Sunday, 21 May 2017

१८५७ चे स्वातंत्र्यसमर - काही मते.

श्री संजय क्षीरसागर यांच्या या quote केलेल्या फेसबुक धाग्याला उत्तर देताना या पोस्ट ची निर्मिती झाली आहे. क्षीरसागरांचे मूळ पोस्ट इथे quote करीत आहे आणि खाली माझे उत्तर आहे. 
स. १८५७ च्या बंडाविषयीचे काही प्रश्न :-

(१) बंडखोरांनी दिल्लीच्या मोगल बादशाहीचे पुनरुज्जीवन का केले
(२) बंड झालेल्या ठिकाणचे सैनिक दिल्लीलाच का गोळा होत होते ?
(३) स. १८५७ चा उठाव पूर्वनियोजित मानला गेला तर संभाव्य लष्करी हालचाली लक्षात घेऊन रसद पुरवठा, दारुगोळा निर्मिती याविषयी काही उपाययोजना करण्यात आली होती कि नाही ?
(४) बंडखोर शिपाई इंग्रजांच्या तालमीत कवायती युद्धपद्धती शिकले होते व त्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांचा पराभव केला होता मग असे हे बहाद्दूर मुठभर इंग्रजांच्या समोर पराभूत कसे झाले ? तोफा - बंदुका दोन्हीकडे होत्या व त्यांचा वापर करण्याचे ज्ञानही उभयतांना होते मग बंडखोरांचे नेमके कुठे चुकले ?
(५) स. १८५७ चा लढा पूर्वनियोजित होता तर उठाव झाल्यावर सैनिकांच्या हालचाली विस्कळीत का झाल्या ? कित्येक ठिकाणी संस्थानिकांवर नेतृत्व लादण्यात आले तर कित्येक इंग्रजधार्जिणे राहिले. असे का ?
(६) उठावाचा टापू सीमित राहण्याची मुख्य कारणे कोणती ? उठावाच्या काही वर्षे अलीकडेच इंग्रजांनी शिखांचे स्वतंत्र राज्य धुळीस मिळवले होते तर ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या काही लष्करी तुकड्यांचा पराभव केला होता. तरीही शीख, शिंदे हे इंग्रजांच्या पक्षाला का चिटकून राहिले ?

इच्छुकांनी Parag Tope चा ग्रंथ आवर्जून वाचावा.. Operation Red Lotus: The Untold Story of the War of 1857 हे त्या ग्रंथाने फेबु पेज आहे. अप्रतिम संशोधन आहे. किंबहुना हि दिलेली लिंक तर वाचकांनी आवर्जून वाचावी. अप्रतिम संकेतस्थळ आहे. 

१. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे थोडक्यात मराठा मॉडेल पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न होता. ते मराठा मॉडेल जे महादजी शिंदेंनी १७८८ मध्ये अस्तित्वात आणले. तसे पाहिले तर मोगल बादशाही मराठ्यांवर १७३७ पासून कमीअधिक फरकाने विसंबून होती. पण १७८८ मध्ये ते ऑफिशियल झाले आणि मोगल बादशाह ला पेन्शन ठरली. थोडक्यात १८५७ चे इंग्रज-भारतीय युद्ध १८०२ पूर्व राजकीय समीकरण पुन्हा प्रचलित करायचा भारतीयांचा प्रयत्न होता. 

२. मुद्दा क्रमांक १ मध्ये दिलेली भूमिका लक्षात घेतली कि इतर प्रश्नांचे उत्तर मिळत जाते. अगदी पेशावर पासून बंगाल पर्यंत सैनिकांच्या coordinated हालचाली होत होत्या. 

३. १८५७ ला एक वैश्विक कारण देखील आहे. ते म्हणजे कापूस-व्यापारअफू-व्यापार आणि या दोन व्यापारांचे आपसातले समीकरण. याच सुमारास चीन मध्ये अफूचे दुसरे युद्ध सुरु होते आणि अमेरिकेत गृहयुद्ध होण्याच्या सीमेवर होते. अमेरिकन कापूस आणि दक्षिण अमेरिकन चांदी यांचा जागतिक अर्थव्यवस्थेत शिरकाव झाला होता आणि या दोन्ही गोष्टींवर भारताची असलेली "मोनोपोली" मोडीत निघाली होती. 

४. अमेरिकेतली दक्षिण-राज्ये (ज्यांना गृहयुद्धात confederation म्हणतात) तिथे कृष्ण-वर्णीयलोकांची गुलामी प्रचलित होती आणि गुलामांच्या करवी खूप स्वस्त कापूस जगात पंप होत असे. या व्यापाराला इंग्रजांचा वरदहस्त होता. 

५. या उलट चीन मध्ये सुरु असलेल्या अफू च्या युद्धात इंग्रजांचे खूप मोठे सैन्य अडकले होते. 

