आपण मागच्या भागात बघितले. स्वच्छतेची साधने आणि सामान्यतः त्या काळातले मनुष्यजातीचे या विषयाबाबतचे अज्ञान हे या मागची कारणे आहेत. आता मुख्य प्रश्न असा कि मोगलांचे सरदार इतके कसे काय जगले?

ऐतिहासिक वस्तुस्थिती हि आहे कि हिंदूंचे स्वच्छतेबाबतचे आग्रह आणि विटाळ इत्यादी खूप कडक असतात. गुप्तकाळात आणि त्या नंतरच्या वर्धनकाळात चीनी प्रवासी लोकांनी भारतीय दिवसातून दोन वेळेस आंघोळ करतात व स्वच्छतेबाबतीत खूप आग्रही आहेत हे वारंवार सांगितलेले आहे. हि बाब नंतरच्या युरोपीय प्रवाश्यांच्या रोजनिशीत देखील वरचेवर आढळते. तत्कालीन विश्वात भारतीय लोक आणि त्यातल्यात्यातल हिंदू हे स्वच्छतेचे अत्याग्रही असत हे दिसते. मग पेशवे मंडळींच्या घरात पुरुष मंडळी अशी वरचेवर या आजारांमुळे का मरावीत कि जे आजार विष्ठेमुळे पसरले जाऊ शकतात? दुसरा प्रश्न असा कि त्या घरातल्या स्त्रियांना हे पोटाचे आजार होऊन ते वारले वगैरे माझ्यातरी वाचनात नाही. इथे एकाच फरक आहे कि स्त्रिया मोहिमेवर जात नसत. तस्मात पुरुष मंडळींना हे इन्फेक्शन मोहिमेवर असतांना झाले असावे असे माझे गृहीतक आहे.

हे होण्याचे जे कारण मला सुचते आहे ते मी इथे लिहोतो. मराठी मोहिमा सहसा वेगवान असत. बाजारबुणगे असत पण अगदी bare-minimum. तिथे सफाई करणारा crew (इथे नाईलाजास्तव जातींचा उल्लेख करावा लागत आहे, क्षमस्व) जसे महार-मांग-भंगी कमी असावेत किंवा नसावेत असा माझा कयास आहे. सैनिक म्हणून नव्हे तर सफाई-कामगार म्हणून. सैनिक म्हणून अनेक महार शिपाई आणि सरदार मराठी सैन्यात अगदी १८१८ पर्यंत मुबलक प्रमाणात होते हे आपल्याला प्राथमिक साधनांवरून माहिती आहे. पानिपतच्या मोहिमेत हि मंडळी इतकी तरली कारण भरपूर बाजारबुणगे नेले होते (त्यात हे सफाईदल देखील आले). म्हणून तर एक-दिड महिन्यानंतर रोगराई वगैरे पसरू लागली (अन्यथा आधीच पसरली असती जे बरे झाले असते कारण मन आधीच युद्ध झाले असते आणि कदाचित आधी युद्ध झाले असते तर विजय मिळाला असता, असो.)

बाजीरावाच्या मोहिमेत, नानासाहेबांच्या आधीच्या मोहिमेत, चिमाजीअप्पांच्या मोहिमेत आणि माधवरावाच्या राक्षसभुवन मोहिमेत असा मोठा बाजारबुणग्यांचा crew होता असे वाचनात तरी नाही. या उलट मोगलांच्या मोहिमा फारच मोठ्या आणि elaborate असत (म्हणून हळूहळू चालत - त्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे). सोबत जनानखाना, मुद्पाकखाना, आणि इतर सर्व लवाजमा चाले. यात उपर्लिखित सर्व गोष्टी आल्यात.

आधीच्या मुसलमानांच्या मोहिमांच्या काळात (खिलजी, तुघलक़, लोधी वगैरे मंडळी) त्यांचे बरेच सुलतान रोगराईमुळे भरपूर मेली आहेत. बरेच लोक गुप्तरोगांमुळे मेली (अनिर्बंध बलात्कार आणि स्त्रियांचा, पुरुषांचा, लहान मुलांचा वासनांध उपभोग) हे आपल्याला दिसतेच. त्या काळात देखील मोहिमांच्या शीघ्रतेमुळे सफाईदल सोबतीला नसावे (अल्लाउद्दिन खिलजी ८००० स्वारांनिशी देवगिरीवर चालून आला हा इतिहास आहे). सपोर्ट-crew कुठल्याही मोहिमेमध्ये खूप आवश्यक गोष्ट आहे.

काहीकाही मोहिमांचे स्वरूप असे असते कि तिथे असल्या लवाजम्याला जागा नसते. उदाहरणार्थ फक्त घोडदल असेल तर - जी बाजीराव आणि इतर मराठे बहुतांश असायचे). पण जर तोफखाना, पायदळ वगैरे सोबत असेल तर असा सपोर्ट-crew न्यावाच लागतो (तोफा ओढणारी असंख्य जनावरे असतात त्यांची साफसफाई अत्यावश्यक असते). माझ्या मते अश्या मोहिमांमध्ये सफाईदल प्रकर्षाने न्यावेच लागते.

 जाता जाता - पानिपतात महादजी शिंद्यांचा जीव अश्याच एका भिस्ती माणसाने वाचवला होता. भिस्ती लोक याच सफाईदलाचे लोक असतात.

Wednesday, 31 May 2017

अल्पायुषी मराठे आणि bacteria

भाग १ - अल्पायुषी मराठे सत्ताधीश - या विषयावर मी बोलणार होतो. इतक्यातच चालू असलेला एक धागा बघून टिप्पणी करावीशी वाटली.
आपल्याला अलेक्झांडर फ्लेमिंग ने उपकृत करून ठेवले आहे. पेनिसिलीन च्या शोधामुळे माणसाच्या जीवनमानात खूप मोठा बदल पडला आहे, इतका कि आपण खूप गोष्टी गृहीत धरतो.
पेशव्यांच्या घराण्यात असलेला टीबी - खरोखरच तो टीबी होता का? माधवरावांचे बद्दल माहिती भरपूर आहे, त्या माहितीवरून समजते कि बहुतेक आतड्यांचा टीबी झाला होता. तीच गोष्ट टायफॉईड ची आहे. संडास झाल्यानंतर साबणाने हात घासावे, हि गोष्ट आपण आज खूप बेसिक समजतो. पण खूप नवीन आणि महत्वाची गोष्ट आहे हि. अगदी आता-आता पर्यंत लोक संडासनंतर हात राखेने किंवा मातीने घासायचे. मी युरोप मध्ये असताना "हात धुवा प्रकल्प" डेन्मार्क च्या सरकारने सुरु केला होता - सर्वत्र "हात धुतले का?" असे विचारणारे फलक झळकले होते. त्या वर्षी फ्लू ची लागण कमी लोकांना झाली असा रिपोर्ट नंतर छापला होता. शक्यतो इतरांचा स्पर्श टाळला तर बरेच संसर्गजन्य रोग टळतात हे माझे निरीक्षण आहे.
बाजीराव-चिमाजी-नानासाहेब-माधवराव वगैरे मंडळी पोटाच्या विकाराने का वारली, यावर त्यांच्या घरी स्वयंपाक करणारे लोक किती स्वच्छता पाळीत असत आणि सर्वात मुख्य म्हणजे स्वयंपाकी लोकांच्यात कुणी (carrier) या जंतूंचा वाहक होता का? हे तपासले पाहिजे. Abhiram Dixit यांनी सांगितल्या प्रमाणे नीट न उकळलेले दुध हे एक मोठे कारण असू शकते. धारोष्ण दुध पिणे वगैरे ठीक पण गायींची निगा नीट राखली जात होती का - वगैरे प्रश्नांची उत्तरे आता मिळणे मुश्कील आहे.
थोरले महाराज गूढघी (bloody flux) म्हणजे रक्ताचे जुलाब या विकाराने वारले असे वाचनात आले आहे. विषमज्वर म्हणजे काय ते माहिती नाही, पण अमिबिक जुलाब किंवा कॉलरा हे फार भयानक विकार आहे. कॉलरा एका धडधाकड माणसाला १२ तासात लंबा करू शकतो.
पेशव्यांचे असो किंवा थोरले महाराज असोत - त्यांना हे विकार घरातल्याच मंडळींकडून किंवा घरी काम करणाऱ्या स्टाफ करून झाले असावेत हा माझा दाट संशय आहे.
उत्सुक लोकांनी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रसिद्ध असलेल्या "टायफॉईड मेरी" या केस बद्दल वाचावे - मेरी नावाची एक स्वयंपाकिण होती - ती जिथे जिथे नोकरी करे तिथे तिथे लोक टायफॉईड होऊन मरत असत. लोकांना वाटले कि मेरी जादूटोणा करते. नंतर लक्षात आले कि मेरी हि टायफाईड च्या bacteria ची वाहक होती - हा bacteria तिच्या मोठ्या आतड्यात घर करून राहत असे आणि विष्ठेवाटे रोज निघत असे. संडास झाल्यावर तिथली जागा पाण्याने धुणे ठीक, पण नखात इत्यादी मळाचा एखादा कण देखील पुरसा असतो पिण्याच्या पाण्यात किंवा न उकळलेल्या अन्नात पडून इन्फेक्शन पसरवायला.
टायफॉईड मेरी सारखी किंवा सारखा कुणी मनुष्य पेशवे स्वयंपाकघरात नक्कीच कार्यरत असावा. :-)
फ्लेमिंग महाराज कि जय
लुई पाश्चर कि जय..

