Sunday 21 May 2017

निर्भय क्षेपणास्त्र

निर्भय क्रूज क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राच्या निमित्ताने बऱ्याच प्रकारची तंत्रज्ञाने विकसित झाली.. या गोष्टी उघड कुणी बोलत नाही, पण इंजिनियरिंगची आवड असेल (शिक्षण आवश्यक नाही) तर जितके प्रसिद्ध झाले आहे त्यावरून बरेच कयास बांधता येतात..

१. हे क्षेपणास्त्र हवेत "रेंगाळू" शकते.. रेंगाळणे हाच उचित शब्द आहे. इंग्रजीत यास loitering म्हणतात. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर हे क्षेपणास्त्र टार्गेट भोवती घिरट्या घालते, चाचपणी करते, ठोकायचा योग्य angle चे मोजमाप करते आणि मग टार्गेट ला ठोकते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - "रेंगाळणारे क्षेपणास्त्र" हे इंजिनियरिंग मधले बऱ्याच प्रगत तंत्रांपैकी एक आहे. कारण हे रेंगाळणे म्हणजे क्षेपणास्त्र स्वतःचे तात्कालिक निर्णय स्वतः घेते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्यातल्या AI (artificial intelligence) हा प्रकार हे निर्णय घेण्यास सक्षम असतो - केंद्रीय कमांड-सेंटर ला तो निर्णय घ्यावा लागत नाही.

२. ब्राह्मोस आणि निर्भय च्या लौंच मधील फरक म्हणजे दोन्ही क्षेपणास्त्रे उभी लौंच होतात आणि एक उंची गाठल्यावर आडवी होतात (मग रॉकेट गळून पडते आणि जेट इंजिन सुरु होते). मात्र उभ्याचे आडवे होताना ब्राह्मोस मध्ये क्षेपणास्त्राच्या शिर्षाशी काही लहान इंजिन्स लावले असतात. कुठलाही ब्राह्मोस लौंच व्हिडियो मध्ये हे दिसते. निर्भय मध्ये खालचे एकाच रॉकेट इंजिन क्षेपणास्त्राला उभ्याचे आडवे करते. इथे दोन्ही विडीयो दिले आहेत. उभे ते आडवे हा दिशा-बदल मधील फरक बघा. मी जे सांगतोय जे जाणवेल.

ब्राह्मोस लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=cUVMsuLW2EE

निर्भय लौंच व्हिडियो - https://www.youtube.com/watch?v=sqaEFatUIXU

भारताने विकसित केलेले तंत्र - इंजिन मध्ये थ्रस्ट व्हेक्टरिंग (thrust vectoring) हा प्रकार असतो. मराठीत भाषांतर कठीण आहे पण खालची रॉकेट-मोटर जे बळ (फोर्स) पृथ्वीवर (अर्थात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणबळावर) विरुद्ध दिशेने प्रयोग करते (न्यूटन चा तिसरा नियम) त्या बलाची दिशा ती मोटर बदलू शकते. बलाची दिशा बदलली कि क्षेपणास्त्राची दिशा (जी बलाच्या विरुद्ध असते) ती देखील बदलते. बोलायला सोपे आहे हे - पण १००० डिग्री-सेल्शियस (किंबहुना जास्तच) तापमानावर वेगाने जळणाऱ्या इंधनाची दिशा झटपट बदलणे (क्षेपणास्त्र crash न होऊ देता) एक मोठे तंत्रज्ञान आहे. सुखोई-तेजस वगैरे विमानांमध्ये आपण हे तंत्र विकसित केलेले आहे. पण त्या इंजिन्स चा व्यास मोठा असतो. निर्भय च्या जेट इंजिन चा व्यास खूप लहान आहे (तुलनेने). तेजस मधील तंत्राचे miniaturization यात भारताने यशस्वीरीत्या केलेले दिसते. 

३. क्षेपणास्त्राचा पथ कमांड सेंटर ने ठरवलेला असतो. एकदा तो मार्ग फीड केला कि क्षेपणास्त्र त्या मार्गावर चालते आणि टार्गेट ला ठोकते. निर्भय च्या यात्रेच्या पहिल्या दहा बिंदूंची माहिती आधीच फीड केलेली होती. पण अकरावा बिंदू फीड केलेला नव्हता. ती माहिती अकराव्या बिन्दुजवळ निर्भय पोहोचल्यावर शास्त्रज्ञांनी प्रसारित केली. निर्भय ने ती प्रसारित केलेली माहिती अनुसरून मार्गात यथोचित बदल केला. याचा अर्थ निर्भय ला आता भारतीय सेना जॉयस्टिक सारखी लांब बसून खेळवू शकते. टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर काही नवीन माहिती मिळाली आणि दिशा वगैरे बदलायची असेल तर शेवटच्या क्षणी देखील निर्भय ला प्रोग्राम करता येते. 