६. भारतात चपात्या आणि रक्त-कमळ यांची अदलाबदल तेव्हा सुरु झाली होती (१८५६ च्या आसपास). बैजाबाई शिंदे यांनी मथुरेत यज्ञ आयोजिला (माझा प्रवास लिहिणारे गोडसे भटजी याच यज्ञास मथुरेला जात होते - मराठीत ली पहिली प्रवासवर्णनात्मक डायरी असे या ग्रंथाला म्हणता येईल). शिंद्यांच्या मर्जीतल्या सावकारांनी या युद्धाला बऱ्यापैकी फंडिंग देखील केले होते. 

७. अफूचे दुसरे युद्ध चीन मध्ये जोर घेत होते. या सर्व परिस्थितीचा आढावा बहुदा भारतीयांनी घेतला असावा असा अंदाज आहे. अझिमुल्ला खानाला नानासाहेबांनी इंग्लंड ला धाडले तेव्हा तिथे अमेरिका आणि चीन मधल्या इंग्रज फौजांची स्थिती त्याच्या लक्षात येत होती. इस्तंबूल येथे असताना त्याने क्रायमिया (Crimea - सध्या रशिया-युक्रेन वादात गाजत असलेले) तिथे जाऊन इंग्रज फौजांची वाईट हालत देखील बघितली होती. 

८. इंग्रजांनी क्रायमिया मधून वगैरे माघार घेतली होती (जिंकल्यानंतर) आणि तिथे त्यांचे सैन्य थोडे मोकळे झाले. दरम्यान अमेरिकेतले दक्षिणी राज्य जिथे कापूस उगवतो - तिथला कापूस इंग्लंड-फ्रांस-जर्मनी-रशिया या चार देशातल्या एकूण कापूस गरजेचा ७०-८०% हिस्सा भागवत होता (१८३५ च्या अगोदर हा रोल भारताचा होता). १८३५ पासून हळूहळू अमेरिकेचा कापूस इंग्रज घेऊ लागले आणि त्यांना भारतीय कापसाची गरज भासेनाशी झाली. त्यांनी तेव्हा भारतीयांना नीळ आणि अफू पेरायला लावणे भाग पाडले आणि भारतातला अफू चीन ला विकत घ्यायला लावणे भाग पाडले (पहिले अफूचे युद्ध १८४२ च्या सुमारास झाले). 

९. वरील सगळी परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कारण हि परिस्थिती अझिमुल्ला खान आणि पर्यायाने पेशवे यांच्या ध्यानात आलेली होती. 

१०. अफूचा व्यापार हा इंग्रजांचा सर्वात फायदेशीर व्यापारापैकी होता आणि तो वाचवणे कंपनी ला अत्यावश्यक होते. इंग्लंड मधले उच्चभ्रू लोक अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांचे साठी होते (स्वस्तात कापूस मिळतो आणि भारताची सुपीक जमीन अफू उगवायला रिकामी मिळते), म्हणून त्यांनी गुलामगिरी कडे पूर्णतया दुर्लक्ष केले. क्रायमिया मध्ये रिकामे झालेले सैन्य चीन ला पाठवायला सुरुवात केली. (दीड-दोन लक्ष सेना होती हि). या कापसाच्या राजकारणाला कॉटन डिप्लोमसी म्हणतात. 

११. याच सुमारास भारताने स्वातंत्र्ययुद्धास सुरुवात केली. अपेक्षा हि होती कि कारण इंग्लंड ने मोठी सेना चीन मध्ये commit केलेली आहे आणि जहाजांचा ताफा सिंगापूर पर्यंत पोहोचला आहे, इंग्लंड प्रथम चीन कडे लक्ष देईल आणि इथे भारतीयांना मोकळा वेळ मिळेल. 

१२. सुरुवातीची सगळी लढाई भारतीयांनी व्यवस्थित जिंकली. दोन गोष्टी मात्र चुकल्या. एक म्हणजे इंग्रजांनी ब्रह्मदेशातली सेना भारताकडे आणली आणि चीन कडे जाणारी बहुतांश सेना जी सिंगापूर च्या पुढे गेली होती तिला परत भारतात आणले. क्रायमिया आणि इतरत्र युद्धाचा मजबूत अनुभव असलेली हि सेना भारतात पावसाळ्यानंतर उतरू लागली (कलकत्त्यात). दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांनी कलकत्ता ते कानपूर हा पूर्ण पट्टा गंगेच्या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूस दहा किलोमीटर पूर्णतया निर्मनुष्य केला. 

१३. चपाती आणि रक्तकमळ यांचे हे गणित होते कि गावकरी सैनिकांना रसद पुरवीत. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात इंग्रज करतील (इंग्रजी रेकॉर्ड सांगतात. विचार करा किती कोटी लोकांना मारले असेल आणि किती गावे उध्वस्त केली असतील). 

१४. जसजसा हा पट्टा निर्मनुष्य बनत केला तसतसे इंग्रजी सेना निर्धोकपणे बोटीने गंगेच्या मार्गाने आतपर्यंत येऊ लागली (जसे कानपूर). 

