Sunday 21 May 2017

पुरोगामी : क्षमस्व

आजकाल एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे समाजात उतू आलेले पुरोगामित्व आणि पुरोगामी लोक. पुरोगामी हे सॉलिड विलक्षण लोक आहेत. सहसा राजकीय पटलावर डाव्या विचारसरणीचे लोक स्वतःला पुरोगामी, उदारमतवादी वगैरे म्हणवतात. यातले बरेच "डावे" किंवा लिबरल (उदारमतवादी) लोक स्वतःला पुरोगामी म्हणवून घेऊ लागले आहेत.. का? बहुतेक पुरोगामी हा शब्द सॉलिड पुरोगामी भासत असावा म्हणून. पण लिबरल आणि पुरोगामी असण्यातले काही महत्वाचे आणि मुलभूत फरक आजकाल लक्षात येऊ लागले आहेत. 

मला लिबरल लोक आवडतात पण आताशा पुरोगामी लोकांची धास्ती (पक्षी: जशी ओलीस ठेवलेल्या माणसाला अपहरणकर्त्याची वाटते तशी) वाटू लागली आहे. डावे लोक देखील स्वागतार्ह आणि छान असतात, जर ते योग्य प्रकारचे डावे असतील तर. योग्य प्रकारचे डावे म्हणजे काय तर एक उदाहरण - सीपीआय-मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी हे अयोग्य किंवा "पुरोगामी" प्रकारचे डावे आहेत. फार लांब कशाला, अगदी सरकार चालवत असलेले "संयुक्त पुरोगामी आघाडी" देखील "पुरोगामी" आहे.

बरेच आदरणीय डावे विचारक आणि सुधारक आहेत हे विचारसरणी ने समाजवादी आहेत (बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा, महात्मा गांधी, आंबेडकर, आधुनिक काळात राजीव दीक्षित इत्यादी). हे "योग्य" प्रकारचे डावे आहेत कारण यांची काही मते पटली नाहीत तरी खूप शिकायला मिळते आणि या मतभेदात देखील राष्ट्रघात होत नाही. 

पुरोगामी हा शब्द तसा छान आहे, मनात आशावाद निर्माण करणारा आहे, नाही का?. भविष्याचे एक सोनेरी आणि आशादायक स्वप्न दाखवणारा शब्द आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. 

प्रत्यक्षात "पुरोगामी" म्हणजे हळूहळू सुधारणा. पुरोगामी म्हणजे हळूहळू, आस्ते कदम, प्रोग्रेसिव्हली एका बंदिस्त आणि कडक नियंत्रणाखाली जगणाऱ्या समाजाचे निर्माण करणारे लोक.  एक असा समाज जो बंदिस्त आहे, जिथे विचार-स्वातंत्र्य नाही (किंवा फक्त "पुरोगामी विचारांनाच स्वातंत्र्य आहे), जिथे जातीय अस्मिता वैयक्तिक अस्मितेला (आणि धार्मिक अस्मितेला आणि राष्ट्रीय अस्मितेला) उल्लंघून जाते. जिथे कुणा एका ऐतिहासिक पुरुषावर किंवा त्या व्यक्तीच्या एखाद्या विचारावर केलेली एक लहानशी टीका देखील "महापुरुषाचा अवमान" आणि पर्यायाने जातीय अस्मितेचा अवमान ठरतो आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते. 

अश्या या पुरोगामी समाजात जगातली सगळी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे फक्त "पुरोगामी" लोकांसाठी रक्षित असते आणि समाज पचवू शकेल त्याहून किंबहुना जास्तच समता, बंधुता आणि पुरोगामी स्वातंत्र्य नाक दाबून समाजास पाजली जाते, ते समाजास आवडो अगर नावडो. अर्थात ज्यास हे आवडत नाही तो साहजिकच "प्रतिगामी" आणि सनातनी ठरवून त्यास काफिर ठरवण्याचे काम पुरोगामी लोक नेमाने करत आलेले आहेत. लाब पल्ल्याचा विचार केला तर जो एजेंडा मार्क्स चा होता, तोच एजेंडा पुरोगामी लोकांचा असतो. फरक हाच कि पुरोगाम्यांना मार्क्स चा एजेंडा हळूहळू, आस्ते कदम, पुरोगामी पाने (प्रोग्रेसिव्ह्ली) राबवायचा असतो. 

अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टी दुसऱ्या टोकावर असलेले लोक देखील करतात (उदा. हरयाणा चे खाप पंचायत वाले). पण आधुनिक भारतात प्रचलित असलेला intellectual discourse हा तथाकथित "पुरोगामी" लोकांनी रचलेला आहे, या अतिउजव्या खाप-टाईप च्या लोकांनी नाही. त्यामुळे पुरोगाम्यांच्या वरची नजर हटवून दुर्घटना घडू देण्यात हशील नाही. 

लिबरल आणि पुरोगामी - जसे भासवले जाते तसे खरोखरच एक आहेत का?

अय निजः परोवेति, गणना लघुचेत साम् !
उदार चरितानाम् तु, वसुधैव कुटुम्बकम् !! 
हे माझे आणि ते परक्याचे असा विचार लहान बुद्धीचे लोक करतात. उदार लोक संपूर्ण वसुधेला एक कुटुंब मानतात. 

महाभारतातला हा श्लोक भरपूर प्रसिद्ध आहे. यात उल्लेखलेले "उदारचरित" लोक किंवा "लिबरल" लोक हे खरच "प्रोग्रेसिव्ह किंवा पुरोगामी" आहेत का?

उदार अथवा लिबरल लोक (आधुनिक संज्ञा वापरल्यास योग्य प्रकारचे डावे) हे पुरोगामी लोकांहून प्रत्यक्षात फार वेगळे असतात. लिबरल माणूस तुमच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेऊन तुमच्या विचारस्वातंत्र्याचे रक्षण करावयास झटेल. पुरोगामी ते आहेत जे सहसा तिसऱ्याचे विचारस्वातंत्र्य जपायला तुमचे तोंड फोडेल कारण तुमचे अस्तित्व त्यास असहनीय असते. सहसा हे "तिसरे" म्हणजे जातीय किंवा सांप्रदायिक अल्पसंख्यांक लोक. उदार अथवा लिबरल माणसाला विचारांच्या मुक्त आदान-प्रदानात value दिसते. पुरोगामी माणसास या मुक्त वैधारिक आदानप्रदानात धोका आणि कावा दिसतो. उदार अथवा लिबरल तेच बोलतो जे त्यास योग्य वाटते. पुरोगामी सहसा जे पोलिटिकली करेक्ट आहे तेच बोलतो. इथे योग्य-अयोग्य चा प्रश्नच येत नाही. पुरोगामी double-standards ठेवतात. उदार ठेवत नाहीत. नोबेल पारितोषिक विजेते पुरोगामी यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले दुहेरी मापदंड लोकांनी बघितले आहेतच. १९९१ मध्ये देश डबघाई ला आलेला असताना अश्याच पुरोगामी (आणि सनातनी देखील) लोकांनी उदारीकरणाला विरोध केला होता.

लिबरल जागा आणि जगू द्या या न्यायाने जगतात. पुरोगामी मात्र विचारांचे नियंत्रण, त्या प्रक्रियेत हस्तक्षेप आणि त्यांचे "सेन्सरिंग" (censoring) करत असतात कारण पुरोगामी लोकांना समाजाला काही हवे आणि काय नको हे पूर्णपणे माहिती असते. पुरोगाम्यांना मार्क्स ने (अथवा देवाने) दिलेले वरदानच आहे जणू. लिबरल माणसासाठी लेखणी, भाषा एक औजार आहे. पुरोगामी माणसासाठी लेखणी आणि भाषा शस्त्र असते. आपण काय बोलतोय याबात बरेच पुरोगामी सहसा विचार करत नाहीत जोवर ते एकाच एक विचार मोठमोठ्याने ओरडून समोरच्यास शांत केले जात नाही. कारण पुरोगामी लोकांकडे सत्याची सहसा sole-agency असते. लोकांनी काय विचार करावा, काय करू नये या सर्व गोष्टी पुरोगामी ठरवतात. 