Sunday, 21 May 2017

पी.व्ही.नरसिंहराव - आधुनिक भारताचा राष्ट्रपिता

आधुनिक काळातला सर्वोत्कृष्ट भारतीय नेता म्हणजे पी.व्ही.नरसिंह राव....  हा माणूस इतका उपेक्षित आहे कि विचारू नका. पण हा नसता तर भारत आता पर्यंत तुटला असता.. 

१. नरसिंह राव
२. अटलबिहारी वाजपेयी
३. इंदिरा गांधी (आणीबाणी मुळे नंबर खाली, अन्यथा दोन नंबर वर असत्या)

कुणाचा भाग्योदय कधी आणि कसा होईल सांगणे कठीण असते. ज्योतिषात एक विपरीत राजयोग म्हणून प्रकार ऐकून आहे. याचा ज्योतिषीय अर्थ आणि संदर्भ नक्की काय ते माहिती नाही, पण ज्यांचा विपदा कोसळल्यावर विपरीत परिस्थितीत दुसऱ्याच्या नुकसानामुळे काही लोकांचा भाग्योदय ज्या योगामुळे होतो  त्याला विपरीत राजयोग असे म्हणतात. नरसिंहराव हे खरे विपरीत राजयोगी. हे खरे आहे कि ते मंत्री म्हणून चमकले नाही. जागतिक  ब्यांकेचा रेटा होता हे खरंय, पण ज्या तऱ्हेने हे त्यांनी काम केले ते अप्रतिम होते.

पण पंतप्रधान झाल्यानंतर ते ३-४ वर्षात एक खूप मोठे आणि प्रचंड चक्र फिरवून गेले जे आजतागायत फिरतंय. भारताला पहिल्यांदा एक जेनुईन बुद्धीजीवी आणि संपूर्णपणे तटस्थ माणूस पंतप्रधान म्हणून भेटला. अर्थव्यवहार, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण क्षेत्रातले लोक यांना खूप दुवा देतात. सोवियत युनियनच्या पतनानंतर कुठल्याही युनो मध्ये सांभाळून घेणाऱ्या मायबापाशिवाय  या नवीन जगात चालायला सुरुवात यांनी करून दिली. काश्मीर मध्ये प्रॉब्लेम सुरु झाला होतं, पंजाब धुमसत होता, सोने गहाण टाकावे लागले होते, पूर्वेत नक्षली लोकांनी उच्छाद मांडला होता, श्रीलंकेत आणि तामिळनाडू मध्ये लिट्टे मंडळींनी नुकतेच राजीवगांधींना मारले होते आणि ३००० भारतीय जवान हुतात्मे झाले होते. समस्त शेजार शत्रू होता, आणि एकमेव मित्र लयाला गेला होता. भारतात हिंदू-मुस्लीम समस्या टोकाला जाऊ लागल्या होत्या, पाकिस्तानने अणुबॉम्ब कार्यान्वित केला होता (१९८९). 

हे सगळे आधीच्या पंतप्रधानांच्या पुण्याई मुळे घडले. यात जनता पार्टी चे मोरारजी देसाई देखील आले, आय.बी आणि रॉ वाले या गृहस्थाला खूप शिव्या घालतात. याने झिया-उल-हक यांच्याशी गप्पा मारतामारता सांगितले कि भारताला पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल माहिती आहे. एका खूप मोठ्या राष्ट्रीय सिक्रेट ची लिक या पंतप्रधानामुळे झाली होती, त्यामुळे ८० च्या दशकात (१९८६-८८) पर्यंत पाकिस्तानने चोऱ्यामाऱ्या करून आणि चीनशी मैत्री करून अणुबॉम्ब बनवला. विचार करा कि पाकिस्तान कडे अणुबॉम्ब आहे, आणि भारताकडे नाही, अश्या परिस्थितीत आतून आणि बाहेरून सर्वत्र भारत मार खात असताना ५ वर्षे राज्य करणे, आणि बाजी पालटणे हे खूप मोठ्या माणसाचे काम आहे.

अश्या परिस्थितीत कुणीच भारतात राज्य केले नाही. नेहरूंवर इंग्रजांचा आणि रशियाचा वरदहस्त होता. इंदिरांवर देखीलसोवियत रशियाचा पूर्ण वरदहस्त होता. नरसिंहराव आणि कारगील पर्यंतचे वाजपेयी, हे दोनच "स्वतंत्र" पंतप्रधान होते. क्लिंटन यांच्या भेटीनंतर, वाजपेयी देखील ढेपाळले. 

नरसिंह राव मुळे खालील गोष्टी झाल्या
१. अर्थव्यवस्था खुली झाली आणि त्या नादात देश विकल्या गेला नाही
२. अणु कार्यक्रम सुरु झाला. अणुबॉम्ब चे संपूर्ण श्रेय नरसिंह रावांना आहे. खुद्द वाजपेयींनी हे त्यांच्या मरणोत्तर कबुल केले आहे.
३. इस्राईल, विएतनाम सोबत मैत्री संबंध प्रस्थापित
४. काश्मीर संबंधी प्रस्ताव लोकसभेत व राज्यसभेत पारित करून घेतला. आता काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे व ते देऊन टाकायला लोकसभेत मंजुरी घ्यावी लागेल.
५. संरक्षण क्षेत्रात हळूहळू भारत स्वयंपूर्ण होऊ लागला (अग्नी, तेजस, आकाश, अर्जुन आणि इतर काही प्रकल्प यांनी सुरु केले)
६. कम्युनिस्ट लोकांना पूर्वेत रोखले.
७. रामजन्मभूमी आंदोलनात त्रयस्थ राहिले.
८. लायसन्स राज संपवला
९. शरद पवार व इतर प्रभृती यांना रोखले.
१०. काश्मीर मध्ये आर्मी घातली. सियाचीन वर सदैव सेना ठेवायचा निर्णय यांचा. चीनशी परत व्यापारी संबंध प्रस्थापित केले. आज तो व्यापार ६० अब्ज डॉलर इतका आहे. 

थोडक्यात जे जे काही नेहरूंनी करून भारताला ३% ग्रोथ रेट वर सीमित ठेवत होते, ते सर्व काढून आजचा ७-८% णे वाढणारा भारत बनवला. आजचा भारत (सर्व गुणदोषांसकट) नरसिंहरावांचा भारत आहे, नेहरू-महात्मा गांधी वगैरेंचा नाही. 

१९२१ साली तेलंगणा मध्ये रावांचा जन्म झाला. हे नक्की कुणाचे पुत्र हे माहिती नाही पण तेलंगणा मधल्या एका सधन ब्राह्मण कुटुंबाने या अज्ञात मुलाला दत्तक घेतले. हे आधीपासूनच सशस्त्र क्रांतीवाले होते. हैदराबादमुक्ती संग्रामात बॉम्ब वगैरे स्मगल करून ठिकठिकाणी स्फोट घडवायचे कार्यात यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. मराठीत उपलब्ध असलेले अभिनव भारत वगैरे संघटनांनी बनवलेले अनेक बॉम्ब बनवायचे पुस्तके यांनी तेलुगु मध्ये भाषांतरित केली (नंतर अनेक कादंबऱ्या त्यांनी मराठी मधून तेलुगु मध्ये भाषांतरित केली). मुक्तीसंग्रमानंतर ते तिथल्या विधिमंडळात निवडून आले. तिथे त्यांनी कुळकायदा राबवायला सुरुवात केली. या मुळे अनेक जमीनदार जातींना त्यांनी दुखावले पण सामान्यांचा दुवा घेतला. वंशाधिकाराने आलेली सर्व जमीन यांनी दान करून स्वतः उदाहरण प्रस्थापित करून दिले.. 