१५. शिखांचा प्रश्न वेगळा आहे. शिखांच्या काही निवडक तुकड्या युद्धात सामील होत्या. पण बहुतांश शीख पुरभैय्या लोकांवर डूख धरून होते (पुरभैय्या सैनिकांच्या मदतीने शिखांचा प्रभाव कंपनीने केला होता म्हणून). शिंदे दोन्ही बाजूने खेळत होते. नानासाहेबांना आणि तात्या टोपेंना बहुतांश फंडिंग शिंदेंच्या मर्जीतल्या सावकारांनी केलेले आहे. बैजाबाई शिंदेंचा रोल हा आतून बराच स्वातंत्र्ययोद्धांना सांभाळणारा होता - याचे पुरावे टोपे यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेले आहेत. 

१६. भारतीय स्वातंत्र्ययोद्धयांकडे शस्त्रास्त्रे सगळी होती. नव्हते ते त्या शस्त्रास्त्र चालू ठेवायला लागणारे military-industrial complex. त्यामानाने इंग्रजांनी जेव्हा चीनला जाणारे मोठे सैन्य भारताकडे वळवले तेव्हा प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आणि रसद आली.  भारतात कापूस त्यामानाने कमी बनत होता (कारण इंग्रजांनी अफू पेरायची भारतीयांवर केलेली सक्ती) - इंग्रजांना अमेरिकेतला कापूस प्रचुर प्रमाणात उपलब्ध होता (युद्धात कापसाचे महत्व अनन्यसाधारण आहे - कापड आणि जखमी सैनिकांच्या उपचारात). King Cotton हा एक प्रसिद्ध नारा होता तेव्हाचा. 

१७. भारतीयांच्या दृष्टीने हे एक राजकीय युद्ध होते. मोरे जिहाद वगैरे म्हणू देत - सहभाग घेणाऱ्या  आम-मुसलमानांसाठी हा जिहाद असेल हि. पण पेशवे (इतर सगळे नवाब लोक हे १८०२-पूर्व भारतात पेशव्यांच्या (म्हणजेच मराठ्यांच्या) अंमलाखाली असत जरी नावाला सगळे मोगल बादशाह ला मुजरे करत). या decision-maker लॉबी साठी हे युद्ध राजकीय युद्ध होते. मुख्य सत्ताकेंद्र हातात घेतली कि इंग्रज (तेव्हा इंग्रज पण नव्हते - कंपनी होती) यांची legitimacy नाहीशी होईल - हे गणित दिसते. कंपनी नरसंहार करील आणि भारतावर सर्वंकष युद्ध (total war) पुकारेल हे कुणाला वाटले नसावे. सर्वंकष युद्ध वर्षानुवर्षे खेळायला तितके develop असलेले औद्योगिक सेक्टर हवे. भारताची handloom आधारित अर्थव्यवस्था अश्या प्रकारचे "industrial" युद्ध औद्योगिक शक्ती विरुद्ध वर्षानुवर्षे चालवू शकत नाही. 

१८. १८५५-१८६४ या नौ वर्षात जगात तीन मोठी युद्धे झाली. चीन मधले दुसरे अफूचे युद्ध, भारताचे स्वातंत्र्यसमर आणि अमेरिकन गृहयुद्ध. इतर हि झाली (जसे तुर्की रशिया, इंग्रज यांचे क्रायमिया चे युद्ध - पण ते या मुद्द्यास अनुलक्षून संबंधित नाही. मुद्दा असा कि वरील तीनही युद्धात ब्रिटन (किंवा त्यांनी समर्थित केलेला पक्ष) जिंकला कारण पुढील पक्ष हा कृषी-आधारित होता, औद्योगिक नव्हता. 

१९. चीन-भारत-USA मधील दक्षिणी राज्ये > हे तीनही पक्ष industrialized नव्हते. यांच्या विरोधात असलेले ब्रिटन-ब्रिटन-USA मधील उत्तरी राज्ये हे मोठ्या प्रमाणात औद्योगिक होते. 

२०. प्जाताजाता गमतीची गोष्ट म्हणजे ब्रिटन ने प्रथम दक्षिणी राज्यांचे समर्थन केले (प्रत्यक्ष गृहयुद्ध सुरु व्हाय्च्या आधी). पण १८६२ येई पर्यंत पलटी मारली आणि दक्षिणी राज्ये घर-के-ना-घाट-के राहिले. 


२१. क्रायमिया-भारत-चीन-अमेरिका या चार ठिकाणी आपसात गुंतलेले राजकारण इंग्रजांनी छान खेळले आणि एक एक करून सगळीकडे विजयश्री संपादिली. हि चार युद्धे यांनी इंग्रजांची जागा जागतिक राजकारणात अशी ठसवली कि १९४५ पर्यंत जवळपास संपूर्ण जगावर इंग्रजांनी एकछत्री राज्य केले. अमेरिकेतले गणित थोडे चुकले नाहीतर १८६१-६२ मध्ये USA ची फाळणी करून त्यांनी त्यांचा अश्वमेध पूर्ण केला असता. ओव्हरऑल जगाच्या सुदैवाने उत्तरी राज्ये खमकी निघाली आणि USA एकसंघ राहिला.

No comments:

Post a Comment