Sunday 21 May 2017

नामदेव ढसाळ - आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी ते राष्ट्रवादी - श्रद्धांजली

पद्मश्री नामदेव ढसाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला कुठलेच काव्य कधी फारसे समजले नाही, त्यामुळे त्यांच्या कवितेवर मी फारसे बोलणे उचित नाही. क्रियेवीण शब्दज्ञान तेची श्वानाचे वमन असे समर्थ रामदास स्वामींनी म्हंटले आहे. त्यामुळे तिथे मी मौन साधेन.

पण त्यांनी उत्तर-आयुष्यात घेतलेले निर्णय आणि मार्क्सवादापासून फारकत घेऊन संघाशी साधलेली जवळीक यामुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल फार आदर आहे. पण या आदराला कारण हे नाही कि माझा कल हिंदुत्वाकडे झुकतो. यात मला ढसाळांची दूरगामी धोका ओळखण्याची व्हिजन दिसते आणि तिला अनुसरून त्यांनी आपला पथ align केला आणि course-correction केले आणि दलित तरुणांचा एक मोठा सेक्शन मार्क्सवादी न होता राष्ट्रवादी बनला.

माझ्या एका निबंधात मी भारतात नोकझोक करून अस्थिरता पसरविण्यात हातभार लावणारे तीन जागतिक फोर्सेस बद्दल बोललो होतो. नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थर १९७२ मध्ये स्थापन केली, ती अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या धर्तीवर. 

दलित पॅन्थर चा इतिहास जाणून घ्यायला या अमेरिकन  ब्लॅक पॅन्थर पार्टी चा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. व्हिएत्नाम युद्ध सुरु असताना शीतयुद्ध कालीन सी-आय-ए विरुद्ध केजीबी युद्धाची एक कडी म्हणजे  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा उगम. हि पार्टी १९६६ ते १९८२ पर्यंत कार्यरत होती. अमेरिकेत सशस्त्र उठाव करून कृष्णवर्णीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हा या चळवळीचा एक उद्देश होता. 

एफ.बी.आय चे तत्कालीन अध्यक्ष जे.एडगर हूवर यांनी अश्या या चळवळीला खूप गंभीरतेने घेतले होते. कृष्णवर्णीय लोकांच्या बरोबरच अमेरिकेतले मूलनिवासी रेड-इंडियन्स, आणि श्वेतवर्णीय वंशवादी चळवळी ज्या अश्वेत लोकांना संपवण्यासाठी कार्यरत असायच्या (जसे कुप्रसिद्ध कु-क्लुक्स-क्लान Ku-klux-clan) या सर्वांचा भेद करायला एफबीआय ने COINTELPRO नावाचा एक प्रोजेक्ट चालवला होता. उत्सुकांनी गुगलून पाहावे. या सर्व अमेरिकी फुटीरवादी चळवळीना फूस सोव्हियत-रशियाची असायची. त्यामुळे एफबीआय ने साम-दान-दंड-भेद वाटेल ते वापरून या चळवळीच्या मध्ये आपली माणसे घुसवली आणि यांना क्षीण केले. अर्थात यातील बरेच मार्ग अमेरिकन संविधानानुसार बेकायदेशीर होते. हा प्रकल्प जरी १९७१ मध्ये बंद पडला तरी यांनी निर्माण केलेले assets आणि SOP (standard operating procedures) यांना एफबीआय पुढे वापरत राहिलीच. १९७२ पासून या  ब्लॅक पॅन्थर पार्टीचा पडता काल सुरु झाला आणि हळूहळू करून १९८२ पर्यंत या पार्टीत केवल २७ सदस्य उरले. थोडक्यात काय तर हि पूर्ण चळवळ अमेरिकन लोकांनी आणि व्यवस्थेने संपवून पचवली, तिच्यातले मार्क्सवादी घटक बाजूला करून संपवले (बरेचदा शारीरिक रित्या संपवले) आणि उरलेले आत्मसात केले. 