चांगले निर्णय कसे त्रासदायक ठरतात हे त्यांना १९७३ मध्ये समजले कारण इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त करून टाकले (कारण रेड्डी, नायुडू आणि कम्मा जातीचे तेलुगु जमीनदार भडकले होते, आणि राव ब्राह्मण असल्यामुळे यांच्या मागे एक वोट करणारी लॉबी नव्हती). त्यांच्या या कामाचे क्रेडीट दुसरा कुणीतरी खून गेला..

पण यांना हेरून इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. १९७३ च्या या हृदयभगानंतर यांनी एक धडा घेतला. वयाची पन्नाशी आली होती. तो धडा म्हणजे कॉंग्रेस मध्ये टिकायचे असल्यास कधीही आपली अक्कल लावू नये (ती कितीही बरोबर असली तरी गांधी सुलतानांपुढे आणि त्यांच्या हुजऱ्यापुढे शहाणपण चालत नाही).. या घटने नंतर त्यांचे १९९० पर्यंतचे करीयर म्हणजे गांधीघराणे भक्ती चा आदर्श परिपाठ होता. 

आणीबाणी मध्ये त्यांनी इंदिरांना समर्थन दिले. त्या बदल्यात इंदिरा गांधींनी त्यांना महत्वाचे खाते देणे सुरु केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "१२ भाषा उत्कृष्ट पणे लिहिता-बोलता-वाचता येणाऱ्या या  ज्ञानमार्तंड माणसाचे मन कधीच कुणालाच समजले नाही. कुणाही समोर याने आपले मन उघडे केले नाही".. 


इंदिरा गांधींच्या हत्येनंतर यांनी आपली निष्ठा राजीव गांधींच्या चरणी वाहिली. पण रावांचे वय झाले होते. १९९० मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पण त्यांच्या आयुष्यातला राजयोग तर सुरु होणार होता. राजीव गांधींची हत्या झाली आणि सर्वत्र घालमेल उडाली. 

हे नंतर समजले कि नरसिंहरावांनी छद्मनाम धारण करीत राजीव गांधींवर कडाक्याची टीका केली होती (१९८८-८७ मध्ये). इंडियन एक्सप्रेस मधला एक अग्रलेख खूप गाजला होता जो कॉंग्रेसच्या खूप आतल्या माणसाने लिहिला होता पण नाव दिले नव्हते. त्यांच्या मृत्युनंतर हे एक्सप्रेस ने उघड केले कि तो लेखक राव होते. असो, १९९० मध्ये रावांनी उघडपणे कधीही कुठलेही मतप्रदर्शन केले नाही. अर्जुन सिंह, शरद पवार, आणि नारायणदत्त तिवारी या तिघांच्या पंतप्रधान पदासाठी मारामाऱ्या सुरु झाल्या होत्या. कुणीच जिंकेन नि कॉंग्रेस तीन तुकड्यात जाणार अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा compromise candidate म्हणून रावांना तिघांनी मान्यता दिली. असे म्हणतात कि जेव्हा हा निर्णय त्यांना समजला तेव्हा राव आपल्या सामानाची packing करीत होते, कायमचे हैदराबादेत सेटल व्हायला. ते नुकतेच राजकारणातून निवृत्त झाले होते पण त्यांची निवृत्ती कॉंग्रेस कमिटी ने जाहीर केली नव्हती. 

पवार-सिंह-तिवारी त्रिकुटाची कल्पना होती कि निवडणुकी नंतर यांना हाकलून देऊ. पण १९९०-९१ च्या निवडणुकीत तिघांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि राव पंतप्रधान झाले.

अर्थात, याच काळात ग्रामीण गरिबी ३३% वरून ४८% पर्यंत गेली. अन्नधान्याच्या किमती १९९६ मध्ये ६०% ने वाढल्या असे वाचनात आले होते. या नीतीचा बोजा सर्वात खालचा सामाजिक थरावर पडू लागला. सबसिडी कमी केल्यामुळे लहान शेतकरी असणे हळूहळू त्रासदायक होऊ लागले. १९९६ मध्ये कॉंग्रेस निवडणुकीत हरली.

अर्थात हरता हरता रावांनी आडवाणींनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतलाच. त्यांना एका आर्थिक घोटाळ्यात गोवून त्यांची पंतप्रधान बनायच्या आशेवर पाणी फिरवले. वाजपेयी हे भाजपाचे compromise candidate म्हणून पुढे आले. १९९६ मध्ये वाजपेयींनी शपथ घेतली (१३ दिवसांचे सरकार) त्या शपथ विधी नंतर राव वाजपेयींशी हस्तांदोलन करायला आणि अभिनंदन करायला गेले. रावांनी हस्तांदोलन तर केले. पण त्यांच्या हातात एक चिट्ठी होती. ती गुपचूप पणे हस्तांदोलनाच्या निमित्ताने वाजपेयींच्या हातात दिली. त्या चिट्ठीमध्ये लिहिले होते - Bomb is ready, go ahead. रावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट वाजपेयींनी जाहीर केली. 

दीड वर्षांनी भारताने अणुबॉम्ब फोडल्या नंतर सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आल्या. त्याच दरम्यान कॉंग्रेस अध्यक्षपदाचे इतर उमेदवार राजेश पायलट आणि माधवराव शिंदे यांचा "अचानक अपघाती" मृत्यू झाला आणि सीताराम केसरी देखील त्याच ६ महिन्याच्या कालावधीत वारले. रावांनी काळाची पावले ओळखली आणि दिल्ली सोडली. उर्वरित काळ ते हैदराबादेत राहिले आणि २००४ मध्ये त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा फोटो देखील कुठेही नाही, कुणाही कॉंग्रेस वाल्याने त्यांना साधी श्रद्धांजली देखील वाहिली नाही. या थोर नेत्याला जाणीवपूर्वक विजनवासात आणि अज्ञातवासात ढकलण्यात आले.   

१९९० पूर्व नेहरूंच्या भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते - समाजवाद आणि non-allignment movement. या दोन्ही आधारस्तंभांना रावांनी कायमचे जमीनदोस्त केले. या सर्वांचे दोषही आता हळूहळू पुढे येत आहेत. पूर्वी सगळेच गरीब होते. आता मध्यमवर्ग-श्रीमंत-गरीब अशी दरी वाढू लागली आहे. त्यामुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम आता उघड दिसू लागले आहेत. 

भांडवलशाहीला पर्याय नाही. पण भांडवल फक्त शहरी भागात केंद्रित होऊ लागले. त्यामुळे गाव-शहर ही दरी वाढली. लोकांचे शहराकडे मायग्रेशन सुरु झाले, गावे ओस पडू लागली आणि शहरे बकाल. वास्तविक आता गावागावात भांडवल निर्मिती होणे आवश्यक आहे. पण ते होत नाहीये. 

रावांनी एका खूप मोठ्या संकटातून भारताला बाहेर काढले. भारताला जगासमोर खुले केले. जुन्या गांजलेल्या आणि माजलेल्या लायसन्सशाही वाल्या व्यवस्थेचा बिमोड केला, आणि सोवियत रशियोत्तर जगात भारताला नवीन आणि जवळचे मित्र मिळवून दिले. त्यांच्यामुळे आज भारत धनसंपन्न आहे आणि होतोय, अधिकाधिक असमान, शक्तीसंपन्न होतोय, confident होतोय. 

पी.व्ही.नरसिंह रावांना आज कॉंग्रेस मध्ये काहीही स्थान नाही. जग त्यांना विसरले आहे. भारत त्यांना विसरला आहे. अगदी जाणीवपूर्वक. पण, आधी म्हंटल्या प्रमाणे सर्वगुणदोषांसकट ते आजच्या भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत. आजचा भारत रावांचा भारत आहे. 