पुरोगामी हे नेहमी "सेक्युलर" असतात. लिबरल किंवा उदार  हे सर्व-पंथ समभाव ठेवणारे असतात. अर्थात कोण सेक्युलर आणि कोण सांप्रदायिक किंवा कम्युनल हे ठरवण्याचा अधिकार हे नेहमी पुरोगामी स्वतः कडे राखून ठेवतात. उदा: पुरोगामी नेते नितीश कुमार यांच्या मते आता आडवाणी सेक्युलर आणि मोदी कम्युनल आहेत. 

भारताचे उदाहरण

भारताचे बघा ना. समान नागरी कायदा मागणारे प्रतिगामी, विविध संप्रदायांना वेगळा पर्सनल कायदा देणारे पुरोगामी. गम्मत आहे सगळी. हा खेळ समजला कि पुरोगामी-प्रतिगामी अशी छान वाटणी करता येते मग. जातीय राजकारण खेळणारे पुरोगामी (त्यातल्या त्यात मागास जाती असतील तर उच्च-कोटीचे पुरोगामी. जितकी जात मागास, तितके त्या जातीचे राजकारण खेळणारे नेते पुरोगामी म्हणवतात). अर्थात पुरोगामित्व टिकवून ठेवायला जात जितकी जास्त वेळ मागास राहील तितके बरे, हे सोपे गणित आहे. जातीय आरक्षणाच्या कालमर्यादेवर प्रश्नचिन्ह उभारणारे म्हणजे सनातनी प्रतिगामी, मनुवादी, रेसिस्ट. इस्लाम वर, मुसलमानांवर, ख्रिस्ती मिशनरी लोकांवर टीका करणारे ते प्रतिगामी. ८०% समाजास एकत्र करून राजकारण खेळायची भाषा करणारे तर फारच मोठे प्रतिगामी, फाशीस्ट, हिटलर चे समर्थक इत्यादी म्हणवले जातात. 

या उलट वारकरी, हिंदूंचे देवी-देवता, रीतीरिवाज, सणवार मंदिरे व चालीरीती, साहित्य, इतिहास यांच्यावर वाटेल त्या शब्दात निंदा-नालस्ती करणारे, तोडमरोड करणारे लोक हे पुरोगामी विचारवंत म्हणवतात. जातींना एकमेकांविरुद्ध उभे ठाकून विष पेरणारे लोक म्हणजे पुरोगामी. काश्मीर पाकिस्तान ला देऊन टाकावा असे म्हणणाऱ्या अरुंधती रॉय सारख्या ज्येष्ठ पुरोगामी विदुषी या लोकांच्या अध्वर्यू आहेत. पुरोगामी सहसा माओवादी लोकांचे समर्थन करतात, यांना जिहादी आतंकवादी लोकांचे मानवाधिकार वगैरे चोख लक्षात असतात. राष्ट्राच्या संपत्तीवर अमुक संप्रदायाच्या लोकांचा पहिला हक्क आहे वगैरे पुरोगामी उद्गार आपल्याच सांप्रत पुरोगामी पंतप्रधानांचे आहेत. 

भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जिहादी संघटना (इंडियन मुजाहिदीन) खरोखरच अस्तित्वात आहेत का? हा मूलभूत सवाल फक्त पुरोगामी लोकांनाच पडू पडतो. बऱ्याच पुरोगाम्यांना यात आणि इतर आतंकवादी हल्ल्यांमध्ये तथाकथित उच्चवर्णीय लोकांचे किंवा "सनातनी संघटनांचे" षडयंत्र दिसते. 


यांना मी लिबरल किंवा उदारचरित नाही म्हणणार.. यांच्या साठी एकच शब्द योग्य आहे - पुरोगामी...

No comments:

Post a Comment