१९७७ पासून  ब्लॅक पॅन्थर पार्टी अमेरिकन प्रॉब्लेम राहिली नाही. पण १९८० च्या दशकात रशियाने ने अफगाणिस्तान वर आक्रमण केले आणि शीतयुद्ध खूप मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडात घुसले. भारतात नक्षलवाद, खलिस्तान, आसाम, तामिळी वाघ (लिट्टे) इत्यादी चळवळी सुरु झाल्या होत्या. ८०च्य दशका-अखेर पर्यंत काश्मीर देखील पेटले होते. त्याच दरम्यान एक चमत्कारिक Afro-dalit project अमेरिकेत सुरु झाला. भारतातल्या दलितांच्या समस्या या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयलोकांच्या सारख्या आहेत आणि म्हणून त्यावर उपाय देखील तसाच असावा, या मताचे बरेच think-tanks भारतात पैसा ओतू लागले. या सर्व प्रकारचे पूर्ण डिटेल वर्णन राजीव मल्होत्रा यांच्या breaking india नावाच्या एका अभ्यासपूर्ण ग्रंथात आहे. यातील बऱ्याच प्रमाणात हा पैसा मिशनरी मार्फत देखील येतो. महाराष्ट्रातले एक पुरोगामी विचारवंत नुकतीच ज्यांच्यामागे बलात्कारासंबंधात पोलीस लागली होती, ते वर्ल्ड-कौन्सिल ऑफ चर्चेस यांची जागतिक परिषद अटेंड करतात यावरून हि शंकेची पाल अजून जोरात चुकचुकली.

या एफ्रो-दलित प्रकल्पाचा ब्रीद-विचार म्हणजे तोच जो मूलनिवासी लोक प्रतिपादित असतात - दलित हे मूलनिवासी आहेत, इतर सर्व आक्रांते आहेत आणि त्यांना हिसंक मार्गाने बाहेर हाकलून देण्यात यावे. हा विचार वेगवेगळ्या मार्गाने या विचाराच्या बऱ्याच संघटना, विचारक आणि प्राध्यापक भारतात बोलत असतात.  ब्लॅक पॅन्थर पार्टी च्या धर्तीवर उभारलेली दलित पॅन्थर चळवळ या विचार प्रतीपादायला आणि कार्यान्वित करायला उत्कृष्ट platform होती. विशेषतः पश्चिम भारतात जिथून मार्क्सवादास महत्प्रयासाने शिवसेनेने निष्कासित केले होते. हा विचार मुळात चूक या साठी आहे कारण हा आर्य-आक्रमण सिद्धांत या खोट्या इतिहासावर आधारित आहे. भारतात दलित हे उपेक्षित होते आणि आहेत, पण त्याची कारणे पूर्ण वेगळी आहेत. दलित हे भारतातले कृष्णवर्णीय नाहीत. दलित असो कि ब्राह्मण, दोघांचा वंश एकच आहे आणि हे आता डी.एन.ए अभ्यासावरून हळूहळू समोर येते आहे. त्यामुळे जातींच्यात वांशिक दरी निर्माण करायचे जे बीज तेव्हा पेरल्या गेले होते ते असत्य तर होतेच, ठार विघातक देखील होते. जात म्हणजे वंश (रेस) नाही. जो कुणी हे बोलतो तो पूर्ण असत्यवक्ता असतो आणि देश-विघातक शक्तींचा अजेंडा (जाणता किंवा अजाणता) पुढे रेटत असतो. अश्या कल्पनांचे जिथल्या तिथे खंडन करावे. 

ढसाळांची एक सर्वोत्तम मुलाखतींच्या पैकी एक म्हणजे नोबेल विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांच्या प्रसिद्ध ग्रंथ "इंडिया-मिलियन म्युटिनीज नाऊ". त्यात आणीबाणीच्या काळाचे आणि त्या काळातल्या आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळातल्या ढसाळांचे उत्कृष्ट वर्णन आहे. तिथे दिसते कि दलित हे भारतातले कृष्णवर्णीय आहेत या विचारात  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच दलित पॅन्थर स्थापन झाली पण तिची गत देखील हळूहळू  ब्लॅक पॅन्थर पार्टी सारखीच होऊ लागली. आणीबाणी नंतर नामदेव ढसाळांचे गुन्हेगारी जगतातले मित्र त्यांना पैसे देऊ लागले. अचानक ढसाळांच्या कडे १०,००० रुपये वगैरे खेळू लागले. हा काल १९७९-८० चा आहे. मी पाकिस्तानका मतलब क्या, या माझ्या निबंधात या काळाविषयी सविस्तर लिहिले आहे. अमेरिकन पैसा चर्च आणि इतर मार्गांनी भारतात खेळू लागला होता. मुंबई चे गुन्हेगारी जगात काबुल ते इंडोनेशिया या प्राचीन अफू-च्या मार्गावरचे मोठे ठिकाण आहे. जेव्हा इथल्या underworld मध्ये पैसा अचानक पंप होतो, तेव्हा या जागतिक ड्रग-रूट मध्ये काहीतरी मोठे घडते आहे हे लगेच लक्षात येते (आजकाल हे मुंबई मधल्या property मार्केट च्या रेट्स वरून कळते, असो). इच्छुकांनी हा अप्रतिम ग्रंथ आणि त्यातील ढसाळांची सुंदर मुलाखत आवर्जून वाचावी. 