भारताची थ्री-स्टेज थोरियम अणुसाखळी.

१. थोरियम-२३२ हे विघटनशील मूलद्रव्य नाही. पण त्याची मात्रा युरेनियम हून अधिक आहे. त्यामुळे आर्थिक गणित सोपे होते.

२. युरेनियम हे मूलद्रव्य दोन अणुभारात सापडते - २३८ (हे ९९.३% आहे आणि विघटनशील नाही) आणि युरेनियम-२३५(हे एकूण युरेनियमच्या ०.७% आहे आणि विघटनशील आहे. सर्व जुनी तंत्रे आणि पहिले अणुबॉम्ब याच युरेनियम-२३५ पासून बनवलेले आहेत.

३. इथे प्रॉब्लेम हा आहे कि एक तर युरेनियम-२३५ फक्त ०.७% आहे. युरेनियम-२३५ ला युरेनियम-२३८ पासून वेगळे करणे म्हणजे डोक्याला शॉट देणारी प्रक्रिया आहे (खूप मोठे आणि खूप काळ चालणारे centrifuges बांधावे लागतात- त्यामुळे खर्च वाढतो). दुसरा प्रॉब्लेम असा कि युरेनियम विघटनामुळे तयार होणारी मूलद्रव्ये देखील किरणोत्सारी असतात - त्यामुळे विघटीत युरेनियम चे करायचे काय - हा खूप मोठा प्रश्न आहे ज्याचे उत्तर कुणाचकडे नाही. लोक त्या किरणोत्सारी कचऱ्याला लिटरली खड्डा करून पुरून ठेवतात. हजारो वर्षांनी तो कचरा सुरक्षित होईल. तोवर त्याला पुरून ठेवायचा.

४. या प्रॉब्लेमला वळसा म्हणून काही लोक युरेनियम-२३५ ऐवजी यु-२३८ ला प्लुटोनियम-२४० मध्ये रुपांतर करून प्लू-२४० ला विघतक म्हणून वापरू लागली. प्लू-२४० अतिशय उत्कृष्ट विघटक आहे - इतके चांगले कि त्याच्या पासून बॉम्ब बनवणे खूप सोपे आहे..

५. थोरियम चा हा फायदा कि ते यु-२३८ पेक्षा खूप अधिक मात्रेत उपलब्ध आहे. त्याचे byproducts म्हणजे नॉर्मल शिसे (lead) असते जे घातक नसते. त्याच्या पासून बॉम्ब बनवता येत नाही. त्यामुळे फक्त चांगल्या कारणासाठी थोरियम चा उपयोग होऊ शकतो आणि स्वस्तात देखील.

६. प्रॉब्लेम असा आहे कि थो-२३२ विघटनशील नाही. म्हणून भारताने थ्री-स्टेज प्रक्रिया डिझाईन केलेली आहे. इथे पहिल्या स्टेज मध्ये नैसर्गिक युरेनियम चे प्लू-२३९ मध्ये रुपांतर होते. पहिली स्टेज ची प्रक्रिया जवळपास सर्व जुन्या अणुभट्ट्या करतात - जसे तारापूर, कल्पक्कम इत्यादी - जिथे जिथे PHWR (pressurized heavy water reactor) हि संयंत्रे बसवलेली आहेत ती सगळी ऊर्जानिर्मिती बरोबरच युरेनियम-२३८ चे प्लू-२३९ मध्ये रुपांतर करत असतात. दुसऱ्या स्टेज मध्ये हे प्लू-२३९ वापरून थोरियम-२३२ चे युरेनियम-२३३ मध्ये रुपांतर करण्यात येते. हि प्रक्रिया करणारे अणुसंयंत्र कल्पक्कम येथे कार्यरत आहे. या संयंत्राचे नाव PFBR (prototype fast-breeder reactor) असे आहे. तिसऱ्या स्टेज मध्ये थोरियम-२३२ आणि युरेनियम-२३३ हे मिश्रण वापरून उर्जा बनते. यु-२३३ विघटीत होऊन अजून थो-२३२ ला यु-२३३ बनवते आणि साखळी स्वयंचालित होते. यातील पहिले दोन स्टेज चे तंत्रज्ञान भारताने विकसित केलेले आहे. तिसऱ्या स्टेजचे डिझाईन प्रक्रिया सुरु आहे. या संयंत्राचे नाव AHWR (advanced heavy water reactor) असे असून याचे डिझाईन मुंबई च्या Trombay येथील भाभा-अणुसंशोधन केंद्र (BARC) येथे सुरु आहे.

७. भारत सोडून अन्य कुणीही हि थोरियम-थ्री स्टेज सायकल विकसित करत नाहीये.

८. यासाठी पहिल्या स्टेप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात युरेनियम लागते. भारतात युरेनियम फार कमी आहे. जितके आहे, तितक्यातून आपल्याला भरपूर बॉम्ब बनवायचे आहेत, अणुपाणबुड्या, अणु-विमानवाहक नौका इत्यादी(रक्षाक्षेत्रात) बनवायचे आहे. त्यामुळे पहिल्या स्टेज मध्ये जाणारे युरेनियम प्लू-२३९ बनल्यावर दोन प्रवाहात विभाजित होते आणि पुढील स्टेप्स (रक्षा आणि उर्जा - दोन्ही कडच्या) खोळंबतात. म्हणून बाहेरून युरेनियम विकत आणणे गरजेचे आहे. बाहेरून विकत घेतलेले  युरेनियम हे आपण फक्त उर्जा निर्मिती साठीच वापरू, रक्षा-उपयोगासाठी नाही- हा करार आपण केलेला आहे. यामुळे आपले भारतातले युरेनियम शस्त्रउत्पादनासाठी मोकळे होते.

९. तिसरी स्टेज पूर्ण विकसित झाली कि मग आपली युरेनियम साठीचे अवलंबित्व कमी होईल. हे होण्यास अजून २० वर्षे तरी आहेत. तोवर भारताला खूप मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. जिथून मिळेल तिथून, जितक्यात मिळेल तितक्यात, जितकी मिळेल तितकी वीज हवी आहे.

तस्मात जैतापूर (आणि तत्सम प्रकल्प) अत्यावश्यक.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर - काही मते.

श्री संजय क्षीरसागर यांच्या या quote केलेल्या फेसबुक धाग्याला उत्तर देताना या पोस्ट ची निर्मिती झाली आहे. क्षीरसागरांचे मूळ पोस्ट इथे quote करीत आहे आणि खाली माझे उत्तर आहे. 
स. १८५७ च्या बंडाविषयीचे काही प्रश्न :-

(१) बंडखोरांनी दिल्लीच्या मोगल बादशाहीचे पुनरुज्जीवन का केले
(२) बंड झालेल्या ठिकाणचे सैनिक दिल्लीलाच का गोळा होत होते ?
(३) स. १८५७ चा उठाव पूर्वनियोजित मानला गेला तर संभाव्य लष्करी हालचाली लक्षात घेऊन रसद पुरवठा, दारुगोळा निर्मिती याविषयी काही उपाययोजना करण्यात आली होती कि नाही ?
(४) बंडखोर शिपाई इंग्रजांच्या तालमीत कवायती युद्धपद्धती शिकले होते व त्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांचा पराभव केला होता मग असे हे बहाद्दूर मुठभर इंग्रजांच्या समोर पराभूत कसे झाले ? तोफा - बंदुका दोन्हीकडे होत्या व त्यांचा वापर करण्याचे ज्ञानही उभयतांना होते मग बंडखोरांचे नेमके कुठे चुकले ?
(५) स. १८५७ चा लढा पूर्वनियोजित होता तर उठाव झाल्यावर सैनिकांच्या हालचाली विस्कळीत का झाल्या ? कित्येक ठिकाणी संस्थानिकांवर नेतृत्व लादण्यात आले तर कित्येक इंग्रजधार्जिणे राहिले. असे का ?
(६) उठावाचा टापू सीमित राहण्याची मुख्य कारणे कोणती ? उठावाच्या काही वर्षे अलीकडेच इंग्रजांनी शिखांचे स्वतंत्र राज्य धुळीस मिळवले होते तर ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या काही लष्करी तुकड्यांचा पराभव केला होता. तरीही शीख, शिंदे हे इंग्रजांच्या पक्षाला का चिटकून राहिले ?