भारताने विकसित केलेले तंत्र - यात इस्रो ने गेल्या वर्षी सोडलेल्या रुक्मिणी (GSAT7) आणि IRNSS या दोन व्यवस्थांची परिपक्वता दिसते. याचा अर्थ भारताने संपूर्ण भारतीय उपखंडाचे उपग्रहीय-mapping जवळपास पूर्ण केलेले आहे हे दिसते. 

४. रेंगाळणारे क्षेपणास्त्र याचे आणखीन एक फलित म्हणजे याची खरी रेंज काय हे कोणालाच माहिती नाही. सरकार ने जाहीर केलेल्या माहिती नुसार "खूप वेळ रेंगाळून निर्भय ची रेंज १००० किमी आहे".. पण न रेंगाळता किती किमी आहे हे जाहीर केलेले नाही. म्हणजे वस्तुतः क्षेपणास्त्र खूप अधिक रेंज चे आहे. खूप अधिक.. दुप्पट असल्यास नवल नाही.

५. निर्भय ने ७० मिनिटात १०५० किमी प्रवास केला हे सरकार ने जाहीर केले - मग हे क्षेपणास्त्र "सब-सोनिक" (subsonic - म्हणजे ध्वनीच्या गती पेक्षा हळू चालणारे) कसे? कारण निर्भय ने पहिले ३०० किमी १० मिनिटात पार केले (ध्वनीच्या दीडपट गतीने - 1.46 mach) असे डी.आर.डी.ओ च्या पत्रकार परिषदेत सांगितले. म्हणजे निर्भयचे रेंगाळणे धरून सब-सोनिक.. न रेंगाळता निर्भय सुपर-सोनिक.. :) 

६. जमिनीपासून १०-१५ मीटर च्या उंचीवरून निर्भय उडते. त्यामुळे कुठल्याही रडार मध्ये ते दिसू शकत नाही. झाडे, डोंगर वगैरे उंचवटे यांना वळसा घालून जाणे - हि इंजिनियरिंग ची चांगली प्रगती दर्शविते. कारण हि सगळे अस्त्रे युद्धकाळातल्या धामधूमी साठी बनवलेली आहेत. १००० किमी दूर उडताना समोर झाड आले तर कंट्रोल-केंद्राशी संपर्क तुटू न देता स्वतःहून नवीन मार्ग calculate करणे आणि समोरील अडथळा वळसा घालून किंवा ओलांडून पार करणे - इम्प्रेसिव अभियांत्रिकी..

इतर बऱ्याच गोष्टी आहेत - मटेरीअल सायन्स, इलेक्ट्रोनिक्स, ballistics, खूप काही. एक टेक्नोलॉजी विकसित होते म्हणजे त्या सोबत असंख्य आधारभूत तंत्रे विकसित झालेली असतात. निर्भय च्या विकासात ७०-१०० वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या लहानमोठ्या टेक्नोलॉजी विकसित झाल्या असतील. कम्प्युटर प्रोगामिंग पासून पेंट कुठल्या केमिकल चा असावा (वेगवेगळी रसायने रेडियो लहरींना म्हणजे रडार ला वेगवेगळ्या प्रकारे interact करतात. रेडियो लहरींना फार जास्त परावर्तीत न करणारे पेंट आणि मटेरीअल आवश्यक असतात). तीच गोष्ट इंधनाची. इंजिन ची. पंखांची (रेंगाळतांना पंखाने दिशा बदलावी लागते). 

छान बातमी. अभियांत्रिकी मध्ये छान विकास झालेला बघून बरे वाटते. अभियांत्रिकी आणि प्युअर सायन्स हे खरे प्राणवायू आहेत देशाचे. बाकी टाईमपास आहे.

इंजिनियरिंग करणाऱ्या पोट्टे-पोट्टी हो, इंजिनियरिंग-पदवी घेऊन फिल्ड बदलू नका. पदव्युत्तर इंजिनियरिंग करा, त्यात पी.एच.डी करा. एम.बी.ए करून पैश्यांच्या मागे लागू नका हो.. पैसा आज न उद्या येईल, कुठे जातोय.. आवडीच्या फिल्ड मध्ये करियर करणे यातली मजा खूप वेगळी असते. स्वानुभवावरून बोलतोय.. :)

शुभमस्तु...


No comments:

Post a Comment