आता पुढे जे मी लिहतोय तो माझा कयास आहे, आणि या बद्दल तूर्तास कुठलाही ठोस पुरावा माझ्याकडे नाही फक्त वरील तथ्यांवर आधारित हा माझा तर्क आहे. मला ठाम खात्री आहे कि १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकात, जेव्हा भारतात अनेक विघटनकरी चळवळी चालत होत्या, त्यांना रशियाचा पाठींबा हमखास असेच. नामदेव ढसाळ यांनी काळाची हि बदलणारी चक्रे खूप लवकर ओळखली. आणि पडद्याआडून हि चक्रे फिरवणारे हे खेळाडू देखील ओळखले. १९८१ च्या सुमारास ढसाळ शांत झाले नि या मार्गातले खाचखळगे ओळखले. माझ्या मते तेव्हापासूनच ते या वरील नेटवर्क पासून तुटले आणि मुख्यधारेकडे झुकू लागले. हा त्यांचा झुकाव शेवटपर्यंत टिकून राहिला. 

त्यांच्या या बदलाचे खूप मोठे परिणाम मला दिसतात. त्या कठीण काळात (अजून हि कठीण काल गेलेला नाही, पण आज भारत बऱ्यापैकी सशक्त आहे) नामदेव ढासळ यांनी हा एक conscious decision घेतला आणि मार्क्सवादापासून फारकत घेतली. भारतीय तरुणाई मध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात राग आणि उद्वेग होता (जो आता परत हळूहळू दिसू लागलाय). त्यांच्या समर्थकांमध्ये धुमसत असलेला तो राग आणि उद्वेग नक्षलवाद वगैरे कडे झुकू न देता समाजाच्या मुख्यधारेत मिसळायला त्यांनी channelize केला. त्यांना लक्षात आले कि भारतीय दलितांच्या समस्या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांहून वेगळ्या आहेत आणि त्यांचे समाधान देखील. आणि त्या समाजाच्या मुख्यधारेत येऊनच सुटतील. आणि हे देखील कि भारतीय समाज चटकन बदलत नाही, आणि एकदा बदलला कि पुन्हा पूर्वीसारखा होत नाही. त्यामुळे हि हळूहळू होणारी प्रक्रिया आहे.

इंग्रजी मध्ये म्हणतात कि Hindsight is always 20/20. म्हणजे मागे वळून पाहताना सगळेच क्लियर दिसते कारण गोष्टी घडून गेल्या असतात. माझे वरील विचार हे मला hindsight ने दिलेले आहेत. ते सगळेच त्या वेळेस ढसाळ यांना आले असतील-नसतील, वेगळे आले असतील, वेगळ्या context मध्ये आले असतील. पण त्यांच्या कर्माची आणि निर्णयांची परिणीती म्हणजे दलित तरुणांचा एक घटक जो १९७० मध्ये मार्क्सवादाकडे झुकत होता तो घटक आणि त्या घटकाची पुढील पिढी राष्ट्रवादाकडे आली. 


बऱ्याच लोकांनी ढसाळांच्या आधी शिवसेना आणि मग रा.स्व.संघाच्या जवळीकी बद्दल लिहिले आहे (चांगले-वाईट). माझ्या मते त्यांचा हा प्रवास वरील गोष्टीस सर्वाधिक पाठबळ देतो. आधी लिहिल्या प्रमाणे, मला कवितेतले फारसे कळत नाही, फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजनीती आणि इतिहास शिकायची आवड आहे. त्या दृष्टीकोनातून मला श्री. नामदेव ढसाळ यांचे योगदान कौतुकास्पद आणि खूप प्रशंसास्पद जाणवते. या साठी त्यांना माझी श्रद्धांजली. 

No comments:

Post a Comment