इच्छुकांनी Parag Tope चा ग्रंथ आवर्जून वाचावा.. Operation Red Lotus: The Untold Story of the War of 1857 हे त्या ग्रंथाने फेबु पेज आहे. अप्रतिम संशोधन आहे. किंबहुना हि दिलेली लिंक तर वाचकांनी आवर्जून वाचावी. अप्रतिम संकेतस्थळ आहे. 

१. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे थोडक्यात मराठा मॉडेल पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न होता. ते मराठा मॉडेल जे महादजी शिंदेंनी १७८८ मध्ये अस्तित्वात आणले. तसे पाहिले तर मोगल बादशाही मराठ्यांवर १७३७ पासून कमीअधिक फरकाने विसंबून होती. पण १७८८ मध्ये ते ऑफिशियल झाले आणि मोगल बादशाह ला पेन्शन ठरली. थोडक्यात १८५७ चे इंग्रज-भारतीय युद्ध १८०२ पूर्व राजकीय समीकरण पुन्हा प्रचलित करायचा भारतीयांचा प्रयत्न होता. 

२. मुद्दा क्रमांक १ मध्ये दिलेली भूमिका लक्षात घेतली कि इतर प्रश्नांचे उत्तर मिळत जाते. अगदी पेशावर पासून बंगाल पर्यंत सैनिकांच्या coordinated हालचाली होत होत्या. 

३. १८५७ ला एक वैश्विक कारण देखील आहे. ते म्हणजे कापूस-व्यापारअफू-व्यापार आणि या दोन व्यापारांचे आपसातले समीकरण. याच सुमारास चीन मध्ये अफूचे दुसरे युद्ध सुरु होते आणि अमेरिकेत गृहयुद्ध होण्याच्या सीमेवर होते. अमेरिकन कापूस आणि दक्षिण अमेरिकन चांदी यांचा जागतिक अर्थव्यवस्थेत शिरकाव झाला होता आणि या दोन्ही गोष्टींवर भारताची असलेली "मोनोपोली" मोडीत निघाली होती. 

४. अमेरिकेतली दक्षिण-राज्ये (ज्यांना गृहयुद्धात confederation म्हणतात) तिथे कृष्ण-वर्णीयलोकांची गुलामी प्रचलित होती आणि गुलामांच्या करवी खूप स्वस्त कापूस जगात पंप होत असे. या व्यापाराला इंग्रजांचा वरदहस्त होता. 

५. या उलट चीन मध्ये सुरु असलेल्या अफू च्या युद्धात इंग्रजांचे खूप मोठे सैन्य अडकले होते. 

६. भारतात चपात्या आणि रक्त-कमळ यांची अदलाबदल तेव्हा सुरु झाली होती (१८५६ च्या आसपास). बैजाबाई शिंदे यांनी मथुरेत यज्ञ आयोजिला (माझा प्रवास लिहिणारे गोडसे भटजी याच यज्ञास मथुरेला जात होते - मराठीत ली पहिली प्रवासवर्णनात्मक डायरी असे या ग्रंथाला म्हणता येईल). शिंद्यांच्या मर्जीतल्या सावकारांनी या युद्धाला बऱ्यापैकी फंडिंग देखील केले होते. 

७. अफूचे दुसरे युद्ध चीन मध्ये जोर घेत होते. या सर्व परिस्थितीचा आढावा बहुदा भारतीयांनी घेतला असावा असा अंदाज आहे. अझिमुल्ला खानाला नानासाहेबांनी इंग्लंड ला धाडले तेव्हा तिथे अमेरिका आणि चीन मधल्या इंग्रज फौजांची स्थिती त्याच्या लक्षात येत होती. इस्तंबूल येथे असताना त्याने क्रायमिया (Crimea - सध्या रशिया-युक्रेन वादात गाजत असलेले) तिथे जाऊन इंग्रज फौजांची वाईट हालत देखील बघितली होती. 

८. इंग्रजांनी क्रायमिया मधून वगैरे माघार घेतली होती (जिंकल्यानंतर) आणि तिथे त्यांचे सैन्य थोडे मोकळे झाले. दरम्यान अमेरिकेतले दक्षिणी राज्य जिथे कापूस उगवतो - तिथला कापूस इंग्लंड-फ्रांस-जर्मनी-रशिया या चार देशातल्या एकूण कापूस गरजेचा ७०-८०% हिस्सा भागवत होता (१८३५ च्या अगोदर हा रोल भारताचा होता). १८३५ पासून हळूहळू अमेरिकेचा कापूस इंग्रज घेऊ लागले आणि त्यांना भारतीय कापसाची गरज भासेनाशी झाली. त्यांनी तेव्हा भारतीयांना नीळ आणि अफू पेरायला लावणे भाग पाडले आणि भारतातला अफू चीन ला विकत घ्यायला लावणे भाग पाडले (पहिले अफूचे युद्ध १८४२ च्या सुमारास झाले). 

९. वरील सगळी परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कारण हि परिस्थिती अझिमुल्ला खान आणि पर्यायाने पेशवे यांच्या ध्यानात आलेली होती. 

१०. अफूचा व्यापार हा इंग्रजांचा सर्वात फायदेशीर व्यापारापैकी होता आणि तो वाचवणे कंपनी ला अत्यावश्यक होते. इंग्लंड मधले उच्चभ्रू लोक अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांचे साठी होते (स्वस्तात कापूस मिळतो आणि भारताची सुपीक जमीन अफू उगवायला रिकामी मिळते), म्हणून त्यांनी गुलामगिरी कडे पूर्णतया दुर्लक्ष केले. क्रायमिया मध्ये रिकामे झालेले सैन्य चीन ला पाठवायला सुरुवात केली. (दीड-दोन लक्ष सेना होती हि). या कापसाच्या राजकारणाला कॉटन डिप्लोमसी म्हणतात. 

११. याच सुमारास भारताने स्वातंत्र्ययुद्धास सुरुवात केली. अपेक्षा हि होती कि कारण इंग्लंड ने मोठी सेना चीन मध्ये commit केलेली आहे आणि जहाजांचा ताफा सिंगापूर पर्यंत पोहोचला आहे, इंग्लंड प्रथम चीन कडे लक्ष देईल आणि इथे भारतीयांना मोकळा वेळ मिळेल. 

१२. सुरुवातीची सगळी लढाई भारतीयांनी व्यवस्थित जिंकली. दोन गोष्टी मात्र चुकल्या. एक म्हणजे इंग्रजांनी ब्रह्मदेशातली सेना भारताकडे आणली आणि चीन कडे जाणारी बहुतांश सेना जी सिंगापूर च्या पुढे गेली होती तिला परत भारतात आणले. क्रायमिया आणि इतरत्र युद्धाचा मजबूत अनुभव असलेली हि सेना भारतात पावसाळ्यानंतर उतरू लागली (कलकत्त्यात). दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांनी कलकत्ता ते कानपूर हा पूर्ण पट्टा गंगेच्या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूस दहा किलोमीटर पूर्णतया निर्मनुष्य केला. 

१३. चपाती आणि रक्तकमळ यांचे हे गणित होते कि गावकरी सैनिकांना रसद पुरवीत. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात इंग्रज करतील (इंग्रजी रेकॉर्ड सांगतात. विचार करा किती कोटी लोकांना मारले असेल आणि किती गावे उध्वस्त केली असतील). 

१४. जसजसा हा पट्टा निर्मनुष्य बनत केला तसतसे इंग्रजी सेना निर्धोकपणे बोटीने गंगेच्या मार्गाने आतपर्यंत येऊ लागली (जसे कानपूर). 

१५. शिखांचा प्रश्न वेगळा आहे. शिखांच्या काही निवडक तुकड्या युद्धात सामील होत्या. पण बहुतांश शीख पुरभैय्या लोकांवर डूख धरून होते (पुरभैय्या सैनिकांच्या मदतीने शिखांचा प्रभाव कंपनीने केला होता म्हणून). शिंदे दोन्ही बाजूने खेळत होते. नानासाहेबांना आणि तात्या टोपेंना बहुतांश फंडिंग शिंदेंच्या मर्जीतल्या सावकारांनी केलेले आहे. बैजाबाई शिंदेंचा रोल हा आतून बराच स्वातंत्र्ययोद्धांना सांभाळणारा होता - याचे पुरावे टोपे यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेले आहेत. 

१६. भारतीय स्वातंत्र्ययोद्धयांकडे शस्त्रास्त्रे सगळी होती. नव्हते ते त्या शस्त्रास्त्र चालू ठेवायला लागणारे military-industrial complex. त्यामानाने इंग्रजांनी जेव्हा चीनला जाणारे मोठे सैन्य भारताकडे वळवले तेव्हा प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आणि रसद आली.  भारतात कापूस त्यामानाने कमी बनत होता (कारण इंग्रजांनी अफू पेरायची भारतीयांवर केलेली सक्ती) - इंग्रजांना अमेरिकेतला कापूस प्रचुर प्रमाणात उपलब्ध होता (युद्धात कापसाचे महत्व अनन्यसाधारण आहे - कापड आणि जखमी सैनिकांच्या उपचारात). King Cotton हा एक प्रसिद्ध नारा होता तेव्हाचा. 

१७. भारतीयांच्या दृष्टीने हे एक राजकीय युद्ध होते. मोरे जिहाद वगैरे म्हणू देत - सहभाग घेणाऱ्या  आम-मुसलमानांसाठी हा जिहाद असेल हि. पण पेशवे (इतर सगळे नवाब लोक हे १८०२-पूर्व भारतात पेशव्यांच्या (म्हणजेच मराठ्यांच्या) अंमलाखाली असत जरी नावाला सगळे मोगल बादशाह ला मुजरे करत). या decision-maker लॉबी साठी हे युद्ध राजकीय युद्ध होते. मुख्य सत्ताकेंद्र हातात घेतली कि इंग्रज (तेव्हा इंग्रज पण नव्हते - कंपनी होती) यांची legitimacy नाहीशी होईल - हे गणित दिसते. कंपनी नरसंहार करील आणि भारतावर सर्वंकष युद्ध (total war) पुकारेल हे कुणाला वाटले नसावे. सर्वंकष युद्ध वर्षानुवर्षे खेळायला तितके develop असलेले औद्योगिक सेक्टर हवे. भारताची handloom आधारित अर्थव्यवस्था अश्या प्रकारचे "industrial" युद्ध औद्योगिक शक्ती विरुद्ध वर्षानुवर्षे चालवू शकत नाही. 

१८. १८५५-१८६४ या नौ वर्षात जगात तीन मोठी युद्धे झाली. चीन मधले दुसरे अफूचे युद्ध, भारताचे स्वातंत्र्यसमर आणि अमेरिकन गृहयुद्ध. इतर हि झाली (जसे तुर्की रशिया, इंग्रज यांचे क्रायमिया चे युद्ध - पण ते या मुद्द्यास अनुलक्षून संबंधित नाही. मुद्दा असा कि वरील तीनही युद्धात ब्रिटन (किंवा त्यांनी समर्थित केलेला पक्ष) जिंकला कारण पुढील पक्ष हा कृषी-आधारित होता, औद्योगिक नव्हता. 

१९. चीन-भारत-USA मधील दक्षिणी राज्ये > हे तीनही पक्ष industrialized नव्हते. यांच्या विरोधात असलेले ब्रिटन-ब्रिटन-USA मधील उत्तरी राज्ये हे मोठ्या प्रमाणात औद्योगिक होते. 

२०. प्जाताजाता गमतीची गोष्ट म्हणजे ब्रिटन ने प्रथम दक्षिणी राज्यांचे समर्थन केले (प्रत्यक्ष गृहयुद्ध सुरु व्हाय्च्या आधी). पण १८६२ येई पर्यंत पलटी मारली आणि दक्षिणी राज्ये घर-के-ना-घाट-के राहिले. 


२१. क्रायमिया-भारत-चीन-अमेरिका या चार ठिकाणी आपसात गुंतलेले राजकारण इंग्रजांनी छान खेळले आणि एक एक करून सगळीकडे विजयश्री संपादिली. हि चार युद्धे यांनी इंग्रजांची जागा जागतिक राजकारणात अशी ठसवली कि १९४५ पर्यंत जवळपास संपूर्ण जगावर इंग्रजांनी एकछत्री राज्य केले. अमेरिकेतले गणित थोडे चुकले नाहीतर १८६१-६२ मध्ये USA ची फाळणी करून त्यांनी त्यांचा अश्वमेध पूर्ण केला असता. ओव्हरऑल जगाच्या सुदैवाने उत्तरी राज्ये खमकी निघाली आणि USA एकसंघ राहिला.

निर्भय क्षेपणास्त्र

निर्भय क्रूज क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राच्या निमित्ताने बऱ्याच प्रकारची तंत्रज्ञाने विकसित झाली.. या गोष्टी उघड कुणी बोलत नाही, पण इंजिनियरिंगची आवड असेल (शिक्षण आवश्यक नाही) तर जितके प्रसिद्ध झाले आहे त्यावरून बरेच कयास बांधता येतात..

१. हे क्षेपणास्त्र हवेत "रेंगाळू" शकते.. रेंगाळणे हाच उचित शब्द आहे. इंग्रजीत यास loitering म्हणतात. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर हे क्षेपणास्त्र टार्गेट भोवती घिरट्या घालते, चाचपणी करते, ठोकायचा योग्य angle चे मोजमाप करते आणि मग टार्गेट ला ठोकते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - "रेंगाळणारे क्षेपणास्त्र" हे इंजिनियरिंग मधले बऱ्याच प्रगत तंत्रांपैकी एक आहे. कारण हे रेंगाळणे म्हणजे क्षेपणास्त्र स्वतःचे तात्कालिक निर्णय स्वतः घेते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्यातल्या AI (artificial intelligence) हा प्रकार हे निर्णय घेण्यास सक्षम असतो - केंद्रीय कमांड-सेंटर ला तो निर्णय घ्यावा लागत नाही.

२. ब्राह्मोस आणि निर्भय च्या लौंच मधील फरक म्हणजे दोन्ही क्षेपणास्त्रे उभी लौंच होतात आणि एक उंची गाठल्यावर आडवी होतात (मग रॉकेट गळून पडते आणि जेट इंजिन सुरु होते). मात्र उभ्याचे आडवे होताना ब्राह्मोस मध्ये क्षेपणास्त्राच्या शिर्षाशी काही लहान इंजिन्स लावले असतात. कुठलाही ब्राह्मोस लौंच व्हिडियो मध्ये हे दिसते. निर्भय मध्ये खालचे एकाच रॉकेट इंजिन क्षेपणास्त्राला उभ्याचे आडवे करते. इथे दोन्ही विडीयो दिले आहेत. उभे ते आडवे हा दिशा-बदल मधील फरक बघा. मी जे सांगतोय जे जाणवेल.

ब्राह्मोस लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=cUVMsuLW2EE

निर्भय लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=sqaEFatUIXU

भारताने विकसित केलेले तंत्र - इंजिन मध्ये थ्रस्ट व्हेक्टरिंग (thrust vectoring) हा प्रकार असतो. मराठीत भाषांतर कठीण आहे पण खालची रॉकेट-मोटर जे बळ (फोर्स) पृथ्वीवर (अर्थात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणबळावर) विरुद्ध दिशेने प्रयोग करते (न्यूटन चा तिसरा नियम) त्या बलाची दिशा ती मोटर बदलू शकते. बलाची दिशा बदलली कि क्षेपणास्त्राची दिशा (जी बलाच्या विरुद्ध असते) ती देखील बदलते. बोलायला सोपे आहे हे - पण १००० डिग्री-सेल्शियस (किंबहुना जास्तच) तापमानावर वेगाने जळणाऱ्या इंधनाची दिशा झटपट बदलणे (क्षेपणास्त्र crash न होऊ देता) एक मोठे तंत्रज्ञान आहे. सुखोई-तेजस वगैरे विमानांमध्ये आपण हे तंत्र विकसित केलेले आहे. पण त्या इंजिन्स चा व्यास मोठा असतो. निर्भय च्या जेट इंजिन चा व्यास खूप लहान आहे (तुलनेने). तेजस मधील तंत्राचे miniaturization यात भारताने यशस्वीरीत्या केलेले दिसते. 

३. क्षेपणास्त्राचा पथ कमांड सेंटर ने ठरवलेला असतो. एकदा तो मार्ग फीड केला कि क्षेपणास्त्र त्या मार्गावर चालते आणि टार्गेट ला ठोकते. निर्भय च्या यात्रेच्या पहिल्या दहा बिंदूंची माहिती आधीच फीड केलेली होती. पण अकरावा बिंदू फीड केलेला नव्हता. ती माहिती अकराव्या बिन्दुजवळ निर्भय पोहोचल्यावर शास्त्रज्ञांनी प्रसारित केली. निर्भय ने ती प्रसारित केलेली माहिती अनुसरून मार्गात यथोचित बदल केला. याचा अर्थ निर्भय ला आता भारतीय सेना जॉयस्टिक सारखी लांब बसून खेळवू शकते. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर काही नवीन माहिती मिळाली आणि दिशा वगैरे बदलायची असेल तर शेवटच्या क्षणी देखील निर्भय ला प्रोग्राम करता येते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - यात इस्रो ने गेल्या वर्षी सोडलेल्या रुक्मिणी (GSAT7) आणि IRNSS या दोन व्यवस्थांची परिपक्वता दिसते. याचा अर्थ भारताने संपूर्ण भारतीय उपखंडाचे उपग्रहीय-mapping जवळपास पूर्ण केलेले आहे हे दिसते. 

४. रेंगाळणारे क्षेपणास्त्र याचे आणखीन एक फलित म्हणजे याची खरी रेंज काय हे कोणालाच माहिती नाही. सरकार ने जाहीर केलेल्या माहिती नुसार "खूप वेळ रेंगाळून निर्भय ची रेंज १००० किमी आहे".. पण न रेंगाळता किती किमी आहे हे जाहीर केलेले नाही. म्हणजे वस्तुतः क्षेपणास्त्र खूप अधिक रेंज चे आहे. खूप अधिक.. दुप्पट असल्यास नवल नाही.

५. निर्भय ने ७० मिनिटात १०५० किमी प्रवास केला हे सरकार ने जाहीर केले - मग हे क्षेपणास्त्र "सब-सोनिक" (subsonic - म्हणजे ध्वनीच्या गती पेक्षा हळू चालणारे) कसे? कारण निर्भय ने पहिले ३०० किमी १० मिनिटात पार केले (ध्वनीच्या दीडपट गतीने - 1.46 mach) असे डी.आर.डी.ओ च्या पत्रकार परिषदेत सांगितले. म्हणजे निर्भयचे रेंगाळणे धरून सब-सोनिक.. न रेंगाळता निर्भय सुपर-सोनिक.. :) 

६. जमिनीपासून १०-१५ मीटर च्या उंचीवरून निर्भय उडते. त्यामुळे कुठल्याही रडार मध्ये ते दिसू शकत नाही. झाडे, डोंगर वगैरे उंचवटे यांना वळसा घालून जाणे - हि इंजिनियरिंग ची चांगली प्रगती दर्शविते. कारण हि सगळे अस्त्रे युद्धकाळातल्या धामधूमी साठी बनवलेली आहेत. १००० किमी दूर उडताना समोर झाड आले तर कंट्रोल-केंद्राशी संपर्क तुटू न देता स्वतःहून नवीन मार्ग calculate करणे आणि समोरील अडथळा वळसा घालून किंवा ओलांडून पार करणे - इम्प्रेसिव अभियांत्रिकी..

इतर बऱ्याच गोष्टी आहेत - मटेरीअल सायन्स, इलेक्ट्रोनिक्स, ballistics, खूप काही. एक टेक्नोलॉजी विकसित होते म्हणजे त्या सोबत असंख्य आधारभूत तंत्रे विकसित झालेली असतात. निर्भय च्या विकासात ७०-१०० वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या लहानमोठ्या टेक्नोलॉजी विकसित झाल्या असतील. कम्प्युटर प्रोगामिंग पासून पेंट कुठल्या केमिकल चा असावा (वेगवेगळी रसायने रेडियो लहरींना म्हणजे रडार ला वेगवेगळ्या प्रकारे interact करतात. रेडियो लहरींना फार जास्त परावर्तीत न करणारे पेंट आणि मटेरीअल आवश्यक असतात). तीच गोष्ट इंधनाची. इंजिन ची. पंखांची (रेंगाळतांना पंखाने दिशा बदलावी लागते). 

छान बातमी. अभियांत्रिकी मध्ये छान विकास झालेला बघून बरे वाटते. अभियांत्रिकी आणि प्युअर सायन्स हे खरे प्राणवायू आहेत देशाचे. बाकी टाईमपास आहे.

इंजिनियरिंग करणाऱ्या पोट्टे-पोट्टी हो, इंजिनियरिंग-पदवी घेऊन फिल्ड बदलू नका. पदव्युत्तर इंजिनियरिंग करा, त्यात पी.एच.डी करा. एम.बी.ए करून पैश्यांच्या मागे लागू नका हो.. पैसा आज न उद्या येईल, कुठे जातोय.. आवडीच्या फिल्ड मध्ये करियर करणे यातली मजा खूप वेगळी असते. स्वानुभवावरून बोलतोय.. :)

शुभमस्तु...


पुरोगामी : क्षमस्व

आजकाल एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे समाजात उतू आलेले पुरोगामित्व आणि पुरोगामी लोक. पुरोगामी हे सॉलिड विलक्षण लोक आहेत. सहसा राजकीय पटलावर डाव्या विचारसरणीचे लोक स्वतःला पुरोगामी, उदारमतवादी वगैरे म्हणवतात. यातले बरेच "डावे" किंवा लिबरल (उदारमतवादी) लोक स्वतःला पुरोगामी म्हणवून घेऊ लागले आहेत.. का? बहुतेक पुरोगामी हा शब्द सॉलिड पुरोगामी भासत असावा म्हणून. पण लिबरल आणि पुरोगामी असण्यातले काही महत्वाचे आणि मुलभूत फरक आजकाल लक्षात येऊ लागले आहेत. 

मला लिबरल लोक आवडतात पण आताशा पुरोगामी लोकांची धास्ती (पक्षी: जशी ओलीस ठेवलेल्या माणसाला अपहरणकर्त्याची वाटते तशी) वाटू लागली आहे. डावे लोक देखील स्वागतार्ह आणि छान असतात, जर ते योग्य प्रकारचे डावे असतील तर. योग्य प्रकारचे डावे म्हणजे काय तर एक उदाहरण - सीपीआय-मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी हे अयोग्य किंवा "पुरोगामी" प्रकारचे डावे आहेत. फार लांब कशाला, अगदी सरकार चालवत असलेले "संयुक्त पुरोगामी आघाडी" देखील "पुरोगामी" आहे.

बरेच आदरणीय डावे विचारक आणि सुधारक आहेत हे विचारसरणी ने समाजवादी आहेत (बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा, महात्मा गांधी, आंबेडकर, आधुनिक काळात राजीव दीक्षित इत्यादी). हे "योग्य" प्रकारचे डावे आहेत कारण यांची काही मते पटली नाहीत तरी खूप शिकायला मिळते आणि या मतभेदात देखील राष्ट्रघात होत नाही. 

पुरोगामी हा शब्द तसा छान आहे, मनात आशावाद निर्माण करणारा आहे, नाही का?. भविष्याचे एक सोनेरी आणि आशादायक स्वप्न दाखवणारा शब्द आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. 

प्रत्यक्षात "पुरोगामी" म्हणजे हळूहळू सुधारणा. पुरोगामी म्हणजे हळूहळू, आस्ते कदम, प्रोग्रेसिव्हली एका बंदिस्त आणि कडक नियंत्रणाखाली जगणाऱ्या समाजाचे निर्माण करणारे लोक.  एक असा समाज जो बंदिस्त आहे, जिथे विचार-स्वातंत्र्य नाही (किंवा फक्त "पुरोगामी विचारांनाच स्वातंत्र्य आहे), जिथे जातीय अस्मिता वैयक्तिक अस्मितेला (आणि धार्मिक अस्मितेला आणि राष्ट्रीय अस्मितेला) उल्लंघून जाते. जिथे कुणा एका ऐतिहासिक पुरुषावर किंवा त्या व्यक्तीच्या एखाद्या विचारावर केलेली एक लहानशी टीका देखील "महापुरुषाचा अवमान" आणि पर्यायाने जातीय अस्मितेचा अवमान ठरतो आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते. 

अश्या या पुरोगामी समाजात जगातली सगळी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे फक्त "पुरोगामी" लोकांसाठी रक्षित असते आणि समाज पचवू शकेल त्याहून किंबहुना जास्तच समता, बंधुता आणि पुरोगामी स्वातंत्र्य नाक दाबून समाजास पाजली जाते, ते समाजास आवडो अगर नावडो. अर्थात ज्यास हे आवडत नाही तो साहजिकच "प्रतिगामी" आणि सनातनी ठरवून त्यास काफिर ठरवण्याचे काम पुरोगामी लोक नेमाने करत आलेले आहेत. लाब पल्ल्याचा विचार केला तर जो एजेंडा मार्क्स चा होता, तोच एजेंडा पुरोगामी लोकांचा असतो. फरक हाच कि पुरोगाम्यांना मार्क्स चा एजेंडा हळूहळू, आस्ते कदम, पुरोगामी पाने (प्रोग्रेसिव्ह्ली) राबवायचा असतो. 

अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टी दुसऱ्या टोकावर असलेले लोक देखील करतात (उदा. हरयाणा चे खाप पंचायत वाले). पण आधुनिक भारतात प्रचलित असलेला intellectual discourse हा तथाकथित "पुरोगामी" लोकांनी रचलेला आहे, या अतिउजव्या खाप-टाईप च्या लोकांनी नाही. त्यामुळे पुरोगाम्यांच्या वरची नजर हटवून दुर्घटना घडू देण्यात हशील नाही. 

लिबरल आणि पुरोगामी - जसे भासवले जाते तसे खरोखरच एक आहेत का?

अय निजः परोवेति, गणना लघुचेत साम् !
उदार चरितानाम् तु, वसुधैव कुटुम्बकम् !! 
हे माझे आणि ते परक्याचे असा विचार लहान बुद्धीचे लोक करतात. उदार लोक संपूर्ण वसुधेला एक कुटुंब मानतात. 

महाभारतातला हा श्लोक भरपूर प्रसिद्ध आहे. यात उल्लेखलेले "उदारचरित" लोक किंवा "लिबरल" लोक हे खरच "प्रोग्रेसिव्ह किंवा पुरोगामी" आहेत का?

उदार अथवा लिबरल लोक (आधुनिक संज्ञा वापरल्यास योग्य प्रकारचे डावे) हे पुरोगामी लोकांहून प्रत्यक्षात फार वेगळे असतात. लिबरल माणूस तुमच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेऊन तुमच्या विचारस्वातंत्र्याचे रक्षण करावयास झटेल. पुरोगामी ते आहेत जे सहसा तिसऱ्याचे विचारस्वातंत्र्य जपायला तुमचे तोंड फोडेल कारण तुमचे अस्तित्व त्यास असहनीय असते. सहसा हे "तिसरे" म्हणजे जातीय किंवा सांप्रदायिक अल्पसंख्यांक लोक. उदार अथवा लिबरल माणसाला विचारांच्या मुक्त आदान-प्रदानात value दिसते. पुरोगामी माणसास या मुक्त वैधारिक आदानप्रदानात धोका आणि कावा दिसतो. उदार अथवा लिबरल तेच बोलतो जे त्यास योग्य वाटते. पुरोगामी सहसा जे पोलिटिकली करेक्ट आहे तेच बोलतो. इथे योग्य-अयोग्य चा प्रश्नच येत नाही. पुरोगामी double-standards ठेवतात. उदार ठेवत नाहीत. नोबेल पारितोषिक विजेते पुरोगामी यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले दुहेरी मापदंड लोकांनी बघितले आहेतच. १९९१ मध्ये देश डबघाई ला आलेला असताना अश्याच पुरोगामी (आणि सनातनी देखील) लोकांनी उदारीकरणाला विरोध केला होता.

लिबरल जागा आणि जगू द्या या न्यायाने जगतात. पुरोगामी मात्र विचारांचे नियंत्रण, त्या प्रक्रियेत हस्तक्षेप आणि त्यांचे "सेन्सरिंग" (censoring) करत असतात कारण पुरोगामी लोकांना समाजाला काही हवे आणि काय नको हे पूर्णपणे माहिती असते. पुरोगाम्यांना मार्क्स ने (अथवा देवाने) दिलेले वरदानच आहे जणू. लिबरल माणसासाठी लेखणी, भाषा एक औजार आहे. पुरोगामी माणसासाठी लेखणी आणि भाषा शस्त्र असते. आपण काय बोलतोय याबात बरेच पुरोगामी सहसा विचार करत नाहीत जोवर ते एकाच एक विचार मोठमोठ्याने ओरडून समोरच्यास शांत केले जात नाही. कारण पुरोगामी लोकांकडे सत्याची सहसा sole-agency असते. लोकांनी काय विचार करावा, काय करू नये या सर्व गोष्टी पुरोगामी ठरवतात. 

पुरोगामी हे नेहमी "सेक्युलर" असतात. लिबरल किंवा उदार  हे सर्व-पंथ समभाव ठेवणारे असतात. अर्थात कोण सेक्युलर आणि कोण सांप्रदायिक किंवा कम्युनल हे ठरवण्याचा अधिकार हे नेहमी पुरोगामी स्वतः कडे राखून ठेवतात. उदा: पुरोगामी नेते नितीश कुमार यांच्या मते आता आडवाणी सेक्युलर आणि मोदी कम्युनल आहेत. 

भारताचे उदाहरण

भारताचे बघा ना. समान नागरी कायदा मागणारे प्रतिगामी, विविध संप्रदायांना वेगळा पर्सनल कायदा देणारे पुरोगामी. गम्मत आहे सगळी. हा खेळ समजला कि पुरोगामी-प्रतिगामी अशी छान वाटणी करता येते मग. जातीय राजकारण खेळणारे पुरोगामी (त्यातल्या त्यात मागास जाती असतील तर उच्च-कोटीचे पुरोगामी. जितकी जात मागास, तितके त्या जातीचे राजकारण खेळणारे नेते पुरोगामी म्हणवतात). अर्थात पुरोगामित्व टिकवून ठेवायला जात जितकी जास्त वेळ मागास राहील तितके बरे, हे सोपे गणित आहे. जातीय आरक्षणाच्या कालमर्यादेवर प्रश्नचिन्ह उभारणारे म्हणजे सनातनी प्रतिगामी, मनुवादी, रेसिस्ट. इस्लाम वर, मुसलमानांवर, ख्रिस्ती मिशनरी लोकांवर टीका करणारे ते प्रतिगामी. ८०% समाजास एकत्र करून राजकारण खेळायची भाषा करणारे तर फारच मोठे प्रतिगामी, फाशीस्ट, हिटलर चे समर्थक इत्यादी म्हणवले जातात. 

या उलट वारकरी, हिंदूंचे देवी-देवता, रीतीरिवाज, सणवार मंदिरे व चालीरीती, साहित्य, इतिहास यांच्यावर वाटेल त्या शब्दात निंदा-नालस्ती करणारे, तोडमरोड करणारे लोक हे पुरोगामी विचारवंत म्हणवतात. जातींना एकमेकांविरुद्ध उभे ठाकून विष पेरणारे लोक म्हणजे पुरोगामी. काश्मीर पाकिस्तान ला देऊन टाकावा असे म्हणणाऱ्या अरुंधती रॉय सारख्या ज्येष्ठ पुरोगामी विदुषी या लोकांच्या अध्वर्यू आहेत. पुरोगामी सहसा माओवादी लोकांचे समर्थन करतात, यांना जिहादी आतंकवादी लोकांचे मानवाधिकार वगैरे चोख लक्षात असतात. राष्ट्राच्या संपत्तीवर अमुक संप्रदायाच्या लोकांचा पहिला हक्क आहे वगैरे पुरोगामी उद्गार आपल्याच सांप्रत पुरोगामी पंतप्रधानांचे आहेत. 

भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जिहादी संघटना (इंडियन मुजाहिदीन) खरोखरच अस्तित्वात आहेत का? हा मूलभूत सवाल फक्त पुरोगामी लोकांनाच पडू पडतो. बऱ्याच पुरोगाम्यांना यात आणि इतर आतंकवादी हल्ल्यांमध्ये तथाकथित उच्चवर्णीय लोकांचे किंवा "सनातनी संघटनांचे" षडयंत्र दिसते. 


यांना मी लिबरल किंवा उदारचरित नाही म्हणणार.. यांच्या साठी एकच शब्द योग्य आहे - पुरोगामी...